आदूबाळ

व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच, पाळत ठेवणं, प्रसारमाध्यमांना कह््यात ठेवणं, स्वत:च्या सोयीचं संभाषित (नॅरेटिव्ह) आणि पर्यायानं इतिहास ‘घडवणं’ वगैरे कुनस्थानी (डीस्टोपियन) वास्तवाचे विविध पैलू जॉर्ज ऑर्वेलच्या ‘१९८४’मध्ये दिसतात. पण या कादंबरीबाबत तुलनेनं कमी चर्चा होते ती अर्थसत्तेची…

आदल्याच दिवशी ‘विचारगुन्हा’ केलेला विन्स्टन स्मिथ एका बकाल वस्तीतून जात असतो. एका घरातून त्याला नुकत्याच भाजून दळलेल्या ताज्या-ताज्या कॉफीचा सुवास येतो. ‘खरी’ कॉफी. तो लहानपणी प्यायचा तशी. कळत्या वयात त्यानं फक्त सॅकरीन घातलेली करपट वासाची ‘व्हिक्टरी कॉफी’ प्यायलेली असते.

काही दिवसांनंतर… विन्स्टन स्मिथ आपल्या प्रेयसीला चोरून भेटायला तसल्याच वस्तीत भाड्यानं घेतलेल्या त्यांच्या ठिकाणी लपूनछपून पोहोचतो. त्याची प्रेयसी अजून यायची आहे. चोरट्या भेटीत स्वातंत्र्याचा उपभोग घ्यायला विन्स्टननं पाकीटभर व्हिक्टरी कॉफी कुठूनशी पैदा केली आहे. आणि मूठभर सॅकरीनच्या वड्या. चंगळ. पण त्याची प्रेयसी ‘खरी’ कॉफी घेऊन येते. ‘पक्षा’तल्या उच्चपदस्थांनाच फक्त मिळू शकते अशी, बिया दळून केलेली किलोभर कॉफी. सोबत ‘खरी’ साखर.

‘नाइन्टीन एटी-फोर’ या जॉर्ज ऑर्वेलच्या सुप्रसिद्ध कादंबरीतले हे दोन प्रसंग. सुटसुटीतपणासाठी तिला ‘१९८४’ म्हणू. या कादंबरीचं कथानक सांगण्यात अर्थ नाही. मूळ कादंबरीच वाचणं चांगलं. संदर्भासाठी म्हणून : ओशियानियातला सर्वंकष सत्ता गाजवणारा राजकीय पक्ष, त्याला धडपडत स्वत:पुरता विरोध करणारा विन्स्टन स्मिथ हा सामान्य नागरिक, ज्युलिया व ओब्रायन हे त्याचे साथी आणि राक्षसी सत्तेपुढे एकट्या पडलेल्या विन्स्टनची होणारी अटळ ससेहोलपट, असं एकंदर कथानक आहे.

वर उल्लेखलेल्या प्रसंगांत वाचकाला दिसतो तो ‘कपभर कॉफी पिणे’ या क्षुल्लक सुखाला पारखा झालेला कथानायक विन्स्टन स्मिथ. ‘पक्ष’ एकमेव आहे; आणि ‘पक्षा’चं आतलं वर्तुळ, बाहेरचं वर्तुळ आणि ‘प्रोल्स’ (प्रोलेटरियट अर्थात श्रमिक बहुजन) यांत समाज विभागला आहे. विन्स्टन ‘पक्षा’चा बाहेरच्या वर्तुळातला सदस्य आहे. आतल्या वर्तुळात त्याला प्रवेश नाही. झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रोल्सपेक्षा त्याची परिस्थिती बरी आहे, असं त्याला वाटतं. पण रोचक भाग असा की, आतल्या वर्तुळाला त्याच्या स्थानामुळे खरी कॉफी मिळते. प्रोल्स काळ्या बाजाराचं जुगाड करून खरी कॉफी मिळवू शकतात, शहराबाहेरून ताजं लोणी पैदा करू शकतात. पण विन्स्टनसारख्यांचं जिणं स्वस्त आहे- त्याला घाणेरडी व्हिक्टरी कॉफी प्यायला लागते आणि लोणी तर त्यानं कित्येक वर्षांत पाहिलेलंच नाही.

