|| प्रवीण देशपांडे
मागील लेखात आपण विवरणपत्र भरणे कोणाला बंधनकारक आहे ते बघितले. या लेखात आपण कोणत्या करदात्याला कोणत्या अर्ज नमुन्यामध्ये (फॉर्ममध्ये) विवरणपत्र दाखल करावयाचे आहे ते बघू या.

प्राप्तिकर नियमानुसार विवरणपत्र भरण्यासाठी एकूण ७ फॉर्म्स आहेत. फॉर्म १ हा वैयक्तिक करदात्यांसाठी, फॉर्म २ ते ४ हे वैयक्तिक आणि हिंदू अविभक्त कुटुंब करदात्यांसाठी आहेत. फॉर्म ५ हा भागीदारी संस्थांसाठी आहे, फॉर्म ६ हा कंपन्यांसाठी आहे, तर फॉर्म ७ हा धर्मादाय संस्था ज्या ‘कलम ११’नुसार वजावट घेतात अशांसाठी आहे. वैयक्तिक करदात्यांसाठी एकूण ४ फॉर्म्स आहेत. करदात्यांनी योग्य विवरणपत्राच्या फॉर्मची निवड करणे गरजेचे आहे. विवरणपत्र कोणत्या फॉर्ममध्ये भरावे हे करदात्याच्या उत्पन्नावर, निवासी दर्जा, कंपनीत संचालक आहे का, शेअर बाजारात सूचिबद्ध नसलेल्या कंपनीचे शेअर्स असणे यावर अवलंबून असते. करदात्याने त्याच्या दर्जानुसार, उत्पन्नानुसार योग्य तो फॉर्म निवडावा. वैयक्तिक करदात्यांना भराव्या लागणाऱ्या फॉर्म्ससंबंधीची माहिती खालीलप्रमाणे :

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?

फॉर्म १ :

वैयक्तिक निवासी भारतीय ज्यांचे एकूण उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि त्यांच्या उत्पन्नात फक्त वेतन किंवा निवृत्तिवेतनाचा, एका घरापासूनच्या उत्पन्नाचा आणि इतर उत्पन्नाचा समावेश आहे अशांना फॉर्म १ मध्ये विवरणपत्र भरता येते. ज्या करदात्याच्या उत्पन्नात इतर व्यक्तींचे उत्पन्न मिसळले जात असेल तर (उदा. पती/पत्नी, अजाण मुलगा/मुलगी वगैरे) त्याचे उत्पन्नसुद्धा वरील उत्पन्नाच्या स्रोतापासूनच असले पाहिजे. ज्या करदात्यांचे उत्पन्न कमाल करमुक्त मर्यादेपेक्षा कमी आहे, परंतु त्यांनी पुढील व्यवहार केले आहेत (अ) एक कोटीपेक्षा जास्त रक्कम बँकेच्या चालू खात्यात जमा किंवा (आ) दोन लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च परदेश प्रवास किंवा (इ) एक लाख रुपयांपेक्षा जास्त वीज बिलावर खर्च केला आहे अशा करदात्यांना विवरणपत्राचा फॉर्म १ भरता येईल.

फॉर्म २ :

फॉर्म २ मध्ये वैयक्तिक आणि हिंदू अविभक्त कुटुंब विवरणपत्र दाखल करू शकतात. ज्या करदात्यांच्या उत्पन्नात धंदा-व्यवसायाच्या उत्पन्नाचा समावेश असेल त्यांना हा फॉर्म भरता येत नाही. ज्या करदात्यांना फॉर्म १ लागू होत नाही असे करदाते फॉर्म २ भरू शकतात. करदाता कोणत्याही कंपनीत संचालक (डायरेक्टर) असेल किंवा करदात्याकडे २०२०-२१ या आर्थिक वर्षात कधीही शेअर बाजारात सूचिबद्ध नसलेल्या कंपन्याचे शेअर्स असतील किंवा करदात्याकडे भारताबाहेर संपत्ती किंवा त्याला भारताबाहेरील संपत्तीत आर्थिक स्वारस्य असेल किंवा करदाता भारताबाहेरील खात्यात अधिकृत सही करणारा असेल तर किंवा करदात्याचे भारताबाहेर उत्पन्न असेल तर ते हा फॉर्म भरू शकतात.

फॉर्म ३ :

ज्या वैयक्तिक किंवा हिंदू अविभक्त कुटुंबांच्या उत्पन्नामध्ये धंदा-व्यवसायाच्या उत्पन्नाचा समावेश होतो त्या करदात्यांना फॉर्म ३ मध्ये विवरणपत्र भरता येते.

फॉर्म ४ :

हा फॉर्म वैयक्तिक, हिंदू अविभक्त कुटुंब, भागीदारी संस्था (एलएलपी सोडून) ज्यांचा निवासी दर्जा भारतीय आहे अशा करदात्यांना भरता येतो. ज्या करदात्याचे एकूण उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि फक्त वेतन किंवा निवृत्तिवेतनाचा, एका घरापासूनच्या उत्पन्नाचा आणि इतर उत्पन्नाचा समावेश आहे आणि तो धंदा-व्यवसायातील उत्पन्नावर अनुमानित कर भरत असेल तर हा फॉर्म भरता येतो. ज्या करदात्याच्या उत्पन्नात इतर व्यक्तींचे उत्पन्न मिसळले जात असेल तर (उदा. पती/पत्नी, अजाण मुलगा/मुलगी वगैरे) त्याचे उत्पन्नसुद्धा वरील उत्पन्नाच्या स्रोतापासूनच असले पाहिजे.

