News Flash

…आणि पुस्तके चालू लागली!

माणसे आणि पुस्तके या दोघांवर प्रेम असणाऱ्यांनी वाचकांची वाट न पाहता, पुस्तकांनाच माणसांकडे नेले.

गतशतकाच्या पूर्वार्धातले दक्षिण भारतातील फिरते वाचनालय आणि त्याचे वाचक!

रवींद्र कुलकर्णी

आताशा फारसे कोणी वाचत नाही, ग्रंथालये ओस पडली आहेत, वगैरे वाचननाशाच्या गोष्टी रंगविल्या जातातच. पण माणसे आणि पुस्तके या दोघांवर प्रेम असणाऱ्यांनी वाचकांची वाट न पाहता, पुस्तकांनाच माणसांकडे नेले. तसे प्रयत्न शतकापूर्वीच्या काळात इंग्लंड-अमेरिकेत झालेच; पण भारतातही, अगदी महाराष्ट्रातदेखील झाले, होत आहेत… त्यातील काहींचा हा मागोवा…

श्रद्धा डोंगर हलवते म्हणतात ते केवळ वाच्यार्थाने खरे आहे. श्रद्धावान आणि चतुर माणसे व्यावहारिक मार्ग शोधतात. पुस्तकांच्या आणि वाचकांच्या जगातही असेच घडले. माणसे आणि पुस्तके या दोघांवर प्रेम असणाऱ्यांनी वाचकांची वाट न पाहता, पुस्तकांनाच माणसांकडे नेले. या प्रयत्नांचा मागोवा उद्बोधक ठरेल.

तमिळनाडूमधले चेन्नई सोडून मराठी माणसाला परिचित असलेले दुसरे शहर म्हणजे तंजावर. तंजावरपासून ४० किलोमीटरवर मन्नारगुडी तालुक्यात मेलावसल हे छोटे खेडे आहे. आजही त्याची वस्ती फक्त दोन हजार आहे. १९३१ साली भारतातल्या पहिल्या फिरत्या वाचनालयाची सुरुवात तिथे २१ ऑक्टोबरला झाली. ते बैलगाडीतले होते. त्याचे उद्घाटन हे भारतातले ग्रंथालय आणि माहिती विज्ञानाचे पितामह डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी केले होते. त्याआधी जगातले पहिले फिरते वाचनालय इंग्लंडमधल्या वॉरिंग्टन येथे औद्योगिक क्रांतीच्या ऐन बहरात १८५८ साली अस्तित्वात आले होते. तर अमेरिकेत वॉशिंग्टन काऊंटीमध्ये १९०५ साली घोडागाडीत पुस्तके भरून फिरते वाचनालय अस्तित्वात आले. मोटारीचा जन्म होईपर्यंत ही पद्धत वापरात होती. १९१२ साली मोटारगाडी आल्यानंतर तिला बाहेरून आकर्षकरीत्या रंगवण्यात आले व तिचे फिरते वाचनालय करण्यात आले. मेरी टिटकोंब या महिलेला याचे श्रेय मोठ्या प्रमाणात जाते. गेली ११६  वर्षे हे फिरते वाचनालय चालू आहे.

