शरद नावरे

प्लेटोच्या ‘रिपब्लिक’चा विषय आहे न्याय. न्यायाने वागणारा मनुष्य, हा तसे न वागणाऱ्या मनुष्यापेक्षा सुखी असतो किंवा कसे, याविषयीच्या संवादातून संतुलित व्यक्ती आणि संतुलित समाजाचे चित्र प्लेटो उभे करतो..

कार्ल जेस्पर्स या जर्मन तत्त्ववेत्त्याने अक्षयुगाची संकल्पना मांडली. इ.स.पूर्व आठशे ते दोनशे हा अक्षयुगाचा काळ मानला जातो. या काळाचे महत्त्व असे की, मानवी इतिहासात सर्वप्रथम बौद्धिक, तत्त्वज्ञानात्मक व धार्मिक संस्थांचा जगभर जवळपास एकसमयावच्छेदेकरून या काळात उदय झाला. या संस्थांनी गेल्या दोन सहस्रकांतील मानवी इतिहासातील वैचारिक आणि सांस्कृतिक प्रगतीचे नेतृत्व केले आहे. भारतीय तत्त्वमीमांसक व नैय्यायिक (यामध्ये हिंदू, बौद्ध आणि जैन परंपरांचा समावेश होतो), प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ, इराणातील झरतृष्टवाद, हिब्रु प्रेषित, प्राचीन चीनमधील १०० परंपरा (मुख्यत्वे ताओवाद आणि कन्फुशियनिझम) या सर्वाची जडणघडण या काळात झाली. अक्षयुगाचे वैशिष्टय़ म्हणजे, स्थानिकाशी लगडलेली दृष्टी ओलांडून मनुष्याने व्यापकत्वाकडे घेतलेली झेप. कमी उंचीवरून उडणाऱ्या पक्ष्याला दिसणारा भूभाग आणि अतिशय उंचावरून विहरणाऱ्या गरुडाला आलेला व्यापक दृष्टिकोन यांतील फरक अक्षयुगातील क्रांतीचे स्वरूप समजण्यास उपयुक्त ठरेल. भारत, चीन, इराण आणि ग्रीस हा अक्षयुगक्रांतीचा प्रदेश मानला गेला आहे.

अक्षक्रांतीच्या संदर्भात मानवी विचारांचे ओलांडून जाणे याला विवक्षित अर्थ प्राप्त झाले आहेत. विश्वाची रचना आणि त्यातील घटिते, ठेविले अनंते तेच गृहीत धरणे आणि स्वीकारणे याऐवजी एकूण अस्तित्वाला विचार आणि चिंतनाचे लक्ष्य बनवणे, हा एक महत्त्वाचा अर्थ. मनुष्ये या जगात राहतात आणि त्याबद्दल विचार करतात- या तथ्याबद्दल वेगळ्या पातळ्यांवरून विचार करणे, हा दुसरा अर्थ. ग्रामदैवत किंवा नवससायास करण्यासाठी कल्पिलेले स्थानिक देव कवटाळून न बसता मनुष्यजातीचे भवितव्य, मनुष्याचे विश्वरचनेतील स्थान याबद्दल आणि चांगुलपणाबद्दल- न्याय्य काय असू शकते, श्रेयस काय असते याबद्दल विचार करणे, मनुष्ये चांगली आणि न्यायबुद्धीने वागणारी कशी बनतील याचा विचार करणे, हा तिसरा.

प्रादेशिक, सांस्कृतिक आणि सामाजिक भिन्नता असूनही अनेक बाबतींत मानवी समाज कशा प्रकारे एकसारखा विचार करतो याचे प्रत्यंतर अक्षकालातील तत्त्वविचारांचा अभ्यास करताना येतो. हे अक्षयुग पुन्हा अवतरेल का?

आपण कदाचित आणखी एका अक्षयुगाच्या सीमेवर असू. मनुष्ये कशी जगतात, वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर त्यांचे सांस्कृतिक आयुष्य कसे असते, परस्परांशी ते कशा प्रकारे संवाद करतात आणि भोवतालच्या जगाकडे कसे पाहतात, हे सर्व विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रभावाने प्रचंड प्रमाणात बदलले आहे. वैयक्तिक पातळीवरील धार्मिकता आणि अध्यात्म विकसित होत आहेत; परंतु विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून, विशेषत: औद्योगिकीकरण झालेल्या देशांमध्ये पारंपरिक धर्मसंस्थांचा प्रभाव कमी होत चालला आहे. काहींना मात्र वाटते की येणारा काळ हा आधीप्रमाणेच बहारीचा असेल.

