वित्त विचार : दीर्घावधीचा विचार म्हणजे नेमका कालावधी किती?

स्तंभात म्हटल्याप्रमाणे बँकांतील ठेवींना गुंतवणूक नियोजनांत माझ्या लेखी बिलकुल स्थान नसावे.

म्युच्युअल फंडात जोखीम ही तुम्ही मानली तरच आहे. या बाजारात तुम्ही जितके जास्त घाबराल, जितकी जास्त तुमची धांदल-तिरपिट उडेल तितकी तुमची जोखीम जास्त, असा एक सरळसोट नियम आहे.

जसे की या स्तंभात अनेकवार सांगितले गेले आहे की, दीर्घावधीत समभागसंलग्न अर्थात इक्विटी म्युच्युअल फंड हाच सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय आहे. या विधानाचा नेमका प्रत्यवाय सांगणारा काळ नजीकच आहे, हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. कारण विद्यमान गुंतवणुकीच्या वातावरणाकडे काळजीपूर्वक पाहिल्यास लक्षात येईल की, सोने-अडके, जमीनजुमला इतकेच काय रोखे गुंतवणुकीतूनही चांगला परतावा मिळणे दुरापास्त बनले आहे. येणाऱ्या काळात या स्थितीत पालटाची शक्यताही धूसर आहे. या सारख्या गुंतवणूक पर्यायात जोखीम अटळच आणि तिला टाळणे आपल्या हातीही नसते. जे गुंतवणूकदार जोखीमेच्या अनुभूतीपासून बचावले आणि चांगला लाभही त्यांनी मिळविला असेल तर ते फक्त बलवत्तर नशीब असल्यानेच म्हणावे लागेल. कसलीच जोखीम नको म्हणून बँकांत ठेवी करायच्या तर तेथेही व्याज दर उत्तरोत्तर कमी होत जातील असे वातावरण आहे. शिवाय आधी याच स्तंभात म्हटल्याप्रमाणे बँकांतील ठेवींना गुंतवणूक नियोजनांत माझ्या लेखी बिलकुल स्थान नसावे.

त्यामुळे नशीबाच्या भरवशावर गुंतवणुकीला सोडणार की आपण खरेच सुयोग्य पर्याय निवडणार? असा आजचा सवाल आहे. सरळमार्गी गुंतवणुकीतून बऱ्यापैकी निश्चिंतता व लाभ हवा असल्यास इक्विटी हाच पर्याय मग समोर दिसतो. ही गुंतवणूक मग थेट समभागांत (जर तेवढी हिंमत, निरीक्षण व अनुभव गाठीशी असेल तर!) अथवा म्युच्युअल फंडांमार्फत करणे संयुक्तिक ठरेल. किमान नशीबाच्या हवाल्यावर तरी ही गुंतवणूक नसेल! तर येथे आपल्याला मनजोगता परतावा मिळणे हे आपल्या व्यवहार कौशल्यावर, दीर्घावधीतील सातत्य आणि संयमावर अवलंबून असेल.

म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीबाबतीत दीर्घावधीचा विचार म्हणजे नेमका कालावधी किती? या प्रश्नाबाबत आपल्या मनांत पुरती स्पष्टता असायला हवी. इक्विटी फंडातील एक वर्ष, दोन वर्ष, तीन अथवा अगदी पाच वर्षे सुरू राहिलेली गुंतवणूकही नकारात्मक परतावा देणारी ठरते, हेही लक्षात असू द्यावे. हे आज पहिल्यांदाच अथवा शेवटचे घडले आहे, असेही नाही. मग या गुंतवणुकीला जोखीमरहित कसे म्हणावे? याचे उत्तर होकारार्थी आणि नकारार्थी असे दोन्ही प्रकारचे आहे. या बाजारात तुम्ही जितके जास्त घाबराल, जितकी जास्त तुमची धांदल-तिरपिट उडेल तितकी तुमची जोखीम जास्त, असा एक सरळसोट नियम आहे. पडत्या बाजारात घाबरून तुम्ही ‘एसआयपी’ गुंतवणुकीचा शिरस्ता मोडला, गुंतलेला पैसा काढून घेतला, तर नुकसान पदरी पाडून घ्याल. मात्र न घाबरता धीराने गुंतवणूक सुरू ठेवलात तर जोखीम सोडाच, जास्त फायदा कमावला जाण्याची शक्यता आहे. अशा धीरोदात्त गुंतवणूकदारांसाठी बाजारातील चढ-उतार म्हणूनच वरदान ठरतात आणि इक्विटी म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीचा हाच सर्वोत्तम गुणविशेषही ठरतो. आता हेच पाहा ना, बाजारात असाही कालावधी असतो जेव्हा तीन-तीन वर्षांपर्यंत परतावा दृष्टीपथात नसतो, पण टिकाव धरून राहिलात तर त्या पुढच्या तीन वर्षांत चित्र अगदी विरूद्ध दिशेने पालटलेले दिसते.

आज जो बाजाराचा माहौल आहे, तो नेमका याच अनुभवाचा प्रत्यय देईल असा आहे. गेल्या वर्ष-दीड वर्षांने गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्यापासून दूर ठेवले आहे. पण अशा स्थितीत गुंतवणूक शिरस्ता न डगमगता कायम ठेवणाऱ्याला येणारा काळ भरभरून देणारा ठरेल. पारंपरिक बॉलीवूड सिनेमासारखेच हे आहे. लोकांना आवडलेल्या बहुतांश सिनेमांची चौकट एकसारखीच आहे. प्रारंभी नायक अनेक प्रकारच्या खस्ता, हालअपेष्टा सोसतो, पण तरी चिकाटी सोडत नाही. अन् चित्रपटाचा शेवट मग त्याची समृद्धी व स्वप्नपूर्ती करणारा सुखान्तच असतो. म्युच्युअल फंडात जोखीम ही अशी तुम्ही मानली तरच आहे. मात्र म्युच्युअल फंडात काही जोखीमयुक्त योजनाही आहेत, जे जास्त जोखीम, जास्त लाभ या समीकरणावर बेतल्या आहेत. पण असे पर्याय, स्वत:बद्दल खात्री असेल तर आणि चांगल्या सल्ल्यानेच स्वीकारले जावेत. अन्यथा जोखीमरहित दीर्घावधीत सुरू राहणारा नियमित ‘एसआयपी’चा पर्यायच सर्वोत्तम!

(लेखक निर्मल बंग सिक्युरिटीजमध्ये सल्लागार आहेत.)

arthmanas@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Thought on finance mutual fund

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या