इतिहासावर नजर टाकली तर शेअर बाजारामधील गुंतवणुकीने इतर कोणत्याही पर्यायापेक्षा जास्त परतावा दिलेला आहे. तरी आजूबाजूला नजर टाकली तर बहुतांश गुंतवणूकदारांनी फायदा तर सोडाच, मुद्दलातही नुकसान भोगलेले आहे, असे का? या सर्वात जास्त परतावा नोंद केलेल्या गुंतवणुकीच्या पर्यायामधे आज आपल्या देशातील एक टक्क्यापेक्षाही कमी लोक गुंतवणूक करतात असे का? हे जाणून घेण्यासाठी कोणा तज्ज्ञाकडे जायची गरज नाही. स्वत:मध्येच डोकावून पाहिले तर त्याचे उत्तर सापडेल..
ग्रोथ इन्व्हेस्टिंग ही एक अतिशय लोकप्रिय आणि तितकीच धोकादायक अशी गुंतवणुकीची शैली आहे. जे गुंतवणुकदार या शैलीनुसार शेअर बाजारामध्ये गुंतवणुक करतात ते ‘ग्रोथ इन्व्हेस्टर’ समजले जातात. एखाद्या कंपनीच्या शेअरचा भाव आज कितीही असला तरी त्या कंपनीच्या भविष्यातील असामान्य भरभराटीचा अंदाज घेऊन त्या शेअरची खरेदी करायची ही त्या शैलीमागची संकल्पना. कंपनीच्या पुढील वाटचालीबाबतचा तर्क चुकला की सारेच मुसळ केरात. त्यामुळे तज्ज्ञ आणि सतर्क गुंतवणुकदार सोडून बाकी सर्व गुंतवणुकदार ग्रोथ इन्व्हेस्टिंग या प्रकारात पसे घालवत असतात. (हे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षाही जास्त असू शकते.)
गेल्या कित्येक दशकांच्या इतिहासावर नजर टाकली तर शेअर बाजारामधील गुंतवणुकीने इतर कोणत्याही पर्यायापेक्षा जास्त परतावा दिलेला आहे. ही वस्तुस्थिती असताना आजूबाजूला नजर टाकली तर बहुतांश गुंतवणुकदारांनी फायदा तर सोडाच, मूळ रकमेमधेही ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान भोगलेले आहेत, असे का? या सर्वात जास्त परतावा नोंद केलेल्या गुंतवणुकीच्या पर्यायामधे आज आपल्या देशातील एक टक्क्यापेक्षाही कमी जनता गुंतवणूक करते, असे का? हे जाणून घेण्यासाठी कोणा तज्ज्ञाकडे जायची गरज नाही. स्वत:मध्येच डोकावून पाहिले तर त्याचे उत्तर सापडेल.
सर्वसाधारणपणे गुंतवणूकदारांचा शेअरबाजाराकडे पाहण्याचा दृष्टीकोन चुकीचा असतो. हे त्यांच्या नुकसानीचे प्रमुख कारण आहे. त्यांच्या दृष्टीने ते गुंतवणूक करीत असतात, परंतु प्रत्यक्षात तो सट्टा असतो. कोणाच्या तरी सांगण्यावरुन किंवा पेपर वाचून किंवा टीव्ही चॅनेलच्या शिफारशीवर ते शेअरची खरेदी करतात. बऱ्याचदा त्या कंपनीबाबत त्यांना काहीही माहिती नसते.
२००० सालच्या तेजीच्या काळातील एक किस्सा मला आजही आठवतो. बरीच वष्रे शेअर बाजारामध्ये  ‘डे ट्रेिडग’ करणाऱ्या एका ज्येष्ठ गुंतवणूकदाराने मला विचारले होते, ‘आयसीआयसीआयची फॅक्टरी कुठे आहे?’ त्यांना प्रतिसाद अपेक्षीत होता, पण प्रश्नाने माझी बोलतीच बंद झाली होती!
आपण एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करतो, त्यावेळी प्रत्यक्षात आपण त्या कंपनीच्या व्यवसायाचा एक छोटासा हिस्सा खरेदी करत असतो. त्यावेळेस आपण जी किंमत मोजतो ती योग्य असेल तर भविष्यात आपल्याला त्या गुंतवणुकीपासून फायदा होतो. कंपनीचे व्यवस्थापन आणि व्यवसायामधील भरभराट कितीही आकर्षक असली तरी आपण त्यासाठी वाजवीपेक्षा जास्त रक्कम खर्च केली तर भविष्यातील परताव्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यापेक्षा एखाद्या सुमार कंपनीचे शेअर अगदी स्वस्तात मिळाले तर ती गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.