प्लेटोचे ‘रिपब्लिक’ अक्षयुगात इ.स.पूर्व ३८०च्या सुमारास आकाराला आले. जे सांगायचे ते संवाद स्वरूपात सांगणे ही प्लेटोची खास शैली आहे. या संवादांना ‘प्लेटोचे डायलॉग’ असे म्हटले जाते. बहुतेक वेळा या डायलॉग्जमध्ये सॉक्रेटिस हे प्रमुख पात्र असते आणि इतर पात्रांना प्रश्न विचारत एखाद्या विषयाचा ते वेध घेत राहते. ‘रिपब्लिक’चा विषय आहे न्याय. न्यायाने वागणारा मनुष्य, हा तसे न वागणाऱ्या मनुष्यापेक्षा सुखी असतो किंवा कसे, याविषयीच्या संवादातून संतुलित व्यक्ती आणि संतुलित समाजाचे चित्र प्लेटो उभे करतो.

प्लेटॉनिक प्रेम, अंगभूत ज्ञान, आकारांचे सिद्धान्तन, पाच राज्यपद्धतींचा ऐतिहासिक क्रम ही प्लेटोच्या लिखाणाची सूत्रे आहेत. त्याचे आकारांचे सिद्धान्तन असे सुचवते की, भौतिक जगाच्या पल्याड वास्तवाचा एक उच्चतर भाग आहे- केवळ विचाराने मनुष्य त्याच्याशी जोडला जाऊ शकतो. हे सिद्धान्तन प्लेटॉनिक चिद्वादाचा गाभा आहे. प्राचीन तत्त्ववेत्त्यांनी जे काही साध्य केले त्याचा सर्वोच्च बिंदू म्हणून ‘रिपब्लिक’चा उल्लेख केला जातो. भविष्यकालीन मानवी ज्ञानाची बीजे या लिखाणात दिसून येतात. तर्कशास्त्र, मानसशास्त्र यांचा उगम सॉक्रेटिस व प्लेटोच्या विचारांत आहे. ‘व्याख्ये’चे तत्त्व; विसंगतीचा नियम (दोन परस्पर विसंगत विधाने एकाच वेळी खरी असू शकत नाहीत); वर्तुळीय वितर्कातील फोलपणा (जे सिद्ध करायचे तेच गृहीतात समाविष्ट असणे); सारतत्त्व-अभावीतता भेद; साध्य-साधन भेद; कारकत्व व अटी यांच्यातील भेद; मानवी मनाचे विवेकी, कामुक आणि क्रोधपूर्ण या विभागांत विभाजन (भारतीय तत्त्वज्ञानातील षड्विकार हा अर्थातच जास्त सूक्ष्म विचार म्हणता येईल); सुख,  कामना यांचे आवश्यक-अनावश्यक असे वर्गीकरण- या व अशाच अन्य वैचारिक आकारांचा ‘रिपब्लिक’मध्ये उल्लेख आढळतो. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानामध्ये प्लेटोने कदाचित सर्वप्रथम त्यांची मांडणी केली असावी. शब्द व त्याने निर्दिष्ट वस्तू यांतील फरक त्याने आग्रहाने प्रतिपादला आहे. तो सत्य तार्किक सूत्रांशी बांधून ठेवत नाही. तर्क तत्त्वज्ञानाच्या अवगुंठनात लपून राहतो.

प्लेटोने समाजाची विभागणी तीन प्रकारच्या लोकांमध्ये केली आहे : (१) पालक (गार्डियन)- नगराचे रक्षण आणि आणि नगराच्या वतीने आक्रमण करण्यासाठी यांची गरज असते. (२) रक्षक- बाह्य़ आक्रमक आणि अंतर्गत बंडाळी यांपासून नगराचे रक्षण करणारे लोक. (३) उत्पादक- नगरासाठी उत्पादन करणारे लोक.

