प्रवीण देशपांडे pravin3966@rediffmail.com

मागील लेखात आपण तोटा झाल्यानंतर तो कोणत्या उत्पन्नातून वजा करता येतो ते बघितले. असा वजा न झालेला तोटा पुढील वर्षांसाठी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करता येतो. असा ‘कॅरी-फॉरवर्ड’ केलेला तोटा पुढील वर्षांत कसा, कोणत्या उत्पन्नातून वजा करता येईल आणि विवरणपत्रात तो कसा आणि कोठे दाखवायचा, याविषयी ही माहिती..

shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
Techie doubles his income
वर्षाला १ कोटी रुपये कमावण्यासाठी व्यक्तीने शोधला जुगाड, लाखोंचे शैक्षणिक कर्जही फेडलं, एकाच वेळी केल्या….
Agra Woman Plans Husband Murder
पतीला ठार करण्यासाठी पत्नीने दिली ऑनलाईन ‘सुपारी’, What’s App वर ठेवलं ‘हे’ स्टेटस

करदात्याला तोटा पुढील वर्षी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करताना काळजी घेणे गरजेचे आहे. याची योग्य नोंद न ठेवल्यास झालेल्या तोटय़ाचा फायदा करदाता घेऊ  शकणार नाही. ज्या वर्षीचा तोटा पुढील वर्षांसाठी कॅरी-फॉरवर्ड करावयाचा आहे, त्या वर्षीचे विवरणपत्र मुदतीत दाखल करणे बंधनकारक आहे. याला अपवाद घरभाडे उत्पन्न या स्रोतातील तोटा हा आहे. विवरणपत्र मुदतीत दाखल केले नसले तरी या स्रोतातील तोटा पुढील वर्षांत ‘कॅरी-फॉरवर्ड’ करता येतो. मूळ विवरणपत्र मुदतीत भरताना विवरणपत्रात जर तोटा दाखवायचा राहिला आणि तो सुधारित विवरणपत्र मुदतीनंतर भरताना दाखविल्यास, तोटा वजा करण्याचा मुद्दा वादाचा होऊ  शकतो. विविध न्यायालयांनी आणि प्राधिकरणांनी यावर वेगवेगळे निर्णय दिले आहेत.

किती वर्षांसाठी आणि कसा वजा करता येतो – एका उत्पन्नाच्या स्रोतामध्ये झालेला तोटा त्याच स्रोतामधून वजा होत नसेल आणि तो इतर स्रोतामधील उत्पन्नामधून वजा होत नसेल तर तो पुढील वर्षांसाठी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करता येतो. यासाठी खालील तरतुदी आहेत –

१. घरभाडे उत्पन्न या स्रोतातील तोटा : हा तोटा त्याच स्रोतातील उत्पन्नातून किंवा इतर उत्पन्नातून वजा न झाल्यास पुढील आठ वर्षांसाठी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करता येतो. पुढील वर्षांमध्ये हा तोटा फक्त घरभाडे उत्पन्नातूनच वजा करता येतो. हा तोटा पुढील वर्षांसाठी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करताना विवरणपत्र मुदतीत दाखल केले पाहिजे अशी अट नाही.

२. धंदा-व्यवसायातील उत्पन्न या स्रोतातील तोटा : सट्टा व्यवहाराव्यतिरिक्त धंदा-व्यवसायातून झालेला तोटा हा या वर्षीच्या उत्पन्नातून वजा होत नसेल तर तो पुढील आठ वर्षांसाठी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करता येतो आणि पुढील वर्षांमध्ये तो फक्त धंदा-व्यवसायाच्या उत्पन्नातूनच वजा करता येतो. सट्टा व्यवसायातील तोटा हा त्याच वर्षीच्या सट्टा व्यवसायाच्या नफ्यातून वजा न झाल्यास पुढील चार वर्षांसाठी तो ‘कॅरी-फॉरवर्ड’ करता येतो; परंतु पुढील वर्षांमध्येसुद्धा हा तोटा फक्त सट्टा व्यवसायाच्या उत्पन्नातूनच वजा करता येतो. हा तोटा पुढील वर्षांसाठी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करण्यासाठी त्या वर्षीचे विवरणपत्र मुदतीत दाखल करणे बंधनकारक आहे.

३. भांडवली नफा या स्रोतातील तोटा : भांडवली तोटा हा या वर्षीच्या उत्पन्नातून वजा होत नसेल तर तो पुढील आठ वर्षांसाठी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करता येतो आणि पुढील वर्षांमध्ये तो फक्त भांडवली नफ्यातूनच वजा करता येतो; परंतु दीर्घमुदतीचा भांडवली तोटा हा पुढील वर्षी फक्त दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातूनच वजा करता येतो. अल्प मुदतीचा भांडवली तोटा हा पुढील वर्षी दीर्घ आणि अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येतो. हा तोटा पुढील वर्षांसाठी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करण्यासाठी त्या वर्षीचे विवरणपत्र मुदतीत दाखल करणे बंधनकारक आहे.

