||अजय वाळिंबे
गुडइयर टायर अ‍ॅण्ड रबर कंपनी ही जगातील सर्वात मोठी बहुराष्ट्रीय टायर कंपन्यांपैकी एक आहे. गुडइयर जगातील सुमारे २३ देशांमध्ये सुमारे ७२,००० लोकांना रोजगार देते. या अमेरिकी बहुराष्ट्रीय कंपनीचे जगभरात ५४ प्रकल्प असून कंपनी मुख्यत्वे टायर्स आणि ट्यूबचे उत्पादन करते.

गुडइयर इंडिया म्हणजे गुडइयर टायर अ‍ॅण्ड रबरच्या उप-कंपनीची भारतातील कारकीर्द ९० वर्षांपेक्षा जुनी आहे. कंपनीचे भारतामध्ये दोन अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प असून एक हरयाणामधील फरिदाबाद तर दुसरा महाराष्ट्रात औरंगाबादमध्ये आहे. तर नऊ प्रादेशिक कार्यालये आहेत. कंपनी फार्म टायर, व्यावसायिक ट्रक टायर, ट्यूब आणि फ्लॅप्सचे उत्पादन करते. पॅसेंजर कार विभागात गुडइयर इंडिया आघाडीच्या (ओईएम) बहुतांशी उत्पादकांना टायर पुरवते. ट्यूबलेस रेडियल टायर उत्पादनातदेखील गुडइयर अग्रणी आहे. तसेच भारतातील कृषी क्षेत्रामध्ये गुडइयर टायर आघाडीवर असून एस्कॉटर््स, महिंद्र  अशा अनेक मोठ्या ट्रॅक्टर कंपन्यांना आपली उत्पादने पुरविते. कंपनीचे भारतभर उत्तम वितरण नेटवर्क आहे. कंपनीने नुकतेच प्रवासी कार विभागात अ‍ॅश्युरन्स ड्युराप्लस २ आणि एसयूव्ही विभागातील रँगलर एटी साइलेंटट्रॅक हे टायर्स लाँच केले आहेत.

मार्च २०२१ साठी संपलेल्या तिमाहीत कंपनीने गेल्या आर्थिक वर्षातील तिमाहीच्या तुलनेत ५२ टक्के वाढ साध्य करून तो ५६९.३४ कोटींवर गेला आहे, तर नक्त नफ्यातही २४०.३ टक्के वाढ होऊन तो ४३.२२ कोटींवर गेला आहे. तसेच करोना आर्थिक वर्षातदेखील कंपनीने उत्तम निकाल जाहीर केले असून कंपनीने १,७९२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १३६.२६ कोटींचा नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत तो ५३.४ टक्क्यांनी जास्त आहे. कंपनीचे जून २०२१ अखेर संपलेल्या तिमाहीचे निकाल लवकरच अपेक्षित आहेत. अर्थात निकाल कसेही असले तरीही उत्तम प्रवर्तक, विस्तृत उत्पादन श्रेणी आणि कुठलेही कर्ज नसलेली गुडइयर इंडिया एक उत्तम दीर्घकालीन गुंतवणूक ठरू शकेल.

गुडइयर इंडिया लिमिटेड

(बीएसई कोड – ५००१६८)

शुक्रवारचा बंद भाव : रु. १,२५८.४०

उच्चांक/ नीचांक : रु. १,३३२ / ६८६

बाजार भांडवल :

रु. २,९०३ कोटी

भरणा झालेले भागभांडवल : रु. २३.०७ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक                   ७४.००

परदेशी गुंतवणूकदार  १.७५

बँक/ म्यु. फंड/ सरकार        ७.८०

इतर/ जनता    १६.४५

संक्षिप्त विवरण

शेअर गट   : स्मॉल कॅप

प्रवर्तक      : गुडइयर टायर, यूएसए

व्यवसाय क्षेत्र       : टायर्स

पुस्तकी मूल्य        : रु. ३६४

दर्शनी मूल्य          : रु. १०/-

गतवर्षीचा लाभांश          : १३०%

शेअर शिफारसीचे निकष

प्रति समभाग उत्पन्न :            रु. ५९.०७

पी/ई गुणोत्तर :            २१.३

समग्र पी/ई गुणोत्तर :   २०

डेट इक्विटी गुणोत्तर :            ०.०२

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :        ५४.६

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड :        २०.९

बीटा :   ०.६

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.