पालकांचा वर्ग हा बुद्धिजीवींचा वर्ग आहे. प्लेटोने त्याच्याबद्दल सर्वाधिक चर्चा केलेली आहे. पालकवर्गाजवळ खासगी संपत्ती असू नये, असे तो म्हणतो. सॉक्रेटिसचा भर आहे तो नेमस्तपणावर, कारण गरिबी आणि श्रीमंती दोन्ही मनुष्यमात्रांना भ्रष्ट करतात. पालकांना मिळणारे शिक्षण चातुर्य, धैर्य, न्याय व संयम उंचावणारे असावे. त्यात सुधारित धर्मकल्पना आणि नीतिमत्ता अंतर्भूत असावी. दुसऱ्या बाजूला जास्त सुगम असे संगीत, अधिक पुरुषी वृत्तीचे काव्य आणि व्यायाम शिक्षणही घेणे आवश्यक आहे, कारण पालकवर्गाने आजारी आणि दुबळे असून चालणार नाही. शिक्षणाच्या बाबतीत मुला-मुलींमध्ये भेद करता कामा नये, यावर सॉक्रेटिसचा भर आहे. व्यक्ती आणि शासन संस्थेमध्ये अधिक सुसंवाद असावा, असे सॉक्रेटिस म्हणतो. शासनसत्तेचे एक उच्चतर प्रारूप त्याने मांडले आहे. त्यात कोणत्याही मनुष्याची कशावरही वैयक्तिक मालकी नाही. राजे तत्त्वज्ञ असतात आणि तत्त्वज्ञ राजे.

प्लेटोच्या मते, व्यक्ती व समाज दोहोंमध्ये प्रज्ञा, धैर्य व आत्मसंयम हे गुण असतात. समाजात प्रज्ञा कुठे शोधावी?- राज्यकर्त्यां (पालक) वर्गात. धैर्य कुठे सापडेल?- सैनिक (रक्षक) वर्गात. आत्मसंयम कुठे असेल? समाजातील सर्वच वर्गामध्ये. आत्मसंयम या गुणामुळे समाजात सलोखा व सुसंवाद निर्माण होतो. कुणी शासन करावे याबाबतीत सर्वसंमती तयार होण्यासाठी आत्मसंयम आवश्यक आहे. न्याय हे चौथे तत्त्व. सॉक्रेटिस न्याय्य समाजव्यवस्थेची व्याख्याच मुळी अशी करतो की, तिच्यात समाजातील प्रत्येक वर्ग आपापली नियुक्त कामे करतो आणि इतरांच्या कामात ढवळाढवळ करत नाही.

प्रज्ञा, धैर्य आणि संयम ही गुणत्रयी कुठून आली? सॉक्रेटिस नगर आणि मनुष्याच्या आत्म्याची तुलना करतो. तो असे सांगतो की, मानसिक विकार मनुष्याच्या आत्म्यातील संघर्षांची व्यक्त रूपे आहेत, कारण एकच व्यक्ती एखाद्या विशिष्ट गोष्टीकडे एकाच वेळी परस्परविरोधी आणि दोलायमान दृष्टिकोनातून नाही पाहणार. आत्म्याच्या विवेकी, धैर्यवान आणि वासनामय भागाची तुलना तो नगरातील पालक, रक्षक आणि उत्पादक वर्गाशी करतो. विवेकी कोणास म्हणावे? – प्रत्येक भागासाठी आणि एकुणासाठी काय हितकारक आहे हे आत्म्याच्या ज्या भागाला ठाऊक आहे त्याची सत्ता एकूण आत्म्यावर चालत असेल, त्याला. धैर्यवान कोण? – सुखोपभोगाच्या क्षणी आणि संकटकाळीदेखील जो आपल्या विवेकी भागाने घेतलेले निर्णय टिकवून ठेवतो, तो. संयमी कोणास म्हणावे? – आत्म्याच्या तीनही भागांनी आपल्यावर विवेकाची सत्ता चालेल असे मान्य केले असेल तर, त्याला.