इतरांच्या तुलनेत विन्स्टन सजग आहे. त्यामुळे ‘पक्ष’ सर्वसत्ताधीश आहे’ हे त्याला उमगतं. किंबहुना ‘स्वातंत्र्य हीच गुलामगिरी’ असं ‘पक्षा’चं घोषवाक्यच आहे! पण आपल्या भवतालातल्या कोणालाच ते उमगत नाही हे पाहून त्याला क्लेश होतात. ‘असं का?’ याचं उत्तर विन्स्टनला मिळत नाही. कादंबरीच्या सुरुवातीच्या भागात ऑर्वेलही ते उत्तर वाचकाला चमच्यानं भरवत नाही, पण त्या उत्तरापर्यंत पोहोचण्याच्या खाणाखुणा खुबीनं पेरतो.

व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच, पाळत ठेवणं, प्रसारमाध्यमांना कह््यात ठेवणं, स्वत:च्या सोयीचं संभाषित (नॅरेटिव्ह) आणि पर्यायानं इतिहास ‘घडवणं’ वगैरे कुनस्थानी (डीस्टोपियन) वास्तवाचे विविध पैलू ‘१९८४’मध्ये आपल्याला दिसतात. पण या कादंबरीबाबत तुलनेनं कमी चर्चा होते ती अर्थसत्तेची.

स्वातंत्र्य हिरावून घेण्याच्या प्रक्रियेची सुरुवात आर्थिक स्वातंत्र्यावर घाला घालण्यानं होते; जो बऱ्याच अंशी अदृश्य असतो. एकदा आर्थिक नाड्या आवळल्या, की बाकी काम सोपं होतं. तसं बघायला गेलं, तर सर्वच सरकारं आर्थिक सत्ता गाजवतात. उदा. चलनव्यवस्था ही सरकारची मक्तेदारी. अर्थव्यवस्थेतील पैशांचा प्रवाह कमी-जास्त करायची तोटी (म्हणजे बँकेचे व्याजदर) सरकारच्या हाती असते. पण ‘१९८४’मध्ये वर्णिलेली अर्थसत्ता याहून खोलवर पोहोचणारी, सर्वंकष आणि त्यामुळे दमनकारी अशी आहे. अर्थसत्तेचे कादंबरीतले विविध पैलू आणि अदृश्य, पण पोलादी मूठ यांची तुलना आपापल्या भवतालाशी केली, तर कदाचित पुन:प्रत्ययाचा आनंद (?) मिळेल.

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, विन्स्टनचं जगणं ‘स्वस्त’ आहे. दाढीच्या पात्यासारख्या गोष्टींचीही टंचाई आहे. विन्स्टनच्या खाण्यापिण्यातल्या पाव-दारूसारख्या गोष्टी कमअस्सल दर्जाच्या आहेत. यांतल्या जवळजवळ सगळ्या वस्तूंचा प्रोल्सनी चालवलेला काळा बाजार जोरात आहे. पण ‘पक्ष’ त्याला आटोक्यात ठेवतो. विन्स्टन राहतो तेही जुनाट इमारतीत : तिथली बेसिनं तुंबतात, लिफ्ट मोडतात, वीज बहुधा नसते. या सर्व गोष्टींची पुरवठासाखळी सरकारी आहे. म्हणजे ‘सरकार’ या झुलीखाली लपलेले, ‘पक्षा’च्या आतल्या वर्तुळातले मूठभर लोक या पुरवठ्यावर अंकुश ठेवून आहेत.

दुसरीकडे सरकार, म्हणजे ‘पक्ष’ (‘१९८४’मध्ये हे दोन्ही एकच आहेत. तुम्ही ‘पक्षा’बरोबर नसाल, तर तुम्ही देशद्रोही आहात!) काही गोष्टींवर बेसुमार खर्च करताना दिसतं. मंत्रालयांच्या अवाढव्य इमारतींतून लोक अहोरात्र काम करत असतात. किंबहुना ‘अंधार नसलेली जागा’ अशी ख्याती असलेल्या ‘मिनिस्ट्री ऑफ लव्ह’ या मंत्रालयात अहोरात्र दिवे जळत असतात. या मंत्रालयाचं मुख्य काम नागरिकांवर पाळत ठेवणं आहे. त्यासाठी ‘प्रकाशवाणी’सारखी यंत्रं आणि ‘थॉट पोलीस’सारख्या सरकारी यंत्रणा राबवल्या जातात. विन्स्टनवर सरकारनं सात वर्षं पाळत ठेवल्याचा उल्लेख कादंबरीत येतो आणि ती कशी बेमालूमपणे ठेवली गेली याचे तपशील येतात. थोडक्यात, विरोधकांवर पाळत ठेवण्यासाठी सरकार बेसुमार खर्च करतं. समाजकल्याणाच्या मोबदल्यात नागरिकांची परवड चालू आहे हे उघडपणे दिसतं. नागरिकांचं जगणं सुधारण्यासाठी सरकारला आपल्याजवळचे पैसे खर्चायचे नाहीत असा त्याचा अर्थ.

