पगारदार व्यक्तींना जो पगार मिळतो त्यामध्ये मूळ वेतन (बेसिक) आणि महागाई भत्ता तसेच इतर काही भत्त्यांचा (अलाऊन्सेस) यांचा समावेश असतो. शिवाय कामाशी संबंध असलेली पण पगाराव्यतिरिक्त मिळणारी रक्कम (ज्याला परक्विझिट्स अथवा पर्क्‍स म्हणतात) तीही समाविष्ट असते. या भत्ते आणि पर्क्‍स यांद्वारे मिळणाऱ्या रकमेचे योग्य प्रकारे नियोजन करून त्यावर बऱ्याच प्रमाणात प्राप्तिकर वाचविता येतो. आजच्या लेखात एखाद्या पगारदार व्यक्तीला घरभाडे भत्ता (हाऊस रेंट अलाऊन्स- एचआरए) मिळत असेल तर त्यावर प्राप्तिकर कसा वाचविता येईल ते पाहू.
पगारदार स्वमालकीच्या जागेत राहून घरभाडे भत्ता मिळवीत असेल तर तो भत्ता त्याला स्वाभाविकच करमुक्त मिळणार नाही. पण स्वत:ची जागा नसेल आणि निवासासाठी भाडे भरत असेल अशा पगारदार व्यक्तीला मिळणारा घरभाडे भत्ता करमुक्त मिळू शकतो. अनेक पगारदार व्यक्ती त्यांच्या वडिलांच्या, आईच्या, पत्नीच्या, भावाच्या मालकीच्या घरात राहतात. अशा व्यक्तींना प्राप्तिकर कायद्याच्या कलम १० (१३ अ) व नियम ‘२ अ’ नुसार घरभाडे भत्ता करमुक्त मिळण्यासंदर्भात तरतूद आहे. तेव्हा सर्वप्रथम या तरतुदींची ओळख करून घेऊ.
वरील नियमांनुसार एखाद्या व्यक्तीला घरभाडे भत्ता मिळत असेल तर खालीलपैकी जी कमीत कमी रक्कम असेल ती रक्कम त्या पगारदाराला संपूर्णपणे प्राप्तिकर मुक्त असते. ही रक्कम मोजताना ‘पगार’ या संज्ञेमध्ये बेसिक पगार आणि महागाई भत्ता या दोन रकमांचा समावेश केला जातो.
१. जर ती व्यक्ती मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई यापैकी एखाद्या शहरात राहत असेल तर पगाराच्या ५०% आणि जर ती व्यक्ती ही शहरे सोडून दुसऱ्या एखाद्या शहरात राहत असेल तर पगाराच्या ४०% एवढी रक्कम अथवा
२. प्रत्यक्षात मिळणाऱ्या घरभाडे भत्त्याची रक्कम किंवा
३. ती व्यक्ती ज्या घरात राहते त्यासाठी पगाराच्या रकमेच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त एवढय़ा दिलेल्या भाडय़ाची रक्कम. दुसऱ्या भाषेत दिलेले घरभाडे वजा पगाराच्या १०% एवढी रक्कम.
वरील तीन रकमांपैकी जी रक्कम कमी असेल ती त्या व्यक्तीला प्राप्तिकर मुक्त मिळेल. त्यासाठी अशा व्यक्तीने खालील नियमांचे पालन करायला हवे.
१. तो राहत असलेले घर स्वत:च्या मालकीचे असता कामा नये.
२. तो राहत असलेल्या घरासाठी त्याने घरमालकाला भाडे स्वरूपात रक्कम देणे आवश्यक आहे.
एक उदाहरण घेऊन घरभाडे भत्ता करमुक्त कसा मिळेल हे जाणून घेऊ यात. समजा एखादी पगारदार व्यक्ती मुंबई शहरात त्याच्या वडिलांच्या नावे मालकी असलेल्या फ्लॅटमध्ये राहते आहे. या व्यक्तीला बेसिक पगार आणि महागाई भत्ता असा मिळून वर्षांला ५ लाख रुपये पगार आहे. या व्यतिरिक्त या व्यक्तीला वर्षांला ५०,००० रुपये एवढा घरभाडे भत्ती मिळतो आहे. आता नियोजन म्हणजे प्राप्तिकर नियोजन करून मिळणारा हा ५० हजार रुपयांचा घरभाडे भत्ता करमुक्त कसा मिळेल? तर ही व्यक्ती त्याच्या वडिलांच्या मालकीच्या घरात राहत असल्याने या व्यक्तीने आपल्या वडिलांना दरमहा रु. १० हजार म्हणजे दरसाल रु. १,२०,००० एवढे घरभाडे द्यावे. अर्थात त्याची रीतसर पावती घेऊन ती त्याच्या कंपनीतील योग्य त्या खात्याच्या पदाधिकाऱ्यांना सादर करावी. असे केल्यास खाली नमूद केल्याप्रमाणे त्या व्यक्तीला मिळणारा ५० हजार रुपयांचा घरभाडे भत्ता संपूर्णपणे करमुक्त मिळेल.
१. पगाराच्या ५०% एवढी रक्कम म्हणजे रु. २५०,००० किंवा
२. प्रत्यक्षात मिळालेला घरभाडे भत्ता म्हणजे रु. ५०,००० किंवा
३. घरभाडे वजा पगाराच्या १०% एवढी रक्कम म्हणजे रु. १२०,००० वजा रु. ५०,००० म्हणजे रु. ७०,०००. यापैकी सर्वात कमी रक्कम आहे रु. ५०,००० जी संपूर्णपणे करमुक्त मिळेल. म्हणजेच मिळालेला घरभाडे भत्ती पूर्णपणे करमुक्त मिळेल.
अशा पद्धतीने प्राप्तिकर नियोजन करण्याचे फायदे म्हणजे.
१. भाडे देणाऱ्या पगारदार व्यक्तीला मिळणारा घरभाडे भत्ता करमुक्त मिळेल.
२. घरभाडय़ाची रक्कम कुटुंबातील सदस्याकडेच राहील आणि त्यातून हा सदस्य प्राप्तिकर दाता नसेल तर ‘सोन्याहून पिवळेच’!
आजच्या लेखात आपण ज्या पगारदार व्यक्तीच्या नावे स्वत:चे घर नाही आणि ज्यांना त्यांच्या कंपनीमधून घरभाडे भत्ता मिळतो त्यांना हा भत्ता करमुक्त कसा मिळेल हे पाहिले. पण पगारदारांमध्ये अशाही व्यक्ती असतील की ज्यांच्या नावे स्वत:चे घर तर नाहीच पण त्यांना घरभाडे भत्ताही मिळत नाही. अशा व्यक्तींना प्राप्तिकर कायद्यामध्ये प्राप्तिकर वाचविण्यासाठी काही सवलत आहे का? हो, निश्चितच आहे. कुठली ते पुढच्या लेखात अभ्यासूया.