करावे कर-समाधान : वार्षिक माहिती विधान (एआयएस) काय आहे?

गेल्या काही वर्षांपासून करदात्याविषयी बरीच माहिती ‘फॉर्म २६एएस’मध्ये दर्शविली जाते.

प्रवीण देशपांडे pravin3966@rediffmail.com

गेल्या काही वर्षांपासून करदात्याविषयी बरीच माहिती ‘फॉर्म २६एएस’मध्ये दर्शविली जाते. परदेशात पाठविलेल्या पैशांची माहितीदेखील यात दाखविण्यात येते. करदात्याने विवरणपत्र भरताना या माहितीचा वापर करावा, जेणेकरून प्राप्तिकर खात्याकडे विविध मार्गानी गोळा झालेली माहिती आणि करदात्याकडे असलेली माहिती यात तफावत आढळणार नाही. विवरणपत्र भरताना करदात्याने संपूर्ण आर्थिक वर्षांत केलेल्या व्यवहारांची माहिती देणे गरजेचे असते. या व्यवहारांची माहिती योग्य पद्धतीने करदात्याने ठेवली नसेल आणि विवरणपत्रात ही माहिती जाणते-अजाणतेपणी दाखवायची राहून गेली तर पुढे व्याज आणि दंड भरावा लागू शकतो.

नवीन वार्षिक माहिती विधान (एआयएस) कसे आहे?

करदात्याची अडचण दूर करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने नुकतेच नवीन वार्षिक माहिती विधान (अॅन्युअल इन्फर्मेशन स्टेटमेंट – एआयएस) आणले आहे. हे ‘फॉर्म २६एएस’चे विस्तारित स्वरूप आहे ज्यात करदात्याची सर्वसमावेशक माहिती अनुपालन संकेतस्थळावर बघता येते आणि त्यावर ऑनलाइन अभिप्रायसुद्धा देता येतो. याचबरोबर या माहितीचा सारांशदेखील सरलीकृत माहिती सारांश (टीआयएस) या स्वरूपात वेगळा बघता येतो. 

सरलीकृत माहिती सारांश काय आहे?

करदात्याचा सरलीकृत माहिती सारांशदेखील तयार करण्यात आला आहे. यामध्ये व्यवहाराचे एकत्रित मूल्य दाखवले आहे, जेणेकरून करदात्याला विवरणपत्र भरणे सोपे जाईल. करदाता या माहितीचा उपयोग करून आवश्यक ते सर्व व्यवहार विवरणपत्रात दाखवू शकतो.

वार्षिक माहिती विधान कसे बघावे?

नवीन ‘एआयएस’ बघण्यासाठी नवीन प्राप्तिकर ई-फायलिंग संकेतस्थळावर (https://www.incometax.gov.in) ‘सेवा’ (सव्‍‌र्हिसेस) टॅबअंतर्गत ‘एआयएस’ या दुव्यावर ‘क्लिक’ करावे लागेल. नवीन ‘एआयएस’मध्ये व्याज, लाभांश, समभागाशी संबंधित व्यवहार, म्युच्युअल फंड व्यवहार, परदेशी प्रेषण माहिती वगैरे आणि अतिरिक्त माहिती समाविष्ट आहे. करदात्याला ही माहिती ‘पीडीएफ’, ‘जेसॉन’, ‘सीएसव्ही’ स्वरूपात डाऊनलोड करता येईल. पॅन आणि जन्मतारीख यांचा मेळ असलेला पासवर्ड टाकून ही फाइल उघडता येईल. 

वार्षिक माहिती विधानामध्ये कोणती माहिती आहे?

‘एआयएस’मध्ये प्रामुख्याने खालील माहिती दाखविली आहे –

१. करदात्याची माहिती – नाव, पत्ता, आधार क्रमांक, जन्मतारीख इ.

२. उद्गम कर, गोळा केलेल्या करासंबंधी माहिती.

३. निर्दिष्ट आर्थिक व्यवहार (स्पेसिफाइड फायनान्शिअल ट्रान्झॅक्शन) – यात लाभांश, बचत खात्यावरील व्याज, मुदत ठेवींवरील व्याज, समभाग आणि म्युच्युअल फंडातील युनिट्सची खरेदी आणि विक्री.

४. कर भरल्याची माहिती.

५. प्राप्तिकराची मागणी आणि कर परताव्याची (रिफंड) माहिती  

वरील सर्व माहिती ‘फॉर्म २६एएस’मध्ये सध्या संक्षिप्त रूपात उपलब्ध आहे; परंतु या ‘एआयएस’मध्ये सर्वसमावेशक स्वरूपात ही माहिती देण्यात आलेली आहे.