अधिकतम गुंतवणूकदार कमीतकमी काळामध्ये जास्तीत जास्त पसे कमावण्याच्या उद्देशाने शेअरबाजारात गुंतवणूक करतात, आणि त्यासाठी सर्वात सोपा मार्ग निवडतात. या मानसिकतेमध्ये एकदम फिट बसणारी गुंतवणुकीची प्रणाली म्हणजे ‘ग्रोथ इन्व्हेिस्टग.’ हा त्यांचा निर्णय त्यांना ‘ग्रोथ ट्रॅप’ या विचित्र सापळयात अडकवतो आणि नुकसानीला कारणीभूत होतो.
खास करून शेअरबाजारामधील तेजीच्या काळामध्ये दिवसागणीक नवीन खबरी (टिप्स) येत असतात. आणि गुंतवणूकदार त्यावर विश्वास ठेऊन शेअर्सची खरेदी करतात. अनेक जणांनी खरेदी सुरूकेली की आपसूकच त्याचा भाव वाढू लागतो. त्या कंपन्यांमध्ये न भूतो न भविष्यती अशी भरभराट होणार आहे, या समजूतीमुळे वरच्या भावामधेही गुंतवणूकदारांची खरेदी चालूच असते. अशावेळी गुंतवणुकीच्या मूळ सिध्दांताकडे दुर्लक्ष केले जाते. बाजारभाव काहीही असो, खरेदी चालूच ठेवायची आणि वरच्या भावात विक्री करून भरपूर नफा पदरात पाडायचा हा एकच उद्देश असतो.
एखाद्या शेअरच्या अंगभूत किंमतीपेक्षा जास्त भावाने त्याची खरेदी झाली तर त्यापासून होणाऱ्या फायद्यावर सहाजिकच विपरीत परिणाम होतो. काही दिवसांमध्येच त्याचा भाव झपाटयाने खाली जायला सुरुवात होते आणि त्यावेळी जर ‘लोअर सर्किट’ लागत गेले तर विक्री करून त्यामधून बाहेर पडण्याचा मार्गही बंद होतो.
या प्रकाराचे एक ठळक उदाहरण म्हणजे ‘रिलायन्स नॅचरल रिसोस्रेस लिमिटेड’ या कंपनीचे शेअर्स. ‘ग्रोथ स्टॉक’ म्हणून त्याचा उदोउदो झाला आणि २००७ च्या सुरुवातीला १८/-रुपयाच्या भावाने बाजारात उपलब्ध असलेल्या या शेअरची किंमत हा हा म्हणता एका वर्षांत (जानेवारी २००८) २४० रुपयांपर्यंत चढली. परतावा (द.सा.द.शे १२३३ टक्के) त्यावेळी कंपनीचा ईपीएस (प्रति शेअर मिळकत) अवघा ०.४० रु. इतका होता. म्हणजे सर्वसाधारणपणे १० ते १५चे किंमत/उत्पन्न गुणोत्तर (पी/ई रेशिओ) गृहित धरले तर बाजारभाव प्रति शेअर सहा ते आठ रु. असावयास  हवा. पण प्रत्यक्षात २४० रु.च्या बाजारभावाने त्याचा पी/ई रेशिओ होता ६०० पट. शेअरबाजाराच्या इतिहासात इतका वरचा पी/ई नमूद केलेला शेअर क्वचितच असावा.

दुसरे उदाहरण ‘हिमाचल फ्युचरिस्टीक’चे. ‘के टेन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुख्यात केतन पारेखच्या पसंतीच्या या शेअरचा भाव २००७ च्या सुरुवातीला आठ रुपये होता. तो २००८च्या जानेवारीपर्यंत २४०० रुपयांपर्यंत पोहोचला. आज १२ वर्षांनंतर त्याचा भाव आहे नऊ रुपये.
या प्रकारच्या गुंतवणुकीबाबत एका मुद्दय़ावर चर्चा/वाद होऊ शकतो. अगदी सुरुवातीलाच अशा प्रकारच्या शेअर्सची खरेदी केली तर?  विचार रास्त आहे. परंतु वस्तुस्थिती वेगळी असते.
