माझा पोर्टफोलियो : उभरत्या कृषी क्षेत्रात मूल्यदर्शी उपयोगिता

कंपनीचे भारतात हरियाणा आणि फरीदाबाद येथे पाच उत्पादन प्रकल्प असून एक प्रकल्प पोलंडमध्ये आहे.

अजय वाळिंबे
सुमारे ७० वर्षांपूर्वी स्थापन झालेली एस्कॉर्ट्स ही भारतातील ट्रॅक्टर उत्पादनातील चौथ्या क्रमांकाची आघाडीची कंपनी असून, या कंपनीचा भारतीय बाजारपेठेतील वाटा ११ टक्के आहे. कृषी उद्योगाला अनुसरून विविध ट्रॅक्टरचे उत्पादन कंपनीकडून घेतले जात असून प्रामुख्याने फार्मट्रॅक आणि पॉवरट्रॅक या ब्रँड्सअंतर्गत ती व्यवसाय करते. कंपनी राजकोटस्थित अमूल समूहासह संयुक्त भागीदारीमार्फत स्टील्ट्रॅक या ब्रँडने १०-१५ अश्वशक्तीचे ट्रॅक्टर विकते.

कंपनीचे भारतात हरियाणा आणि फरीदाबाद येथे पाच उत्पादन प्रकल्प असून एक प्रकल्प पोलंडमध्ये आहे. मागील तीन वर्षांत कंपनीने उत्पादनांच्या पोर्टफोलिओची पुनर्बाधणी, योग्य वित्तपुरवठा टाय-अप आणि विस्तारित डीलर नेटवर्क उभारून मुख्य भौगोलिक क्षेत्रातील बाजारातील हिस्सा टिकवला आहे. आगामी कालावधीत कंपनी पश्चिम आणि दक्षिण भारतात आपला बाजार हिस्सा वाढवेल अशी अपेक्षा आहे.

गेल्या वर्षी, मार्च २०२० मध्ये, एस्कॉर्ट्सने विपणन व विक्री क्षेत्रातील जपानी कंपनी कुबोटा अ‍ॅग्री मशीनरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील ४० टक्के भांडवल ९० कोटी रुपयांना खरेदी केले आहे. सध्याची एस्कॉर्ट्स कुबोटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या ४०:६० भागीदारी कंपनीचे उत्पादन पूर्वीच्या नियोजनानुसार चालू राहील. या कंपनीचे व्यावसायिक उत्पादन लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. कुबोटा समूहासह एस्कॉर्ट्सच्या वाढीव सहकार्याने, कंपनीच्या देशांतर्गत आणि निर्यात बाजारात उच्च-स्थान युटिलिटी ट्रॅक्टरच्या बाजार वर्गात स्थिती सुधारण्याची शक्यता आहे.

मार्च २०२१ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांसाठी कंपनीने उलाढालीत २० टक्के वाढ साध्य करून ६९२९.२९ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ८७४.०६ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत तो तब्बल ८० टक्कय़ांनी जास्त आहे. कृषी क्षेत्राखेरीज कंपनी रेल्वे तसेच बांधकाम क्षेत्रासाठीदेखील विविध उत्पादने आणि इंजिनीयरिंग सेवा पुरवत असून आगामी कालावधीत कंपनीकडून भरीव अपेक्षा आहेत. तुमच्या पोर्टफोलियोसाठी एक मध्यमकालीन गुंतवणूक म्हणून उत्तम प्रवर्तक, कुठलेही कर्ज नसलेल्या आणि उज्ज्वल भवितव्य असलेल्या एस्कॉर्ट्सचा नक्की विचार करा.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

एस्कॉर्ट्स लिमिटेड  (बीएसई कोड – ५००४९५)

शुक्रवारचा बंद भाव : रु. १,१९४/-

उच्चांक/ नीचांक : रु. १,४८८ / ८९५

बाजार भांडवल : रु. १६,१०० कोटी

भरणा झालेले भागभांडवल : रु. १३४.८३ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ३६.५९

परदेशी गुंतवणूकदार      २५.९५

बँक/म्यु. फंड/सरकार     ५.६०

इतर/जनता      ३१.८६

संक्षिप्त विवरण

* शेअर गट    : लार्ज-कॅप

* प्रवर्तक       : निखिल नंदा

* व्यवसाय क्षेत्र  : ट्रॅक्टर / उपकरणे

* पुस्तकी मूल्य :                     रु. ३७२.८

* दर्शनी मूल्य :                        रु . १०/-

* गतवर्षीचा लाभांश                    : ७५%

शेअर शिफारसीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न :             रु. ६४.६

* किंमत उत्पन्न गुणोत्तर :               १८.५

*  समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर :      १८.७

* डेट इक्विटी गुणोत्तर :                        ०

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :            ८७.३

*  रिटर्न ऑन कॅपिटल :                     २६.१

*  बीटा :                                              १

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Escorts ltd company profile zws

ताज्या बातम्या