अभिप्राय कसा सादर करावा?

करदात्यांनी ‘एआयएस’मध्ये दर्शविलेली माहिती तपासून त्या माहितीमध्ये बदल आवश्यक असल्यास अभिप्राय दाखल करावा. जर करदात्याला वाटत असेल की, ‘एआयएस’मधील माहिती चुकीची आहे, इतर व्यक्ती/वर्षांशी संबंधित आहे किंवा दोनदा (डुप्लिकेट) भरली गेली असेल तर ऑनलाइन पद्धतीने अभिप्राय सादर करण्याची सुविधादेखील प्रदान करण्यात आली आहे. करदात्याला ऑफलाइन पद्धतीने अभिप्राय अपलोड करण्याची सुविधादेखील उपलब्ध आहे. प्राप्तिकर खात्याकडे उपलब्ध असलेली माहिती आणि करदात्याच्या अभिप्रायानंतरची माहिती ‘एआयएस’मध्ये वेगळी दाखविली जाईल. करदात्याने ‘एआयएस’मधील प्राप्तिकर खात्याकडे उपलब्ध असलेली माहिती अभिप्रायाद्वारे बदलल्यास किंवा मान्य नसल्यास त्याच्या पुष्टीकरणासाठी प्राप्तिकर खात्याकडून त्या माहितीचा स्रोत तपासला जाऊ  शकतो. करदात्याने ‘एआयएस’वर अभिप्राय सादर केल्यास, ही माहिती विवरणपत्राच्या प्री-फिलिंगसाठी वापरली जाईल.

विवरणपत्र भरताना – विवरणपत्र दाखल करताना करदाता माहिती सारांशमध्ये (टीआयएस) दर्शविलेली माहिती वापरू शकतो. जर करदात्याने विवरणपत्र आधीच दाखल केले असेल आणि काही माहिती विवरणपत्रामध्ये समाविष्ट करायची राहिली असल्यास, योग्य माहिती प्रतिबिंबित करण्यासाठी विवरणपत्रात सुधारणा करता येईल. करदात्यांनी लक्षात ठेवावे की, ‘एआयएस’मध्ये सध्या प्राप्तिकर विभागाकडे उपलब्ध असलेली माहिती समाविष्ट आहे. करदात्याशी संबंधित इतर व्यवहार असू शकतात, जे सध्या ‘एआयएस’मध्ये प्रदर्शित केलेले नाहीत. करदात्यांनी सर्व संबंधित माहिती तपासली पाहिजे आणि प्राप्तिकर विवरणपत्रामध्ये संपूर्ण आणि अचूक माहिती दिली पाहिजे.

फॉर्म २६एएस – नवीन ‘एआयएस’ पूर्णपणे कार्यरत होईपर्यंत करदात्याला फॉर्म ‘२६एएस’मध्ये उपलब्ध असलेली माहितीसुद्धा बघता येईल. या माहितीचा करदात्याने उपयोग करावा. यात तफावत असल्यास ती वेळीच दुरुस्त करून घ्यावी, जेणेकरून विवरणपत्र दाखल करताना चूक होणार नाही आणि भविष्यात प्राप्तिकर खात्याकडून येणाऱ्या नोटिशी टाळता येतील. 

वाचकांकडून आलेल्या प्रश्नांचे निरसन..

* प्रश्न : मी प्राप्तिकर  खात्याच्या संकेतस्थळावर अद्याप नोंदणी केलेली नाही. मला एआयएस कसे बघता येईल? – ओंकार  काळे

उत्तर : आपल्याला एआयएस बघावयाचे असेल तर प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावर आपल्याला लॉग-इन करून आणि नोंदणी करावी लागेल आणि वर सांगितल्याप्रमाणे एआयएस आपल्याला बघता येईल.    

* प्रश्न : एआयएस आणि फॉर्म २६ एएस यामध्ये काय फरक आहे? – अनंत सावंत

उत्तर : ‘एआयएस’ हे फॉर्म २६ एएस चे विस्तारित स्वरूप आहे. नवीन एआयएस पूर्णपणे कार्यरत होईपर्यंत करदात्याला फॉर्म २६ एएस मध्ये उपलब्ध असलेली माहिती सुद्धा बघता येईल.

* लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tax satisfaction annual information statement ais ysh

ताज्या बातम्या