सर्वसाधारपणे प्रमोटर, प्रायव्हेट इक्विटी इन्व्हेस्टर, व्हेन्चर कॅपिटॅलिस्ट या लोकांकडे / संस्थांकडे सुरुवातीला खरेदी केलेले शेअर्स असतात. कंपनीची भरभराट झाली आणि त्यांची गुंतवणूक दामदुप्पट झाली की कंपनीच्या समभागांची खुली प्रारंभिक विक्री- आय.पी.ओ जाहिर करतात. वेळही अशी निवडतात की बाजार त्यावेळी तेजीत असतो. गुंतवणूकदार ‘आयपीओ’ला भरभरून प्रतिसाद देतात. (त्याचे झगझगीत उदाहरण म्हणजे रिलायन्स पॉवरचा आयपीओ जाहिर करण्याची वेळ – २००८ची तेजी. १५ जानेवारी २००८ या पहिल्याच दिवशी तो आयपीओ साडेदहा पट ओव्हर सबस्क्राइब झाला. म्हणजे विक्रीसाठी उपलब्ध शेअरपेक्षा साडेदहा पटीने अधिक त्याच्या खरेदीसाठी अर्ज दाखल झाले. एकूण गुंतवणुकीची रक्कम १३७,५०० कोटी रुपये, असा भारतीय आयपीओच्या इतिहासातीला विक्रम नोंदविला गेला. ४५० रु. प्रति शेअरच्या भावाने गुंतवणूकदारांनी खरेदी केलेल्या या शेअरचा भाव ११ फेब्रुवारी २००८ ला शेअर बाजारात नोंदणी झाल्यावर पहिल्याच दिवशी १७% नी घसरला.) अशा परिस्थितीत मूळ गुंतवणूकदार आपला नफा बांधून बाहेर पडतात. ज्यांना आयपीओमध्ये शेअर्स मिळत नाहीत ते नंतर खुल्या बाजारात शेअर्स खरेदी करतात आणि खरेदीदारांच्या कळपात नवीन गुंतवणुकदारांची भर पडत जाते. हा वेडेपणा झपाटयाने वाढत जातो आणि जेव्हा हा प्रकार ‘अति’ होतो तेव्हा भाव दुप्पट वेगाने खाली यायला सुरुवात होते. अशा वेळी काही ठराविक डायलॉग कानावर पडतात- ‘हे तात्पुरते प्रॉफिट बुकींग आहे. भाव आणखी वर जाणार आहे’ वगरे वगरे. त्यामुळे गुंतवणूकदार त्यातून बाहेर पडायला नाखूष असतात आणि शेवटी नुकसान करून घेतात.
शेअरबाजारामधे होणारा फायदा हा शेअरच्या खरेदीच्या किंमतीवर अवलंबून असतो हे माहित असूनही गुंतवणूकदार या ‘ग्रोथ ट्रॅप’मध्ये का फसतात? माणसाच्या मनातील लालसा जेव्हा वरचढ होते तेव्हा बौध्दिक तर्क काम करीत नाही. माणूस डोक्याने विचार करण्याऐवजी मनाने विचार करायला सुरुवात करतो. इच्छामय विचारांचा पगडा बसला की साधा आणि सरळ युक्तिवाद तो विसरुन जातो, आणि स्वतच्या क्षमतेविषयी ‘मी म्हणेन ती पूर्वदिशा’ असा फाजील आत्मविश्वास तयार होतो. आजूबाजूचे सर्वजण तेच करत असतात. त्या कळपापासून वेगळे राहणे त्याला शक्य होत नाही आणि नकळतपणे त्याच्या हातून तर्कशून्य निर्णय घेतले जातात. नंतरच्या नुकसानीमधेही आपल्या बरोबर आजूबाजूचे अनेकजण असल्याने दुखामध्येही एक प्रकारचा दिलासा असतो. मनुष्य स्वभावाचा आणखी एक पलू म्हणजे जुन्या आठवणींपेक्षा नजीकच्या भूतकाळातील घडामोडींचा पगडा त्याच्या मनावर जास्त असतो. त्यामुळे हेच गुंतवणूकदार पुढील तेजीमध्ये नव्या उमेदीने पुन्हा बाजारात येतात आणि इतिहासाची पुनरावृत्ती होते.
शेअरबाजारामध्ये ‘रॅशनॅलिटी’ काम करीत नाही (खासकरून शॉर्टटर्ममध्ये) हे सत्य आहे. अशा परिस्थितीत त्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही ठराविक गोष्टींचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
शेअरबाजारामध्ये गुंतवणुकीच्या सुसंधी कायमस्वरूपी उपलब्ध नसतात. परंतु त्याबाबत गजबजाट मात्र सतत चालू असतो. परिणामत: अनेकवेळा बाजारामध्ये चुकीच्या भावांमध्ये सौदे होत असतात आणि तेही फार मोठय़ा प्रमाणात. अशा वेळी चाणाक्ष गुंतवणुकदारांसाठी संधी उपलब्ध होतात. त्या ओळखून, कळपापासून अलिप्त राहून, गुंतवणूक केली तर ‘ग्रोथ ट्रॅप’ पासून सुटका तर होतेच आणि भरपूर नफाही पदरात पडू शकतो.
काय करणे आवश्यक आहे?
*  स्वत:मधील भावनात्मक आणि मानसिक दुर्बलता ओळखून त्यानुसार गुंतवणुक करणे. ही झाली यशाची पहिली पायरी.
*  आजूबाजूच्या लोकांचे तर्कशून्य व्यवहार समजून घेऊन त्यांच्या चुकांपासून धडा घेणे. ही झाली दुसरी पायरी.
* आपल्या गुंतवणुकीवर दृढ विश्वास ठेऊन इतरांपासून (कळपापासून) अलिप्त राहण्याची िहमत बाळगणे. ही झाली यशाची तिसरी पायरी.