विवरणपत्राचे फॉर्म निवडण्यामध्ये चूक झाल्यास उत्पन्न किंवा इतर माहिती उघड करण्यात चूक होऊ शकते. उदा. करदात्याकडे शेअर बाजारात सूचिबद्ध नसलेल्या कंपनीचे समभाग आहेत आणि त्याने फॉर्म १ निवडला तर अशा समभागांची माहिती देण्याची तरतूद या फॉर्ममध्ये नाही. किंवा करदात्याची भारताबाहेर संपत्ती असेल तर त्याला फॉर्म १ मध्ये विवरणपत्र भरता येणार नाही.

ज्या करदात्यांना लेखापरीक्षण (ऑडिट) बंधनकारक आहे अशांना विवरणपत्र ई-फायलिंगद्वारे डिजिटल स्वाक्षरीने भरणे बंधनकारक आहे. इतर वैयक्तिक करदात्यांनासुद्धा ई-फायलिंगद्वारे विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक आहे आणि डिजिटल स्वाक्षरीने किंवा इलेक्ट्रोनिक पडताळणी कोड किंवा आयटीआर सही करून पाठविता येते. जे करदाते अतिज्येष्ठ नागरिक (वय ८० वर्षे किंवा जास्त) आहेत त्यांना १ आणि ४ फॉर्ममध्ये कागदी विवरणपत्र प्राप्तिकर अधिकाऱ्याकडे दाखल करता येते.

आता वाचकांकडून आलेल्या प्रश्नांच्या समाधानाकडे वळू या.

प्रश्न :  माझा घाऊक विक्रीचा व्यवसाय आहे आणि त्याची वार्षिक उलाढाल तीन कोटी रुपये इतकी आहे. मला लेखापरीक्षण (ऑडिट) बंधनकारक आहे का? मला विवरणपत्राचा कोणता फॉर्म भरावा लागेल?    – राजेश वर्दे

उत्तर : आपल्या धंद्याची उलाढाल एक कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे लेखापरीक्षण बंधनकारक आहे. आपल्या धंद्याची उलाढाल दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे आपल्याला अनुमानित कराच्या तरतुदीदेखील लागू होत नाहीत. त्यामुळे आपल्याला लेखापरीक्षण बंधनकारक आहे. परंतु ज्या करदात्यांच्या धंद्याची वार्षिक उलाढाल १० कोटी रुपयांपेक्षा कमी आहे आणि एकूण जमा रकमेच्या ५ टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम रोखीने मिळालेली नसल्यास आणि एकूण दिलेल्या रकमेच्या ५ टक्क्यांपेक्षा कमी रक्कम रोखीने दिलेली असल्यास त्याला लेखापरीक्षणातून सूट दिली आहे. त्यामुळे आपण या अटीची पूर्तता करत असाल तर आपल्याला लेखापरीक्षण बंधनकारक नाही. आपल्याला फॉर्म ३ मध्ये विवरणपत्र दाखल करावे लागेल.

प्रश्न :  मी जून २०१९ मध्ये एक घर ४५ लाख रुपयांना खरेदी केले होते. ते मी जानेवारी २०२१ मध्ये ४८ लाख रुपयांना विकले. आणि या विक्रीच्या पैशातून मी नवीन घर खरेदी केले. मला या विक्रीवर कर भरावा लागेल का?

– एक वाचक

उत्तर : आपण जून २०१९ मध्ये खरेदी केलेले घर जानेवारी २०२१ मध्ये विकले. म्हणजे घर खरेदी केल्याच्या तारखेपासून २४ महिन्यांच्या आत विकले. त्यामुळे ही अल्पमुदतीची संपत्ती झाली आणि यावर होणारा भांडवली नफादेखील अल्पमुदतीचा आहे. नवीन घराच्या गुंतवणुकीची वजावट अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यातून घेता येत नाही. त्यामुळे आपल्याला या भांडवली नफ्यावर आपल्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे कर भरावा लागेल. आपण घर जून २०२१ नंतर विकले असते तर आपल्याला कर भरावा लागला नसता.

’  प्रश्न : मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. माझा २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा देय कर १,२५,००० आहे. माझ्या उत्पन्नात धंदा-व्यवसायाचा समावेश नसल्यामुळे मी विवरणपत्र भरण्यापूर्वी कर भरतो. या वर्षी विवरणपत्र भरण्याची मुदत ३० सप्टेंबर २०२१ इतकी केली आहे. या वर्षी मी हा कर ३० सप्टेंबर २०२१ पूर्वी भरू शकतो का? (लेख प्रसिद्ध होईपर्यंत विवरणपत्र भरण्याची मुदत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढविण्याचा निर्णय आला आहे.)   – नीलकंठ मयेकर

उत्तर : ज्या करदात्यांचा देय कर (उद्गम कर, अग्रिम कर वजा जाता) एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशा करदात्यांनी ३१ जुलै २०२१ पर्यंत कर भरल्यास विवरणपत्र विलंबाने भरल्यास द्यावे लागणारे ‘कलम २३४ अ’नुसार व्याज भरावे लागणार नव्हते. ज्या करदात्यांनी अशी कराची रक्कम भरली नसल्यास त्यांना १ ऑगस्टपासून दरमहा १% या दराने व्याज भरावे लागेल. आपला देय कर १ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे आपल्याला दरमहा १% या दराने १,२५० रुपये व्याज, कर भरण्याच्या महिन्यापर्यंत भरावे लागेल.

 लेखक सनदी लेखाकार आणि

कर सल्लागार आहेत.

pravin3966@rediffmail.com