अजय वाळिंबे
वर्ष १९९० मध्ये स्थापन झालेली टाटा मेटॅलिक्स ही टाटा स्टीलची उपकंपनी असून, कंपनी उच्च-गुणवत्तेच्या पिग आयर्न (पीआय) आणि डक्टाइल आयर्न पाइप्स (डीआयपी) यांच्या आघाडीच्या उत्पादकांपैकी एक आहे. कंपनीची उत्पादने प्रामुख्याने जल-व्यवस्थापनासारख्या पायाभूत सुविधा उद्योगात आणि फाऊंड्रीमध्ये वापरली जातात. कंपनी विविध प्रकारच्या कास्टिंग उपयोजनांसाठी कच्चा माल म्हणून पिग आयर्नच्या १४ प्राथमिक ग्रेड आणि काही सानुकूलित पर्याय उत्पादित करते. वाहन उद्योग, कृषी, वीज, रेल्वे यांसारख्या विविध उद्योगांमध्ये कास्टिंगसाठी पिग आयर्नचा वापर केला जातो.
कंपनीच्या एकूण उलाढालीपैकी ५२ टक्के उलाढाल ही डक्टाइल आयर्न पाइप्समध्ये असून, या व्यवसाय विभागाअंतर्गत कंपनी ८०-८०० मिमी व्यासाचे पाइप्स उत्पादित करते. यामध्ये सांडपाणी, सिंचन, पोर्टेबल पाण्याची वाहतूक इत्यादीमध्ये वापरल्या जाणाऱ्या डीआयपीचा समावेश होतो.
कंपनीचा उत्पादन प्रकल्प पश्चिम बंगालमधील खरगपूर येथे आहे. टाटा मेटॅलिक्सची वार्षिक हॉट मेटल उत्पादन क्षमता ५.५० लाख टनांची असून त्यापैकी २ लाख टन डक्टाइल आयर्न पाइप्समध्ये आणि उर्वरित पिग आयर्नमध्ये रूपांतरित होते. कंपनीचा पिग आयर्नमधील बाजारहिस्सा २० टक्के असून भारतीय उद्योगातील ती दुसऱ्या क्रमांकाची आघाडीची उत्पादक आहे. कंपनी लवकरच डक्टाइल आयर्न पाइपची क्षमता ४ लाख टनांपर्यंत वाढवत असून वर्षभरात तो पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये कंपनीने नियामक मान्यतेच्या अधीन राहून टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्स लिमिटेडमध्ये आणि टाटा मेटॅलिक्स लिमिटेडचे (१२ : १०) एकत्रीकरण मंजूर केले होते. ‘सेबी’कडून अद्याप मंजुरी आलेली नसली तरीही आगामी कालावधीत हे एकत्रीकरण होण्याची शक्यता आहे.
मार्च २०२२ अखेर समाप्त आर्थिक वर्षांसाठी कंपनीचे आर्थिक निकाल नुकतेच जाहीर झाले असून कंपनीने आर्थिक वर्षांत २,७४६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २३७ कोटींचा नक्त नफा कमावला आहे. मात्र या नफ्यामध्ये कंपनीने महाराष्ट्रातील मालमत्ता विकल्याचा ३१ कोटींचा नफा अंतर्भूत आहे. त्यामुळे कंपनीचे निकाल फारसे आकर्षक नाहीत. मात्र तरीही धातू क्षेत्र आणि कंपनीच्या उत्पादनाची मागणी पाहता हा शेअर थोडय़ा खालच्या भावास मिळाल्यास दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खरेदी करावा.
सध्याची शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने समभाग खरेदीचे धोरण ठेवावे.
टाटा मेटॅलिक्स लिमिटेड
(बीएसई कोड – ५१३४३४)
शुक्रवारचा बंद भाव : रु. ७८६/-
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक :
रु. १,३७४ / ६९५

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाजार भांडवल : रु. २,४८२ कोटी
भरणा झालेले भागभांडवल : रु. ३१.५८ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ६०.०३
परदेशी गुंतवणूकदार ०.९२
बँक/ म्यु. फंड/ सरकार १०.२५
इतर/ जनता २८.८०
संक्षिप्त विवरण

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Portfolio metals tata metallics subsidiary tata steel company water management industry foundry amy
First published on: 02-05-2022 at 00:01 IST