प्लेटोच्या तत्त्वज्ञ राजाची कल्पना इथे जन्मते. एखाद्या नगरीचे पालन पालक वर्ग करत असेल, रक्षक वर्ग तिचे रक्षण करीत असेल आणि उत्पादक वर्ग उत्पादन; आणि अशा नगरीवर जर तत्त्वज्ञ राजाची सत्ता असेल आणि त्यातील नागरिक विवेक-ज्ञान-चातुर्य यांना सर्वोच्च महत्त्व देणारे असतील, तर ते नगरराज्य आदर्श असेल. खऱ्या तत्त्वज्ञाला आकार-विश्वाचे ज्ञान असते आणि त्याद्वारे तो सर्व नगरवासीयांमध्ये सलोखा निर्माण करू शकतो. तत्त्वज्ञ राजा हा बुद्धिमान, विश्वासू आणि सामान्य जीवन कंठायला तयार असला पाहिजे. आदर्श राज्याचे प्लेटोने रंगवलेले चित्र हा प्लेटोचा ‘युटोपिया’ होय. जगात असे शासन अस्तित्वात येणे हेच मुळी दुरापास्त; आणि आले तरी ते टिकून राहणार नाही. त्यास तडे जातील आणि हळूहळू ते अधिकाधिक भ्रष्टतेकडे प्रवास करू लागेल, याची त्याला कल्पना होती. आदर्श राज्यव्यवस्थेचा क्रमाक्रमाने ऱ्हास होत जाईल, असे प्लेटो म्हणतो. आदर्श नगरराज्य- लष्करशाही- महाजनशाही- लोकशाही- हुकूमशाही, असा प्लेटोने वर्णिलेला ऱ्हासप्रवास आहे.

लोकशाहीत भर कमाल स्वातंत्र्यावर असतो. म्हणून सत्ता समप्रमाणात विभागलेली असते. तिच्यात आकांक्षांनी प्रेरित झालेल्या बेशिस्त, अनियंत्रित लोकांची झुंडशाही माजते. लोकानुरंजनवाद या झुंडशाहीला जन्म देतो, या परिस्थितीत लष्करशाही परत येण्याची भीतीही असते. या कोंडीचा फायदा घेऊन लोकांच्या भावना उद्दीपित करणारा राजकीय पुढारी (डेमागॉग) सत्ता हस्तगत करतो आणि हुकूमशाही लादतो. हुकूमशाही हा प्लेटोचा ‘डिस्टोपिया’ म्हणता येईल. या अवस्थेत नगर हुकूमशहाचे गुलाम बनते. समाजातील सर्वोत्तम नागरिकांना तो हद्दपार करतो आणि सर्वात वाईट विभागांना मोकाट सोडतो. आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी युद्ध पुकारण्यास तो मागेपुढे पाहात नाही. एकूण काय, हुकूमशाही ही सर्वात वाईट व्यवस्था होय.

प्लेटोने सांगितलेला राज्यपद्धतींचा हा एक काल्पनिक क्रम आहे. त्याचे प्रत्यक्षात घडणाऱ्या घटनाक्रमाशी फारसे साधर्म्य नाही. राज्यव्यवस्थेची ही क्रमवारी आधुनिक मूल्यविचारांच्या आणि ऐतिहासिकतेच्या निकषांवरही टिकणारी नाही, याचे कारण चिद्कल्पनांच्या आधारे आपल्याला सामाजिक बदलांचे आणि विकासाचे सिद्धान्तन मांडता येत नाही. राजवटीचे वास्तव समाजाच्या अर्थवास्तवाने प्रामुख्याने ठरवलेले असते. हे अर्थवास्तव गुहेतील आकारांसारखे अमूर्त आणि काल्पनिक नसून प्रत्येकाच्या अनुभवाला येणारे असे मूर्त असते. मनुष्याच्या स्वातंत्र्याशी ते समप्रमाणात असते. तंत्रवैज्ञानिक प्रगतीने खरे तर स्वातंत्र्याची क्षितिजे खुली व्हावी आणि स्वातंत्र्य विस्तारत राहावे असे अभिप्रेत आहे. हा सर्वसामान्य नियम असला तरी, कोणत्या समाजात कशामुळे स्वातंत्र्य व सौख्य फलद्रूप होत नाहीत, हा वेगळ्या विचाराचा विषय आहे. आणि तो अजिबात सोपा सरळ नाही!

sharadnavare@gmail.com