याचा अपरिहार्य परिणाम म्हणून ‘१९८४’तल्या समाजात पराकोटीची आर्थिक विषमता आहे. ‘पक्षा’च्या आतल्या गोटातले लोक आरामशीर आयुष्य जगताहेत. तेही असुरक्षित आहेत, पण अर्थदृष्ट्या नाही. विन्स्टनसारखे लोक फाटकं जगताहेतच. त्याहीखालच्या ‘प्रोल्स’ या जनपदाचा जगण्याचा लढा याहून प्रखर आहे.

‘१९८४’मधलं सरकार कोणत्या गोष्टीसाठी किती खर्च करतं हे पाहताना छाती दडपून जाते. उदा., सरकारच्या मंत्रालयांपैकी ‘सत्यमंत्रालया’चं काम आहे खोट्याचं खरं आणि खऱ्याचं खोटं करणं. आपण सांगू तोच इतिहास ‘खरा’ असा सरकारचा दावा आहे आणि त्यासाठी ते इतिहासाची साधनं बनवतात. विन्स्टन जुन्या वर्तमानपत्रांतल्या लेखांशी छेडखानी करायच्या कामावर आहे. समजा, ‘पक्षा’ला नकोशा व्यक्तीचा गौरवपूर्ण उल्लेख एखाद्या लेखात असेल, तर विन्स्टन लेखातले संदर्भ बदलत ‘पक्ष’मर्जी राखणारा लेख लिहितो. मग त्या ‘नव्या’ लेखासहित तो अंकच पुन्हा छापला जातो आणि ‘जुने’ अंक नष्ट करून त्या जागी नव्या प्रती ठेवल्या जातात. ‘चुकीचा’ इतिहास ‘दुरुस्त’ केला जातो. या निरंतर चालणाऱ्या कामात अनेक विन्स्टन जुंपलेले राहतात.

‘बिग ब्रदर’ हा ‘पक्षा’चा सर्वेसर्वा. त्याचा चेहरा मुलांच्या खेळण्यांपासून ते मिरवणुकींतल्या प्रतिकृतींपर्यंत सगळीकडे दिसत राहतो. या मिरवणुकींसाठी ‘ऐच्छिक’ वर्गणी आहे. विन्स्टनचा शेजारी पार्सन्स यात उत्साहाने सहभागी होतो आणि जनमानसाच्या विपरीत भूमिका घ्यायची भीड पडल्याने ही ‘ऐच्छिक’ वर्गणी विन्स्टनला द्यावीच लागते. असाच एक ‘दोन मिनिटांच्या द्वेषा’चा सामाजिक सोहळा अधूनमधून असतो. त्यात ओशियानियाच्या शत्रूंना शिव्यांची लाखोली वाहिली जाते.

सततच्या लढाईमुळे ‘पक्षा’ला हवी असलेली सोडून समाजाची वरकड क्रयशक्ती आपोआप नष्ट होते. सर्व समाज सतत स्वार्थत्यागी देशभक्तीने भारलेला असल्यानं वेगवेगळ्या समाजघटकांमध्ये वस्तुवाटपावरून भांडण होत नाही. ‘युद्ध हीच शांतता’ ही घोषणा मुख्यत: देशांतर्गत लागू पडते.

