जागतिक पातळीवरील अविवा इन्शुरन्स कंपनी आणि भारतातील डाबर उद्योग समूह यांच्या सहयोगाने २०००मध्ये भारतात स्थापन झालेल्या अविवा इंडिया या कंपनीची १ जानेवारी २०१४ नंतर नवीन अवतारामध्ये बाजारात आलेली एक वेगळ्या प्रकारची अशी ही पॉलिसी. वेगळ्या प्रकारची अशासाठी की ही धड एन्डोमेंन्ट प्रकारातही बसत नाही आणि पूर्णत: प्युअर टर्म पॉलिसीही नाही. सध्याचे विमा इच्छुक बऱ्याच प्रमाणात सज्ञान झाल्यामुळे त्यांना प्युअर टर्म पॉलिसीच घ्यायची असते. परंतु त्याचबरोबर त्यांना पॉलिसीची पूर्ण टर्म तरून जाण्याची खात्रीही असते. त्यामुळे जमा केलेल्या प्रीमिअमची रक्कम वाया जाणार म्हणून मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी हुरहुर लागलेली असते. अविवा लाइफ शील्ड अॅडव्हान्टेज या पॉलिसीमध्ये पॉलिसीची टर्म पूर्ण झाल्यावर विमाधारकाला त्याने भरलेल्या प्रीमिअमची पूर्ण रक्कम मिळण्याची शाश्वती असल्याने हे कुंपणावरील विमा इच्छुक ही पॉलिसी पसंत करतात.
ठळक वैशिष्टय़े :
१. १८ ते ५५ वर्षांपर्यंतच्या व्यक्तींना ही पॉलिसी घेता येते.
२. पॉलिसीची आणि प्रीमिअम भरायची टर्म १० ते ३० वर्षे.
३. कमीत कमी विमाछत्र २ लाख रुपये.
या पॉलिसीमध्ये अ आणि ब असे दोन पर्याय आहेत.
अ) पॉलिसीच्या टर्ममध्ये विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला विमाछत्राची रक्कम प्राप्त होणार आणि विमाधारक पॉलिसीची पूर्ण टर्म तरून गेला तर त्याने भरलेल्या मूळ प्रीमिअमची पूर्ण रक्कम त्याला परत दिली जाणार.
ब) यामध्ये विमा छत्राबरोबरच काही कारणांमुळे झालेल्या अपंगत्वाचीही काळजी घेतलेली आहे. अशा संभावनेमध्ये विमाछत्राची रक्कम आणि त्याने त्या काळापर्यंत भरलेल्या प्रीमिअमची रक्कमही परत केली जाणार. पॉलिसची पूर्ण टर्म तरून गेल्यावर मात्र वरील अ) प्रमाणेच मूळ प्रीमिअमची पूर्ण रक्कम त्याला प्राप्त होणार.
उदाहरण :
वर निर्देशित केलेल्या अ) या पर्यायाची पॉलिसी
१.  विमाधारकाचे वय – ३३ वष्रे
२. पॉलिसीची आणि प्रीमिअम भरायची टर्म – ३० वष्रे
३. मूळ प्रीमिअमची रक्कम – ३८,१०० रुपये
४. विमाछत्र – १ कोटी रुपये
पॉलिसीचे लाभ :
१. पॉलिसीच्या ३० वर्षांच्या टर्ममध्ये विमाधारकाच्या मृत्यूच्या संभावनेमध्ये त्याच्या नामनिर्देशकाला १ कोटी रुपये प्राप्त होणार.
२. विमाधारक पूर्ण टर्म तरून गेला तर त्याने ३० वर्षे भरलेल्या मूळ प्रीमिअमची रक्कम ११,४३,८०० रुपये (३८,१००७३०) त्याला परत मिळणार.
विश्लेषण :
विमाधारक ३० वर्षांच्या टर्ममध्ये सेवा करासह एकूण ११,६१,२५८ रुपये कंपनीकडे जमा करतो आणि पूर्ण टर्म तरून गेला तर कंपनी त्याला ११,४३,००० रुपये परत देते. निव्वळ गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर परताव्याचा दर पडतो द.सा.द.शे. सरासरी (-) ०.१० टक्के; परंतु त्या बदल्यात त्याला कंपनी १ कोटी रुपयांचे विमाछत्र देते.