या सर्व घडामोडींत एक लक्षणीय प्रयोग अमेरिकी महामंदीच्या काळात केला गेला. ही मंदी १९२९ ला सुरू झाली. त्यावर मात करण्यासाठी फ्रँकलीन रूझवेल्ट यांनी १९३५ साली ‘वर्क प्रोग्रेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ योजना आणली. या योजनेत अशिक्षित व अर्धशिक्षित लोकांना रस्ते, गटारे, दवाखाने यांच्या बांधकामांची बरीच कामे सरकारी योजनेतून देण्यात आली. या मंदीत ज्यांनी पुस्तक म्हणजे काय हे आयुष्यात पाहिले नव्हते अशा निरक्षर लोकांच्या घरापर्यंत पुस्तके पोहोचवण्याचे कामही निर्माण करण्यात आले.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकी राज्यसंघातले केंटुकी हे काही संपन्न राज्य गणले जात नव्हते. त्यात महामंदीचा फटका या राज्याला जास्त जाणवला. ‘पॅक हॉर्स लायब्ररी’ हा प्रयोग त्या राज्याच्या पूर्व भागातल्या दहा हजार चौरस मैलाच्या प्रदेशात राबवण्यात आला. चर्च, डाक कार्यालये आणि समाजसमूह केंद्रे (कम्युनिटी सेंटर्स) यांमध्ये पुस्तकांचे साठे निर्माण करण्यात आले. तिथून घोडे किंवा खेचरांवरून ती पुस्तके डोंगराळ भागातील लहानसहान पाड्यांवर पोहोचवली गेली. एका घोड्यावर साधारण १०० पुस्तके असत. हे काम करणाऱ्यांमध्ये स्त्रिया मोठ्या संख्येने होत्या. पुस्तके गोळा करणे, त्यांचा हिशेब ठेवणे, त्यांचे बाइंडिंग व्यवस्थित करणे, ते शिवणे अशी कामेही त्यांना करावी लागत. हे सारे दर्जेदार साहित्य नसे. पाठ्यपुस्तके, मासिके, लहान मुलांची गोष्टींची पुस्तके, जुनी-नवी वर्तमानपत्रे… असे जे मिळेल ते वाचण्यायोग्य साहित्य त्यांनी गोळा केले. कधी दोन फाटलेली अर्धवट मासिके एकत्र शिवून नवीनच मासिक बनवलेले असे! हे काम करणाऱ्या स्त्रीला एका लहान मुलीने सांगितले, ‘‘आम्ही मका पेरताना आम्हाला कोणी वाचून दाखवेल असे पुस्तक हवे.’’ ज्यांना थोडेफार वाचता येई त्यांच्यात रॉबिन्सन क्रुसो आणि मार्क ट्वेन यांना मागणी होती. बायबल हे अर्थातच सर्वात जास्त मागणी असलेले पुस्तक होते. विणकाम व आरोग्यविषयक मासिकांनाही मागणी होती. डोंगरातल्या लहान-लहान शाळांमधल्या मुलांना तर कुठलेही पुस्तक चाले. पुस्तकाची नवलाई इतकी होती की, घरातल्या मोठ्या निरक्षर माणसांना लहान मुले वाचून दाखवत. हा प्रांत पुंडगिरीचा होता. लोक गनफाइटमध्ये जखमी होत. अशांना पुस्तके वाचून दाखवण्याचे कामही पुस्तके घेऊन जाणाऱ्या स्त्रियांनी केले. कधी निरक्षर घरात प्रवेश मिळणे सोपे नसे, त्यासाठी काही क्लृप्त्या लढवाव्या लागत. या स्त्रीचा दिवस सकाळी साडेपाचला सुरू होई आणि सूर्यास्ताला संपे. राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी, एलीनॉर रूझवेल्ट यांनी हा प्रयोग उचलून धरला. जोजो मोयसच्या ‘द गिव्हर ऑफ स्टार्स’ या बाळबोध कादंबरीत या साऱ्याचे चित्रण आले आहे.

घोड्यावरच्या या पुस्तकवीरांगनांनी वाटेतले ओढे, टेकड्या, पाऊस, बर्फ यांची पर्वा न करता हे काम केले. एका स्त्रीचा घोडा वाटेतच मरण पावल्यावर तिला अनेक मैल अंतर चालावे लागले. कधी ओढ्यात घोड्याच्या रिकिबीच्या वर गार पाणी पोहोचे आणि पाय गारठून जात. या पुस्तकवीरांगना पुस्तके पोहोचवण्यासाठी साधारण १२० मैलांचा प्रवास दर आठवड्याला करत. घोडा स्वत:चा घेऊन यावा लागे. अर्थात, त्यांनी हे काम फुकट केले नाही. या कामाचे दर महिन्याला त्यांना २८ डॉलर्स मिळत. हे २८ डॉलर्स सरकार त्यांना देई. मंदीच्या काळात ही रक्कम मोठी होती. बहुतेक ठिकाणी हे काम करणारी व्यक्ती ही कुटुंबातील एकमेव मिळवती व्यक्ती असे. त्यामुळे पुस्तके देणगी म्हणून मिळवणे, ती वाचणारी माणसे मिळवणे, त्यांना वाचायला लावणे, पुस्तकांची निगा राखणे ही कामेही त्यांनी केली. केंटुकीतले ३० टक्के लोक निरक्षर होते. यांना पुस्तक म्हणजे काय हे समजावे, त्यातून वाचायला शिकावे आणि देशाच्या बदलत्या अर्थकारणात त्यांनी काही भर घालावी, असा दूरचा विचार यामागे होता. अन् जवळचा हेतू म्हटला तर, मंदीच्या काळात लोकांच्या हातात थोडे पैसे जावेत, हा.