या सगळ्या खर्चांकडे तटस्थपणे बघता असं जाणवतं, की हे सगळे खर्च ‘पक्षा’च्या विचारधारेचा प्रचार करण्यासाठी, ती सर्वव्यापी करण्यासाठी आहेत. ही ‘पक्षा’ची विचारधारा आहे तरी काय? तिचं अधिकृत नाव ‘इंगसॉक’ वा ‘इंग्लिश समाजवाद’ असलं, तरी तिचं स्वरूप ‘मूठभरांनी बहुजनांवर सत्ता गाजवणे’ असं आहे. ‘पक्षा’च्या आतल्या वर्तुळातल्या अल्प लोकांचे हितसंबंध अबाधित राखण्यासाठी ओशियानियात बहुजनांना ही विचारधारा आर्थिक (व अन्य प्रकारचं) दास्य स्वीकारायला लावते.

पण बहुजन बरे सुखासुखी दास्य स्वीकारतील? त्यासाठी भावनिक आणि बौद्धिक भ्रम निर्माण करणं गरजेचं आहे. हे ‘पक्षा’ला तसं अवघड नाही. आधीच चालवलेल्या आर्थिक शोषणामुळे जगणं दुरापास्त होतं, आणि अशा शिणल्या जिवाला विचारासाठी वेळ, ताकद राहात नाही. शिवाय बौद्धिक भूक मुद्दामहून चेतवली तरच चेतते. तुलनेला दुसरा समाज वा राजकीय विचारप्रणाली असली, तर आपले दोष जाणवतात. ओशियानियाच्या नागरिकांना इंगसॉकशिवाय दुसरी राजकीय प्रणाली माहीत नाही.

सरकार अर्थविषयक खोटे आकडे सर्रास प्रसिद्ध करतं आणि सत्यमंत्रालयाकडे ते आकडे ‘खरे’ करून दाखवायची जबाबदारी असते. एका प्रसंगात बुटांचं उत्पादन आधी दिलेल्या वचनापेक्षा कमी झालेलं असतं. विन्स्टनकडे ही ‘चूक’ ‘सुधारण्यासाठी’ येते, तेव्हा तो मुळातलं वचन बदलून टाकतो आणि अचानक उत्पादन वचनापेक्षा जास्त झाल्याचं दिसून सगळे ‘बिग ब्रदर’चा जयघोष करतात!

कुनस्थानीय लेखनात त्या-त्या काळात प्रचलित असलेलं भय डोकावतं. ऑर्वेलने १९४८ साली जेव्हा ही कादंबरी हातावेगळी केली, तेव्हा अतिडाव्या राजवटीचं भय होतं. त्यामुळे ‘१९८४’मध्ये डाव्या राजवटींचे धोके दिसतात, असा एक लोकप्रिय समज आहे. पण तो गैरसमजच आहे, हे दोन बाबींवरून सिद्ध होतं. कादंबरीतल्या एका भागात ‘पक्ष’विरोधक इमॅन्युएल गोल्डस्टीनच्या पुस्तकातला मजकूर दिसतो. त्यात ‘पक्ष’ हा कम्युनिस्ट आणि नाझी या दोन्ही राजवटींपेक्षाही कसा प्रभावी आहे याची चर्चा येते. त्यामुळे ऑर्वेलच्या मनात फक्त डाव्या राजवटींचेच धोके नसावेत. दुसरं- कादंबरीचा नायक सामान्य नागरिक आहे. शेवटी तुमच्या-माझ्यासारख्या सामान्य माणसाला काय हवं असतं? श्रमाचा योग्य मोबदला, सुकरपणे मिळणारा अन्न-वस्त्र-निवारा, सामाजिक सुरक्षितता, आरोग्य, शिक्षण… आणि चिरंतन मानवी मूल्य असलेलं स्वातंत्र्य! हे न देणाऱ्या राजवटी सामान्य माणसाच्या दृष्टीने घुसमटवणाऱ्याच असतात, मग त्या डाव्या असोत किंवा उजव्या. ऑर्वेलला सत्तेच्या डावे-उजवेपणाशी देणंघेणं नव्हतं; त्याचा विरोध सत्ता सर्वंकष असायला होता. सध्याच्या अतिउजव्या राजवटींच्या जगात ‘१९८४’ आणि ऑर्वेल आपलं स्थान नुसतं टिकवूनच नव्हेत, तर लोकप्रिय आहेत ही बाब बोलकी आहे.

एक विचारप्रयोग सुचवतो. ‘१९८४’ वाचा. तुमच्या भवतालात त्यातल्या किती गोष्टी घडताहेत याचा हिशोब करा. कदाचित आजूबाजूला वावरणारा ‘पक्ष’ दिसेलही.

aadubaal@gmail.com