४. घोडय़ाच्या शर्यतीतील तोटा :  असा तोटा फक्त घोडय़ाच्या शर्यतीतील उत्पन्नातूनच वजा करता येतो आणि तो वजा न झाल्यास पुढील चार वर्षांसाठी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करता येतो आणि पुढील वर्षांत हा तोटा फक्त घोडय़ाच्या व्यवसायातील उत्पन्नातूनच वजा करता येतो. हा तोटा पुढील वर्षांसाठी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करण्यासाठी त्या वर्षीचे विवरणपत्र मुदतीत दाखल करणे बंधनकारक आहे.

करदात्याने, तोटा पुढील वर्षी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करताना, खालील मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत –

१. या वर्षीचे विवरणपत्र भरताना ‘बीएफएलए’ या सदरात उत्पन्नाच्या प्रत्येक स्रोतात चालू वर्षांचे उत्पन्न (चालू वर्षांचा तोटा वजा जाता), मागील वर्षांत ‘कॅरी-फॉरवर्ड’ केलेला तोटा आणि चालू वर्षांचे उत्पन्न (मागील वर्षांचा तोटा वजा जाता) ही माहिती भरावी लागेल. कोणताही तोटा नसला तरी हे सदर तोटा ‘शून्य’ भरून पूर्ण करावे लागेल.

२. विवरणपत्राच्या ‘सीएफएल’ या सदरात पुढील वर्षांत उत्पन्नाच्या प्रत्येक स्रोतात ‘कॅरी-फॉरवर्ड’ करण्यात येणारे तोटे आणि ज्या वर्षांचा तोटा आहे, त्या वर्षांचे विवरणपत्र दाखल केल्याची तारीखसुद्धा नमूद करावी लागते. एखाद्या वर्षी विवरणपत्र मुदतीत दाखल केलेले नसल्यास त्या वर्षीचा तोटा पुढील वर्षीच्या उत्पन्नातून वजा करता येत नाही.

३. करदात्याचा तोटा वर नमूद केल्याप्रमाणे आठ किंवा चार वर्षांत नफ्यातून वजा होत नसेल तर तोटय़ाचा हक्क लोप पावेल.  

वाचकांकडून आलेल्या प्रश्नांचे निरसन..

*प्रश्न : मला समभागाच्या विक्रीतून अल्प मुदतीचा तोटा झाला आणि प्लॉटच्या विक्रीतून दीर्घ मुदतीचा नफा झाला. मी या वर्षीचे विवरणपत्र मुदतीत दाखल केले नाही तर मला समभागाच्या विक्रीतून झालेला तोटा प्लॉटच्या विक्रीतून झालेल्या नफ्यातून वजा करता येईल का?  

– सीमा काळे

उत्तर : विवरणपत्र मुदतीत दाखल केले नसल्यास हा तोटा पुढील वर्षांत ‘कॅरी-फॉरवर्ड’ करता येत नाही; परंतु त्याच वर्षीचा तोटा त्याच वर्षीच्या नफ्यातून, विवरणपत्र मुदतीनंतर दाखल केले असले तर, वजा करता येतो.    

* प्रश्न : मला गेल्या सहा वर्षांपासून (२०१५ पासून) झालेला भांडवली तोटा मी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करीत आलेलो आहे. मागील वर्षीसुद्धा मला भांडवली तोटा होता. मागील वर्षांचे विवरणपत्र मी मुदतीत दाखल करू शकलो नाही. मला मागील सहा वर्षांपासून ‘कॅरी-फॉरवर्ड’ केलेला तोटा या वर्षी उत्पन्नातून वजा करता येईल का? प्रशांत खोत

उत्तर : प्राप्तिकर कायद्यानुसार ज्या वर्षी तोटा झालेला आहे त्या वर्षीचे विवरणपत्र मुदतीत दाखल केले तरच तो तोटा पुढील वर्षी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करता येतो. मागील सहा वर्षांचे (ज्या वर्षी तोटा आहे) विवरणपत्र मुदतीत दाखल केले असले आणि या वर्षीचे विवरणपत्र मुदतीनंतर दाखल केले तर फक्त या वर्षीचा तोटा ‘कॅरी-फॉरवर्ड’ करता येणार नाही, मागील वर्षांचा तोटा ‘कॅरी-फॉरवर्ड’ करता येईल.

*प्रश्न : मी माझ्या पत्नीच्या (वय ६५ वर्षे) कर्करोगावरील वैद्यकीय उपचारासाठी १,२५,००० रुपये खर्च केले. मला विमा कंपनीकडून ३५,००० रुपये मिळाले. मला माझ्या उत्पन्नातून याची वजावट मिळेल का? आणि मिळत असल्यास ती किती मिळेल?  एक वाचक

उत्तर : कलम ‘८० डीडीबी’नुसार ठरावीक रोगांवरील उपचारासाठी केलेल्या वैद्यकीय खर्चाची एक लाख रुपयांपर्यंतची (ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे, अन्यथा ४०,००० रुपये) वजावट मिळू शकते. कर्करोगाचा ठरावीक रोगांत समावेश होत असल्यामुळे आपल्याला वजावट मिळू शकते. आपल्याला विमा कंपनीकडून ३५,००० रुपये मिळालेले असल्यामुळे ६५,००० रुपयांची (पात्र वजावट १ लाख रुपये वजा ३५,००० रुपये विम्याचे) वजावट घेता येईल.

लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत.