scorecardresearch

जाहल्या काही चुका.. : वंचितांची मांदियाळी  

भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने ६ ऑक्टोबर २०१७ रोजी एका परिपत्रकाद्वारे म्युच्युअल फंडांचे प्रमाणीकरण केले.

वसंत कुळकर्णी shreeyachebaba@gmail.com

सध्याच्या कमालीच्या अस्थिरतेने भारलेल्या काळात, ‘आपल्या गुंतलेल्या पैशाचे काय होणार ?’ असा प्रश्न गुंतवणूकदारांना सतावणे स्वाभाविकच. फारशी जोखीम नको म्हणून म्युच्युअल फंडात, त्यातही लार्ज कॅप फंडांत पैसा टाकणाऱ्या गुंतवणूकदारांनी म्हणूनच त्यांचे फंड परताव्याच्या कामगिरीपासून वंचित राहिलेले नाहीत, याची काळजी घ्यायला हवी. या संबंधाने वेळीच चाचपणी करण्यास सुचविणारा हा लेख..

भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने ६ ऑक्टोबर २०१७ रोजी एका परिपत्रकाद्वारे म्युच्युअल फंडांचे प्रमाणीकरण केले. या परिपत्रकानुसार फेरबदल १ एप्रिल २०१८ पासून लागू झाले. म्युच्युअल फंडांच्या अस्तित्वात असलेल्या गुंतवणुकीच्या परिघाचे प्रमाणीकरण झाले. हे परिपत्रक लागू झाल्याला चार वर्षे पूर्ण झाल्यापश्चात सक्रिय व्यवस्थापित फंडांच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास अनेक धक्कादायक निष्कर्ष पुढे येताना दिसतात. याच अनुषंगाने प्रसिद्ध झालेला ‘एस अ‍ॅण्ड पी इंडायसेस व्हर्सेस अ‍ॅक्टिव्हली मॅनेज्ड फंड्स’ हा अहवाल गुंतवणूकदारांच्या डोळय़ात अंजन घालणारा आहे.

या अहवालातील लार्ज कॅप फंडांच्या कामगिरीच्या भागाचा अभ्यास केल्यास धक्कादायक चित्र समोर येते. १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत ३१ पैकी केवळ ५ फंड म्हणजेच २.२२ लाख कोटी रुपयांपैकी ५२,९०० कोटी रुपये मालमत्ता असलेले फंड मानदंडापेक्षा सरस कामगिरी करू शकले आहेत.  याचा अर्थ केवळ २३.८३ टक्के मालमत्तेने ‘एस अ‍ॅण्ड पी बीएसई १००’ने दिलेल्या परताव्यापेक्षा सरस परतावा दिला आहे. ‘एस अ‍ॅण्ड पी बीएसई १००’ निर्देशांकाच्या तुलनेत मागील चार वर्षांत आयडीबीआय टॉप १००, कॅनरा रोबेको ब्लूचीप इक्विटी, अ‍ॅक्सिस ब्लूचीप,  यूटीआय मास्टरशेअर  आणि आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ब्लूचीप हे फंड कामगिरीत सातत्य राखू शकले. सर्वाधिक मालमत्ता असूनही गचाळ कामगिरी करणारे फंड म्हणजे,  एचडीएफसी टॉप १००,  फ्रँकलिन टेम्पलटन ब्लूचीप आणि डीएसपी टॉप १०० हे फंड आहेत, तर तळाच्या ५ फंडात इंडिया बुल्स ब्लूचीप आणि टॉरस लार्ज कॅप इक्विटी या फंडांचा समावेश आहे.

लार्ज कॅप म्युच्युअल फंडांना त्यांच्या मालमत्तेपैकी किमान ८० टक्के मालमत्ता बाजार भांडवलानुसार शीर्ष १०० कंपन्यांमध्ये गुंतवावी लागते. याचा अर्थ या सर्व फंडांच्या ८० टक्के गुंतवणुकीसाठी गुंतवणुकीचा परीघ एकसमान आहे. या उपलब्ध परिघाचा निधी व्यवस्थापक कसा वापर करतो यावर फंडाची कामगिरी ठरत असते. जर फंडाने ३, ५ ७ वर्षे कालावधीत चांगली कामगिरी केली असेल, तर तो फंड नक्कीच कामगिरीत सातत्य राखतो. उदाहरणार्थ, एखाद्या फंडाच्या कामगिरीत  गेल्या एक किंवा दोन वर्षांत लक्षणीय सुधारणा झाली असेल. तर या फंडाचा अल्पकालीन परतावा आकर्षक दिसेल. त्यामुळे, फंडाने यापूर्वी चांगली कामगिरी केली नसली तरीही, नजीकच्या कालावधीतील कामगिरीचा प्रभाव दीर्घ कालावधीच्या कामगिरीत दिसून येतो. उदाहरणासह सांगायचे तर – यूटीआय मास्टरशेअरची कामगिरी पाहा. एखाद्या फंडाची नजीकच्या कालावधीत कामगिरी खालावली असेल तरीही दीर्घकालीन चांगल्या कामगिरीच्या जोरावर हा फंड कामगिरीच्या यादीत अग्रस्थानी राहू शकतो. याचे उदाहरण म्हणजे मिरॅ असेट लार्जकॅप फंड होय. मिरॅ असेट लार्जकॅप हा ३१ हजार कोटी मालमत्तेचे व्यवस्थापन करतो. अलीकडच्या काळात ३ वर्षे आणि ५ वर्षे काळात फंडाची कामगिरी ‘काप गेली भोकं राहिली’ अशी झाली आहे. परंतु दहा वर्षे कालावधीचा विचार केल्यास हा फंड अजूनही अग्रस्थानी आहे.

विविध कालावधीतील कामगिरी तपासण्याचा ‘क्वारटाइल रँकिंग’ एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. पतमापन संस्था ‘क्रिसिल’ फंडांच्या दीर्घकालीन कामगिरीचा अभ्यास करून फंडाचे त्रमासिक ‘क्वारटाइल रँकिंग’ प्रसिद्ध करत असते. प्रत्येक तिमाहीत मागील तीन वर्षांच्या कामगिरीनुसार ‘टॉप क्वारटाइल रँकिंग’ मिळविलेले फंड गुंतवणुकीसाठी निवडावेत. व्यापक पर्याय हवा असल्यास ‘टॉप क्वारटाइल रँकिंग’ आणि ‘अप्पर मिडल क्वारटाइल’ मधील फंडांचा विचार करावा.  सर्वसाधारणपणे गुणवत्तेत सातत्य राखणारे फंड या दोन गटात असतात.  उदाहरणार्थ, पाच वर्षांपूर्वी ‘टॉप क्वारटाइल रँकिंग’ मिळविलेल्या १० फंडांपैकी आज केवळ ५ फंडच ‘टॉप क्वारटाइल रँकिंग’मध्ये आपले स्थान अबाधित राखून आहेत. आर्थिक वर्ष २०१८ च्या पहिल्या तिमाहीत ‘टॉप क्वारटाइल रँकिंग’मध्ये असलेले  एचडीएफसी टॉप १००,  फॅँकलिन टेम्पलटन ब्लूचीप आणि डीएसपी टॉप १०० हे आज ‘बॉटम क्वारटाइल’मध्ये आहेत. आर्थिक वर्ष २०१५ च्या पहिल्या तिमाहीत पहिल्यांदा ‘टॉप क्वारटाइल रँकिंग’मध्ये जागा मिळविलेला आणि आजपर्यंत ‘टॉप क्वारटाइल रँकिंग’मध्ये अढळपदी असलेला केवळ कॅनरा रोबेको ब्लूचीप इक्विटी आणि तर त्याच्यासह आर्थिक वर्ष २०१७ मध्ये ‘टॉप क्वारटाइल रँकिंग’मध्ये स्थान मिळविलेला अ‍ॅक्सिस ब्लूचीप, हे दोन फंड आपले स्थान अबाधित राखून आहेत.

लार्ज कॅप फंड गटात मालमत्ता क्रमवारीत अ‍ॅक्सिस ब्लूचीप (३५,७०० कोटी), एसबीआय ब्लूचीप (३१,९३० कोटी), मिरॅ अ‍ॅसेट लार्जकॅप (३१,९२० कोटी), आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ब्लूचीप (३१,६८० कोटी), आदित्य बिर्ला सन लाईफ फ्रंटलाईन इक्विटी (२१,६७० कोटी) आघाडीवर आहेत. या फंडांचा एकूण मालमत्तेत एकत्रित वाटा  ६८ टक्के आहे. परंतु या पैकी केवळ अ‍ॅक्सिस ब्लूचीप आणि आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ब्लूचीप हे ५ वर्षे कालावधीत कामगिरीत सातत्य राखू शकले आहेत.

माझी मुलगी नुकतीच सज्ञान झाली. म्युच्युअल फंड ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण झाल्याने आजपर्यंत माझ्या छत्रछायेत असलेल्या मुलीला स्वत: ‘एसआयपी’ गुंतवणुकीसाठी फंड निवडावासा वाटला.  तिला देत असलेल्या पॉकेट मनीमधून बाबा कोणत्या लार्जकॅप फंडात ‘एसआयपी’ सुरू करू, असा तिने प्रश्न विचारला. तिला सुचविलेल्या फंडांमध्ये, कॅनरा रोबेको ब्लूचीप इक्विटी, अ‍ॅक्सिस ब्लूचीप, यूटीआय मास्टरशेअर, निप्पॉन इंडिया लार्जकॅप आणि आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ब्लूचीप यांचा समावेश आहे. गुंतवणूकदार आयडीबीआय टॉप १००, युनियन लार्जकॅप आणि मिहद्रा मनूलाईफ लार्ज कॅप प्रगती या फंडांचा देखील ‘एसआयपी’साठी विचार करू शकतील.

आर्थिक वर्ष २०२२ मधील लार्ज कॅप फंडांचा आढावा घेताना -‘हंस: श्वेत:, बक: श्वेत:, क: भेद: बक-हंसयो:। नीर-क्षीर-विवेके तु, हंसो हंस:, बको बक:॥’ या संस्कृत श्लोकाची आठवण झाली. हंस आणि बगळा दोघेही पांढऱ्या रंगाचे त्यामुळे दोघांमध्ये काय भेद? परंतु जेव्हा पाणी आणि दूध वेगळे करण्याचा प्रसंग येतो तेव्हा कोण हंस व कोण बगळा ते कळून येते. वरील श्लोकाचा हा भावार्थ या लेखातील आशयाच्या संदर्भात वेगळय़ा अर्थाने लागू पडतो.  एकूणात प्रसिद्ध नाममुद्रा आणि मोठी मालमत्ता असलेले फंड परताव्यापासून वंचित राहिलेले दिसतात. हे फंड पुरेशी संपत्ती निर्मिती करू शकतीलच याची खात्री देता येत नाही. आपली गुंतवणूक असलेला फंड परताव्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी आपणच घ्यायला हवी. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे माहितीपत्रक कृपया सखोल अभ्यासा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Investment in mutual funds actively managed funds zws

ताज्या बातम्या