ठाण्यातील डोंबिवलीच्या विवेकानंद रात्र महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. श्रीनिवास आठल्येंनी फिरत्या वाचनालयाचा प्रयोग काही शाळांमधून राबवल्याचे मला माहीत होते. या प्रयोगाबद्दल मी त्यांना त्यांचा अनुभव विचारता, ते म्हणाले, ‘‘माझा प्रयोग आर्थिकदृष्ट्याही यशस्वी होता. मोठ्या पिशव्यांत पुस्तके घेऊन विविध शाळांमध्ये जायचो. माझे फिरते वाचनालय फुकट नव्हते. प्रत्येक मुलाकडून महिन्याला फार थोडी रक्कम घ्यायचो, जी त्यांना देणे सहज शक्य असे. नियोजित शाळांच्या मधल्या सुट्टीत मी पुस्तकांच्या पिशव्या घेऊन जायचो. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या पुस्तकांची नोंद करण्याचे काम शिक्षक आनंदाने करत. कारण त्यांना मी मोठ्यांची पुस्तके मोफत वाचायला देई. विद्यार्थी जे वाचायला न्यायचे, त्यातून मला त्यांच्या परिस्थितीचा अंदाज यायचा. कुठल्या वयात मूल साधारण काय वाचते, याचे आडाखे मला बांधता येऊ लागले. एकदा आठवीतल्या मुलाने अचानक राजकन्या आणि राक्षसाचे पुस्तक नेले, याचे मला आश्चर्य वाटले. पण त्याच्याशी बोलल्यावर त्याची आर्थिक परिस्थिती लक्षात आली. मग समजले की, तोपर्यंत त्याने तसले काहीच वाचलेले नव्हते. विशेष म्हणजे, माझे एकही पुस्तक चोरीला गेले नाही!’’ लहान मुलांची शाळा थोडा वेळ असते. अशा शाळेत लांबून आलेले पालक शाळेच्या आसपासच रेंगाळत. त्या शाळेत वाचनालय होते. शाळेच्या मुख्याध्यापकांशी बोलून डॉ. आठल्येंनी  पालकांची बसण्याची सोय शाळेच्या वाचनालयात केली. हे पालक वाचू लागले आणि मुलांना रात्री कोणत्या गोष्टी सांगायच्या हा त्यांचा प्रश्न सुटला. डॉ. आठल्येंचे फिरते वाचनालय हा एकखांबी तंबू होता. त्यामुळे पसारा वाढू लागल्यावर हा उद्योग बंद पडला. मारुती व्हॅन वापरायला हवी होती, अशी हळहळ त्यांना आजही आहे.

उत्साही लोकांनी पुस्तके माणसांपर्यंत नेण्यासाठी अनेक प्रयोग केले. केनियात भटक्या जमातींसाठी वाचनालय चालते. तेथे पुस्तकांची वाहतूक उंटावरून होते. कोलंबियात लुइस सोरिअ‍ॅनो हा शिक्षक गाढवावरून पुस्तके नेतो आणि वाचूनही दाखवतो. तर औला कोटाकोव्र्हा आपली पुस्तकांनी भरलेली बस घेऊन बर्फाळ आक्र्टिकच्या परिसरात गेले ४० वर्षे फिरला आहे. २०१६ मध्ये अक्षय रावतारे आणि शताब्दी मिश्रा यांनी पुस्तकांनी भरलेला ट्रक घेऊन ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालच्या आदिवासी विभागात ११ हजार किमीचा प्रवास केला. कोरापुटसारख्या मोठ्या, पण आदिवासी पट्ट्यातल्या गावात अनेक मुले त्यांना भेटली, की ज्यांनी गोष्टीचे पुस्तक कधीच पाहिले नव्हते.

अनेक देशांतली फिरती वाचनालये ही त्यांच्या राष्ट्रीय वाचनालयाबरोबर जोडलेली आहेत. आपल्याकडेही जिल्ह््यातल्या सार्वजनिक वाचनालयांच्या इमारतीत वाचकांची वाट पाहात बसलेल्या पुस्तकांना, गरज पडल्यास त्यांच्या दर्जाच्या कक्षा रुंद करत झोपडपट्टींत, वेश्या वस्तीत, अनाथालयांत, वृद्धाश्रमात, आसपासच्या खेड्यांतल्या वीटभट्ट्यांवर, शेतमजुरांमध्ये, आदिवासी पाड्यांवर, आश्रमशाळांत नेले पाहिजे. अमेरिकी अध्यक्ष फ्रँकलीन रूझवेल्ट यांनी ‘न्यू डील’ योजना आणताना म्हटले होते, ‘‘देशाला प्रयोगशील असण्याची गरज आहे. एखादी पद्धत वापरून पाहा. जर ती अयशस्वी झाली तर ते मोकळेपणाने मान्य करा आणि पुढे जाऊन दुसरी पद्धत वापरून पाहा. मला वाटते, याला फार बुद्धिमत्तेची गरज नाही. पण प्रयत्न करत राहणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.’’

kravindrar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 12:00 am

Web Title: article on mobile library in india abn 97
Next Stories
1 काही (निवडक) बोलायाचे आहे…
2 वाचनप्रवाही जगकथा…
3 बुकबातमी : ‘करोनासुट्टी’तले दुसरे पुस्तक…
Just Now!
X