सदर विमा इच्छुकाला त्याच रकमेमध्ये (११,६१,२५८ रुपये) १ कोटीच्या विमाछत्रासह जास्तीचा लाभ मिळू शकतो का त्याचा विचार करूया. त्याने ९५ टक्क्यांहून अधिक क्लेम सेटलमेंट असलेल्या दुसऱ्या एका कंपनीची १ कोटी रुपयांच्या विमाछत्राची ९० वर्षांची प्युअर टर्म पॉलिसी घेतली तर त्याच्या वार्षिक प्रीमिअमची रक्कम (सेवा करासहित) होते १३,४५० रुपये. ३० वर्षांच्या प्रीमिअमची एकूण रक्कम होते ४,०३,५०० रुपये. अविवा लाइफ शील्ड अॅडव्हान्टेजच्या एकूण प्रीमिअमच्या तुलनेत बचत ७,५७,७५८ रुपये.
यापैकी त्याने २५,२५० रुपये दरवर्षी प्राप्तिकर बचतीच्या ठोस परताव्याच्या पर्यायामध्ये गुंतविले तर ३० वर्षांनंतर त्या विमाधारकाकडे प्राप्तिकरमुक्त आणि खात्रीलायक अशी ३५,३८,०४३ रुपये गंगाजळी तयार होते. हीच रक्कम पूर्वनियोजित जोखीम घेऊन म्युच्युअल फंडाच्या प्राप्तिकर बचत योजनेत दरवर्षी गुंतविली तर योजनेच्या ऐतिहासिक अभिवृद्धीच्या अर्धी वाढ गृहीत धरूनही ६८,२४,८८८ रुपये गंगाजळी तयार करू शकतो.
गुंतवणुकीच्या मूलभूत नियमानुसार पूर्ण रक्कम पूर्वनियोजित जोखमीच्या पर्यायामध्ये गुंतविणे धोकादायक आहे. त्यानुसार त्याने या २५,२५० रुपयांपैकी दरवर्षी १२,००० रुपये वरील पूर्वनियोजित जोखमेच्या पर्यायामध्ये गुंतविले आणि १३,२५० रुपये ठोस परताव्याच्या पर्यायामध्ये गुंतविले तर त्याची गंगाजळी होते ५१,००,१०८ रुपये.
तुलनात्मक आढावा :
१. या दोन्ही पॉलिसींच्या टर्ममध्ये विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या नामनिर्देशकाला १ कोटी रुपये इतकीच रक्कम प्राप्त होणार आहे.
२. जर तो विमाधारक पूर्ण टर्म तरून गेला तर त्याला अविवा लाइफ शील्ड पॉलिसीमध्ये खात्रीलायक आणि प्राप्तिकरमुक्त अशी ११,४३,००० रुपये इतकी रक्कम प्राप्त होणार आहे. पर्यायी प्युअर टर्म पॉलिसीमध्ये विमाधारक पूर्ण टर्म तरून गेला तर विमा कंपनी त्याला काहीही देणे लागत नाही. परंतु वार्षिक प्रीमिअमच्या बचतीची रक्कम गुंतविल्यामुळे त्याला कितीतरी जास्त रक्कम प्राप्त होते. ती रक्कम प्राप्तिकर बचतीच्या ठोस पर्यायामध्ये गुंतविली तर त्याची गंगाजळी होते ३५.३८ लाख रुपये (म्हणजेच २१० टक्के अधिक). ही रक्कम त्याने प्राप्तिकर बचतीच्या वरील पूर्वनियोजित जोखीम असलेल्या पर्यायामध्ये गुंतविली तर त्याला ३० वर्षांनंतर ६८.२४ लाख रुपये इतकी रक्कम प्राप्त होऊ शकते (तब्बल ५०० टक्के अधिक). आणि तीच रक्कम त्याने दोन्ही पर्यायामध्ये विभागून गुंतविली तर त्याची गंगाजळी होते सुमारे ५१ लाख रुपये (३५० टक्के अधिक.)
प्युअर टर्म पॉलिसीमध्ये प्रीमिअमचे पैसे वाया जातात. या विमाइच्छुकांच्या मानसिकतेचा फायदा घेऊन विमा कंपन्या वेगवेगळी प्रलोभने दाखवितात. त्याबाबत पूर्णपणे विचारांती निर्णय घेतला तर भविष्यातील नुकसान टाळता येते.
(सदर लेखामधील माहिती ही संकेतस्थळावरून घेतली आहे आणि विमाइच्छुकांना सतर्क करण्यापुरता मर्यादित आहे.)