अजय वाळिंबे

गेल्या वर्षी आलेल्या ‘आयपीओ’मुळे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. ही कंपनी बहुतांशी वाचक गुंतवणूकदारांना माहिती असेल. ९४ रुपये प्रति शेअर किमतीस आलेल्या या ‘आयपीओ’ला उत्तम प्रतिसाद मिळून ४४ पट अधिक भरणा झाला होता. भारतीय रेल्वेच्या ट्रेन कंट्रोल ऑपरेशन आणि सुरक्षा प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यासाठी ‘रेलटेल’ची स्थापना २००० मध्ये करण्यात आली होती. कंपनी प्रामुख्याने देशव्यापी ऑप्टिकल फायबर नेटवर्क ब्रॉडबँड आणि व्हीपीएन सेवा, दूरसंचार आणि मल्टिमीडिया नेटवर्क व्यवसायात आहे. भारत सरकारच्या ‘मिनीरत्न-१’ श्रेणीतील असलेल्या ‘रेलटेल’चे नेटवर्क देशभरातील सुमारे ६१,००० किलोमीटरहून अधिक असून ते भारतभरातील ६,०९७ स्टेशन्समधून जाते, ज्यामध्ये सर्व प्रमुख व्यावसायिक केंद्रे समाविष्ट आहेत.

Competition among 7 companies under incentive scheme for ACC production
‘एसीसी’ उत्पादनासाठी प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७ कंपन्यांमध्ये चढाओढ
virar, violation of safety norms, global city, sewage treatment plants
विरार : खासगी सांडपाणी प्रकल्पांकडून सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन
why Tata and Wipro want to buy Aachi Masala food company
Tata and Wipro : टाटा – विप्रो कंपनीला आची मसाला कंपनी २००० कोटी रुपयांना का खरेदी करायची आहे?
Recovery of 605 crores for house rent action of Zopu authority is shock to developers
घरभाड्यापोटी ६०५ कोटींची वसुली, ‘झोपु’ प्राधिकरणाच्या कारवाईचा विकासकांना धसका

कंपनीचे भारतीय रेल्वेशी धोरणात्मक संबंध असून, कंपनीकडे स्थानकांवरील आयपी आधारित व्हिडीओ देखरेख प्रणाली, ‘ई-ऑफिस’ सेवा तसेच स्थानकांदरम्यान कमी अंतराची कनेक्टिव्हिटी आणि लांब पल्ल्याच्या कनेक्टिव्हिटीची अंमलबजावणी यांसारख्या ‘मिशन क्रिटिकल कनेक्टिव्हिटी’ सेवांच्या तरतुदीसह विविध प्रकारच्या प्रकल्पांची जबाबदारी आहे. रेलटेल भारतीय रेल्वेमधील विविध ग्राहक सेवा तसेच प्रमुख रेल्वे स्थानकांवर मागणीवरील सामग्री आणि वाय-फाय, हॉस्पिटल मॅनेजमेंट, इन्फर्मेशन सिस्टीम, भारत-नेट यासह विविध प्रवासी सेवादेखील प्रदान करते. कंपनीने नुकतीच ‘आयुष्मान भारत’च्या डिजिटल मिशनअंतर्गत रेल्वेची सर्व म्हणजे ६९५ हॉस्पिटल्स तसेच आरोग्य केंद्रांत ‘हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टम’ यशस्वीपणे कार्यरत केले आहे. तसेच तमिळनाडू राज्यात कंपनीने फायबर ते होम प्रकल्पांतर्गत एक लाखांचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे ‘रेल-टेल’ची ही सेवा छोटय़ा शहरातून आणि गावातून उपलब्ध केली गेली आहे.

कंपनीचे डिसेंबर २०२१च्या तिमाहीसाठी जाहीर झालेले आर्थिक निकाल आकर्षक नाहीत. या कालावधीत गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीने उलाढालीत १३ टक्के वाढ साध्य करून ती ४१८ कोटींवर नेली आहे, तर नक्त नफ्यात ५ टक्के घट होऊन, तो ६६ कोटींवर आला आहे. कंपनीचे भागभांडवल उलाढालीच्या तुलनेत थोडे जास्त असले तरीही कंपनीवर कुठलेही कर्ज नाही तसेच रेल्वेचे प्रवर्तक असल्याने स्पर्धा कमी राहील. ‘फॉर्च्यून इंडिया नेक्स्ट ५०० कंपन्यां’च्या यादीत १२४ व्या क्रमांकावर असलेली ही मिनिरत्न कंपनी सध्या ‘आयपीओ’च्या वेळी निर्धारित किमतीपेक्षा खालच्या पातळीवर सध्या उपलब्ध आहे. अर्थसंकल्पांत जाहीर केलेल्या ‘गती-शक्ती’ योजनेचा तसेच पायाभूत सुविधांवरील आयोजित भांडवली खर्चाचा निश्चित फायदा ‘रेल-टेल’सारख्या कंपनीला होईल. एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून या कंपनीचा विचार करायला हरकत नाही.

सध्याची शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता प्रत्येक मंदीच्या वेळी टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

रेल-टेल कॉर्पोरेशन

(बीएसई कोड – ५४३२६५)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ८९/-

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक :

रु. १६५/८७

बाजार भांडवल :

रु. २,८५८ कोटी

भरणा झालेले भागभांडवल : रु. १३.५७ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक                   ७२.८४   

परदेशी गुंतवणूकदार            २.४७   

बँक/ म्यु. फंड/ सरकार         ४.७४   

इतर/ जनता                 १९.९५

संक्षिप्त विवरण

* शेअर गट           : स्मॉल कॅप

* प्रवर्तक         : भारतीय रेल्वे

* व्यवसाय क्षेत्र : टेलीकॉम इन्फ्रास्ट्रक्चर

* पुस्तकी मूल्य :         रु. ४३.७१

* दर्शनी मूल्य         :   रु. १०/-

* गतवर्षीचा लाभांश :     २२ %

शेअर शिफारसीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न :      रु. ५.६५

*  किंमत उत्पन्न गुणोत्तर :     १५.७

*  समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर :      ८१.८

*  डेट इक्विटी गुणोत्तर :       ०.०२ 

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :    ४७.५

*  रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड : १४.१

*  बीटा :      ०.६८

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.