सुधीर जोशी

करोनामुळे असलेल्या टाळेबंदीसारख्या कठीण परिस्थितीमध्ये बाजारात मोठय़ा तेजीचा उत्सव सुरू होता. आता उद्योग व्यवसाय सुरू झाल्यावर मात्र बाजार चिंताग्रस्त आहे. कारण बाजार भविष्यातील आशा-निराशेच्या संकेतावर प्रतिक्रिया देत असतो. बाजारात ज्या वेळी घसरण झाली असेल आणि चांगल्या कंपन्यांचे समभाग कमी किमतीत उपलब्ध असतील त्यावेळी गुंतवणूकदारांनी उत्तम कामगिरी करणाऱ्या व कर्जाचे प्रमाण कमी असणाऱ्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.  

अमेरिकेत महागाईने गेल्या चाळीस वर्षांतील उच्चांक मोडीत काढला आहे. त्यामुळे अमेरिकी मध्यवर्ती बँक – ‘फेडरल रिझव्‍‌र्ह’च्या धोरणाबद्दलची भीती सरलेल्या सप्ताहाच्या सुरुवातीला आणखी गहिरी झाली होती. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत लक्षात घेऊन भारतीय भांडवली बाजारात मोठी घसरण झाली. प्रमुख निर्देशांक पहिल्याच दिवशी अडीच टक्के खाली आले. सप्ताहाच्या दरम्यान अमेरिकी ‘फेड’ने व्याजदरात ०.७५ टक्क्यांची वाढ केली आणि जुलै महिन्यात परत एकदा अशीच वाढ करण्याचे संकेत दिले. महागाई नियंत्रणाबाबत फेड गांभीर्याने पावले उचलत आहे. अमेरिकी बाजाराला हे भावले व त्यामुळे तेथील बाजारात तेजीची तात्काळ प्रतिक्रिया दिसली. पण दुसऱ्याच दिवशी यातील फोलपणा जाणवला, कारण नजीकच्या काळात व्याजदरात अजून बरीच वाढ बघावी लागणार आहे. त्यामुळे अमेरिकी बाजारात घसरण झाली. भारतीय बाजारही सध्या अमेरिकेच्या बाजाराशी सुसंगती राखत आहेत. यामुळे रोजच होणाऱ्या घसरणीने सप्ताहअखेर दोन्ही प्रमुख निर्देशांक पाच टक्क्यांहून जास्त खाली आले आहेत.

सिमेन्स : भारतातील अभियांत्रिकी, ऊर्जा व्यवस्थापन, आरोग्याशी निगडित तंत्रज्ञान, ऑटोमेशन व कंट्रोल, रेल्वे सिग्नल्स व सुरक्षा प्रणाली अशा अनेक उच्च तांत्रिक सेवा देणाऱ्या क्षेत्रांशी निगडित या कंपनीचा व्यवसाय आहे. कंपनीकडे पहिल्या सहा महिन्यांच्या अखेरीस १७,००० कोटींच्या मागण्या आहेत. गेल्या वर्षांच्या तुलनेत त्यात ६० टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीचे आर्थिक वर्ष सप्टेंबर अखेर संपते. सरकारी आणि खासगी भांडवली प्रकल्पातील संधी घेण्यासाठी सिमेन्सच्या समभागांमधे गुंतवणूक करता येईल. पहिल्या सहा महिन्यांत सेमीकंडक्टर चिपचा तुटवडा, कच्च्या मालाच्या किमतीतील वाढ आणि पुरवठा साखळीतील अडचणींमुळे कंपनीच्या नफ्यावर परिणाम झाला. मात्र पुढील एक-दोन वर्षांचा विचार करता कंपनीमधील गुंतवणूक फायद्याची होईल. गेल्या काही दिवसांतील बाजारातील तीव्र चढ-उतारात या कंपनीचे समभाग आपली पातळी टिकवून आहेत. ही जमेची बाजू आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज : इंधन तेलाच्या जगभरातील वाढत्या मागणीमुळे रिफायिनग मार्जिनमधे गेले काही आठवडे सातत्याने वाढ होत आहे. रशियाकडून इंधन तेल घेण्यास लादलेले निर्बंध, चीनने तेल निर्यातीवर घातलेली बंदी यामुळे इंधन तेलाच्या पुरवठय़ामधे पोकळी निर्माण झाली आहे. याचा फायदा उठवायची तत्परता रिलायन्समध्ये आहे. हरित ऊर्जा व हायड्रोजनरूपी इंधन या उभरत्या क्षेत्रात रिलायन्सची आगेकूच सुरू आहे. त्यासाठी गेल्या काही महिन्यांत या क्षेत्रातील तांत्रिक आघाडी असलेल्या आरईसी सोलर, अंबरी, लिथियम वर्क्‍स फॅराडियॉन अशा अनेक कंपन्यांमधे भागीदारी केली आहे. कंपनीचे दूरसंचार, किरकोळ विक्री दालने असे अन्य व्यवसायही जोराने प्रगती करीत आहेत. त्या व्यवसायांची स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याचीही अपेक्षा आहे. रिलायन्सचे समभाग या पडझडीमधे स्थिर आहेत. त्यामध्ये गुंतवणूक करणे कमी जोखमीचे आहे.

