वर्ष नाहीतरी संपत आलंच आहे, तेव्हा ‘खूपविक्या’ पुस्तकांची यादी इथूनतिथून येऊ लागेलच. पण त्याला उशीर असताना या वर्षी तडाखेबंद विक्री झालेलं पुस्तक म्हणून डग्लस स्टुअर्ट या अमेरिकी लेखकाच्या ‘शगी बेन’ या कादंबरीचा उल्लेख करावा लागेल, इतकी मजल तिनं केवळ ‘बुकर’ पारितोषिकाच्या अंतिम यादीत आल्यानंतर मारली. ‘शगी बेन’ची आवृत्ती होती दीड लाखाची. यापैकी २५ हजार प्रती ‘बुकर’ घोषणेच्या आधी विकल्या गेल्या होत्या. ‘बुकर’साठी पाच पुस्तकांच्या अंतिम लघुयादीत आल्यानंतर या पुस्तकाच्या ८० हजार प्रती, एकटय़ा यूकेमध्ये (इंग्लंड, स्कॉटलंड, आर्यलड मिळून) खपल्या. प्रत्यक्ष पारितोषिकच या पुस्तकानं पटकावल्यावर तर, लंडनचा ‘द टाइम्स’ आणि अमेरिकेतला ‘लॉस एंजलिस टाइम्स’ यांच्या खूपविक्या यादीत हे पुस्तक पहिल्या क्रमांकावर गेलं. काही आठवडे तिथंच राहिलं. एवढंच नाही, ३० विभागांमध्ये या पुस्तकाच्या अनुवादाचे हक्क विकले गेले. आणि अर्थातच, चित्रवाणी व चित्रपट हक्कांची मागणी वाढून ते चांगल्या सौद्याला विकले गेले. आता ‘शगी बेन’वर वेब-सीरीज येणार आहे.

निव्वळ ‘बुकर’चं हे कौतुक नाही. स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरातले कारखाने बंद होत असतानाच्या काळात तिथली गरिबी आणि व्यसनी आईच्या वाढत्या मुलाचं जिणं चित्रित करणारी ही कादंबरी इतक्या लोकांना वाचावीशी वाटते, हे अधिक महत्त्वाचं. ग्लासगोत घडणाऱ्या, तिथली गरिबी मांडणाऱ्या तीन कादंबऱ्या आधीच्या दोन-तीन दशकांत येऊन गेल्या, त्याही गाजल्या. हे वाचकांचा कल दाखवणारंच नव्हे का? न्यू यॉर्कच्या अधोविश्वाबद्दलचं वाङ्मयही वाचकप्रिय ठरलं होतंच. त्यामुळे प्रश्न असा की, मुंबईबद्दल इंग्रजीत इतकं भरपूर लिहिलं जात असताना अशा तोडीची एकही कादंबरी इंग्रजीत कशी काय नाही? जयंत पवार यांची ‘वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा’ ही कादंबरीचा दमसास असलेली कथा किंवा जी. के. ऐनापुरे यांची ‘रिबोट’ ही कादंबरी  या मुंबईचं हे अस्सल चित्र उभं करतात, पण त्या मराठीत असल्यामुळे इंग्रजी वाचकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. तेव्हा आजची बुकबातमी अशी की, मुंबईबद्दलच्या इंग्रजी कादंबऱ्या ‘वरणभातासारख्या नेहमीच्या’च ठरतात!