सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com
गेल्या सप्ताहाची सुरुवात बाजाराच्या सावध पावित्र्याने झाली. टीसीएसच्या निकालांचे बाजारात थंडे स्वागत झाले होते. इन्फोसिसच्या निकालांनी देखील समभागांवर फारसा प्रभाव पाडला नाही, कारण बरीचशी प्रगती गृहीत धरली गेली होती. पण माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मिडकॅप कंपन्यांच्या निकालांनी बाजारात उत्साह संचारला. त्याचबरोबर रिअ‍ॅल्टी, धातू, सीमेंट औषध निर्मिती व बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांतील समभागांनी बाजारातील तेजीला सर्वसमावेशक स्वरूप दिले.

माईंड ट्रीने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील निकालांना धडाकेबाज सुरुवात केली. कंपनीच्या पहिल्या तिमाहीच्या उत्पन्नात २० टक्के तर नफ्यात ६१ टक्के वाढ झाली. कंपनीला पुढील काही तिमाहींसाठी दोन आकडी वाढ अपेक्षित आहे. इन्फोसिसच्या पहिल्या तिमाही नफ्यात २६ टक्के वाढ झाली. आता डिजिटल व्यवसायाचा सहभाग ५४ टक्कय़ांपर्यंत वाढला आहे. पुढील वर्षांसाठीच्या मिळकतीच्या अंदाजातही कंपनीने वाढ केली आहे. एल अँड टी टेक्नॉलॉजी सव्‍‌र्हिसेसने नफ्यात ८४ टक्के वाढ जाहीर केली. इंजिनीयरिंगशी निगडित तांत्रिक संशोधन सेवा देणाऱ्या या कंपनीचे ८० टक्के उत्पन्न अमेरिका व युरोपियन देशांतून मिळते. इलेक्ट्रिक वाहने, ५-जी टेलिकॉम, मेडिकल टेक्नॉलॉजी, कृत्रिम बुद्धिमत्ता व डिजिटायझेशनचा औद्योगिक क्षेत्रातील वापर यासारख्या उच्च तांत्रिक क्षेत्रात कंपनीला मोठे भविष्य आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर कंपनीचे समभाग १९ टक्कय़ांनी वर गेले. सध्याच्या उच्च पातळीवरून समभागांनी थोडी उसंत घेतली की या समभागांमध्ये जरूर गुंतवणूक करावी.

एलआयसीच्या प्राथमिक समभाग विक्रीला केंद्र सरकारने मान्यता दिली. प्रत्यक्ष बाजारात यायला सहा महिने लागू शकतात. पॉलिसीधारकांना मिळणाऱ्या राखीव कोटय़ामुळे शेअर बाजारातील जनसामान्यांचा सहभाग अजून वाढेल. शेअर बाजाराशी निगडित सीडीएसएल, बीएसई, एमसीएक्स, कॅम्स अशा कंपन्यांच्या समभागात या सप्ताहात मोठी तेजी आली. बाजारात वातावरण तेजीचे असो की मंदीचे, या कंपन्यांचा व्यवसाय निरंतर सुरू असतो. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा हे समभाग जमवून ठेवावेत. तैवानच्या सर्वात मोठय़ा सेमीकंडक्टर चिप बनविणाऱ्या कंपनीने सेमीकंडक्टरचा पुरवठा लवकरच पूर्वीसारखा होण्याचे जाहीर केल्याने टाटा मोटर्समध्ये आधीच्या सप्ताहात आलेल्या मंदीच्या लाटेला अटकाव झाला. सध्याचा भावातील खरेदी वर्षभराच्या मुदतीत चांगला फायदा मिळवून देईल.

अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्टचे (डी-मार्ट) पहिल्या तिमाहीचे निकाल कंपनीने विक्रीच्या आकडय़ात करोनापूर्व काळाच्या तुलनेत ९० टक्कय़ांची पातळी गाठल्याचे दाखवितात. परंतु नफ्याचे प्रमाण कमी झाले कारण जीवनावश्यक वस्तू सोडून बाकी वस्तू विकण्यावर व दुकाने उघडी ठेवण्यावर बंधने आहेत. पण कंपनी लवकरच पूर्वीसारखी प्रगती साधू शकेल. कंपनी या वर्षांत अजून ३५ नवी विक्री दालने उघडणार आहे. डी-मार्ट रेडी या ऑनलाइन विक्री सेवेनेही टाळेबंदीच्या काळात ग्राहकांची पसंती मिळविली आहे. कंपनी किरकोळ विक्री क्षेत्रातील दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे.

रूपा अँड कंपनी या ‘इनरवेअर’ कपडय़ांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कंपनीचे मार्चअखेरचे निकाल उमदे होते. गेल्या कठीण वर्षांत विक्रीमध्ये २५ टक्के तर नफ्यात दुप्पट वाढ झाली. कंपनी आपली विपणन व्यवस्था मजबूत करीत आहे तसेच नव्या उत्पादनांची भर घालत आहे. कंपनीची उत्पादने सर्व उत्पन्न स्तरातील ग्राहकांच्या गरजा पूर्ण करतात. या क्षेत्राची एकूण बाजारपेठ दरवर्षी ११ टक्कय़ांनी वाढत आहे. जीएसटी तसेच करोनाकाळातील संकटांमुळे लहान उत्पादकांची स्पर्धा कमी होत आहे. कंपनीला या परिस्थितीचा फायदा मिळेल. ग्राहकांचा कलही ‘ब्रँडेड’ वस्तूंकडे वाढत आहे. सध्या केलेली गुंतवणूक वर्षभरात फायदा मिळवून देईल.

जून महिन्यासाठी किरकोळ महागाईचा दर ६.३ टक्के राहिला जो अजूनही रिझव्‍‌र्ह बँकेच्या सहनशील मर्यादेच्या किंचित वर आहे. औद्योगिक उत्पादनाचे मे महिन्याचे आकडे गेल्या वर्षांच्या मे महिन्यापेक्षा २९ टक्के जास्त पण मे २०१९ पेक्षा १३.८ टक्कय़ांनी कमी आहेत. जुलैच्या पहिल्या १५ दिवसांतील विजेची मागणी करोनापूर्व पातळीला आली आहे. हे औद्योगिक उत्पादन वाढत असल्याचेच दर्शविते. स्टँडर्ड अँड पुअर या पतमानांकन संस्थेने भारताचे सध्याचेच मानांकन कायम ठेवले आहे. परिणामी बाजाराच्या प्रगतीला करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वगळता मोठा धोका संभवत नाही. पुढील सप्ताहात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एचसीएल टेक्नॉलॉजी, एमफॅसिस तसेच एसीसी, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, सिएट, बायोकॉनसारख्या कंपन्या आपले तिमाही निकाल जाहीर करतील. बाजारातील तेजीच्या लाटेमुळे निफ्टीचे सोळा हजारांचे लक्ष्य या सप्ताहात गाठले जाण्याचा बाजार विश्लेषकांचा अंदाज आहे.