 मारुती सुझुकी : पुढील दोन ते अडीच वर्षांत मारुती सुझुकी कंपनी नवीन वाहने बाजारात सादर करीत आहे, तसेच आधीच्या काही वाहनांची नवी आवृत्ती बाजारात आणता येणार आहे. एसयूव्ही श्रेणीमध्येदेखील नवीन मालिका बाजारात येत आहेत. सेमीकंडक्टर चिपच्या पुरवठय़ात सुधारणा होत आहे तसेच कच्च्या मालाच्या किमती कमी होत आहेत. रुपयाच्या तुलनेतील जपानी येनचा विनिमय दरही कंपनीला फायद्याचा होत आहे. सध्याच्या अनिश्चिततेच्या काळात ही एक कमी जोखमीची गुंतवणूक मानता येईल.

गेली दोन वर्षे करोनामुळे असलेल्या टाळेबंदीसारख्या कठीण परिस्थितीमध्ये बाजारात मोठय़ा तेजीचा उत्सव सुरू होता. आता उद्योग व्यवसाय सुरू झाल्यावर मात्र बाजार चिंताग्रस्त आहे. असा विरोधाभास बाजारात पाहायला मिळतो आहे. कारण बाजार भविष्यातील आशा-निराशेच्या संकेतावर प्रतिक्रिया देत असतो. रिझव्‍‌र्ह बँकेने योजलेले उपाय इंधनावरील उत्पादन शुल्कात केलेली कपात यासारख्या उपायांनी किरकोळ किमतींवर आधारित महागाईचा दर एप्रिल महिन्याच्या ७.७९ टक्क्यांवरून मे महिन्यात ७.०४ टक्के इतका खाली आला. ही दिलासा देणारी बाब आहे.

मोसमी पावसाची काही दिवसात होणारी सुरुवात आणखी दिलासा देऊ शकेल. पण अजूनही महागाईचा दर रिझव्‍‌र्ह बँकेच्या सहनशील मर्यादेच्या पलीकडेच आहे. आणखी व्याजदर वाढ करावी लागणार आहे. अमेरिकी बाजारात रोख्यांवरील परतावा जोपर्यंत वाढत आहे, तोपर्यंत परदेशी गुंतवणूकदारांचा भांडवली बाजारातील विक्रीचा जोर कायम राहील. रशिया-युक्रेनचे युद्ध व इंधनाचे दर यांचे मोठे आव्हान भारतीय अर्थव्यवस्थेपुढे आहे. त्यामुळे येणारा काळ हा शेअर बाजारात कमाई करण्यासाठी बिकट आहे यात शंका नाही. गुंतवणूकदारांनी उत्तम कामगिरी करणाऱ्या व कर्जाचे प्रमाण कमी असणाऱ्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. 

सप्ताहातील काही निवडक घटना:

१) बजाज ऑटोने समभागांच्या पुनर्खरेदीची (बायबॅक) घोषणा लांबणीवर टाकली. बजाज ऑटोच्या समभागात मोठी घसरण झाली आहे. मात्र  कंपनीकडे उपलब्ध असलेले रोखतेचे प्रमाण बघता यावर पुन्हा विचार होऊ शकेल. पण समभागांची किंमत ३,६०० रुपयांच्या खाली आली तर या समभागात नवीन खरेदीची संधी ठरेल.

२ ) चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत प्रत्यक्ष कराच्या संकलनात ४५ टक्के वाढ झाली आहे. जगातील अनेक देश विविध संकटांचा सामना करीत असताना भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असण्याचा हा संकेत आहे.

sudhirjoshi23@gmail.com