डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत अमेरिकेत गेल्या पाच वर्षांत १२०० पुस्तकं आली. होय बाराशे! म्हणजे, ज्या पुस्तकांच्या नावात किंवा उपशीर्षकात ‘डोनाल्ड ट्रम्प’ हा शब्द होता, अशी पुस्तकं बाराशे. हा आकडा न्यू यॉर्क टाइम्सनं दिलाय आणि ‘तरीही पुस्तकं येतच आहेत..’ अशी बातमी दिली आहे. यापैकी बहुतेक पुस्तकं ही ट्रम्प यांच्याविषयी बरं बोलणारी नाहीत, हे उघडच आहे. पण आपली बुकबातमी न्यू यॉर्क टाइम्सनं दिलेल्या बातमीपेक्षा जरा निराळी. बॉब वुडवर्ड यांच्यासारख्या शोधपत्रकाराला ट्रम्प यांच्यावर ‘फीअर’ हे पुस्तक लिहून झाल्यावर पुन्हा ‘रेज’ हे पुस्तक लिहावं वाटलं, ही बातमी तर बऱ्याच भारतीय वृत्तपत्रांनीही दिलेली आहेच. पण हे दुसरं पुस्तक कसं आहे?

आधी एक खुलासा : बॉब वुडवर्ड ‘यांच्यासारखे’ तेच.. त्यांनीच रिचर्ड निक्सनचं ‘वॉटरगेट’ प्रकरण काढलं होतं. केवळ इंदिरा गांधींचाच नव्हे तर भारताचाही द्वेषच करणाऱ्या निक्सन यांना अपमानास्पदरीत्या पदावरून जावं लागलं, ही तत्कालीन भारतीयांच्या लेखी कौतुकाचीच बाब होती. त्या घडामोडीस कारणीभूत झाले, ते बॉब वुडवर्ड. पण ट्रम्प यांना नेमकं ‘तसं’ चिमटीत पकडणं वुडवर्ड यांना जमलं आहे का?

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
ED seize property
सलग दुसऱ्या दिवशी विनोद खुटेच्या कुटुंबियांशी संबंधित मालमत्तेवर ईडीची टाच
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
US statement despite India objection that the legal process should be fair and transparent
‘कायदेशीर प्रक्रिया निष्पक्ष व पारदर्शक असावी’ ; भारताच्या आक्षेपानंतरही अमेरिकेचे वक्तव्य

करोना महासाथ काय थैमान घालणार आहे, हे ट्रम्प यांना फेब्रुवारीतच समजलं होतं.. पण ‘लोकांना घाबरवून चालणार नाही म्हणून-’ आपण या आपत्तीचं गांभीर्य दडवत होतो अशी कबुली ट्रम्प यांनी वुडवर्ड यांना मुलाखतीदरम्यान दिल्याची बातमी बुधवारी आली. ही मुलाखत अर्थातच पुस्तकाचा भाग आहे. कबुली सनसनाटी म्हणावी अशी आहे आणि तितकीच चिंताजनकसुद्धा. अमेरिका आजही जगातला पहिल्या क्रमांकाचा करोनाबाधित देश आहे, हे लक्षात घेता लोकांपर्यंत गांभीर्य पोहोचणं आवश्यकच होतं ना? पण ट्रम्प यांनी ते केलं नाही. यावर ‘वॉशिंग्टन पोस्ट’नं निराळाच मुद्दा मांडलाय : ‘‘ट्रम्प यांनी ही मुलाखत फेब्रुवारीत दिली, तर मग तेव्हापासून आजवर वुडवर्ड यांनी ही माहिती आधी माध्यमांना न देता, पुस्तकासाठीच का राखीव ठेवली?’’

वुडवर्ड यांच्याहाती ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांचा पत्रव्यवहारही लागला. ती २७ पत्रं पुस्तकात आहेत. त्यातून या दोघा अहंमन्य उच्चपदस्थांना एकमेकांबद्दल असलेली प्रेमादराची भावना ओतप्रोत दिसते खरी, पण या पत्रांतून ‘स्फोटक’ असं काहीच मिळत नाही. ट्रम्प यांचं ‘किम-गेट’ वुडवर्ड यांना या पत्रांतून तरी सापडलेलं नाही.

तरीही या पुस्तकाची प्रतीक्षा अनेकांना आहे. १५ सप्टेंबरला (पुढल्या मंगळवारी) पुस्तक येणार, तर महिनाभर आधीपासून लोक आगाऊ खरेदी करू लागले आहेत. वुडवर्ड यांच्या लिखाणाची शैली, हे या उडय़ांमागचं महत्त्वाचं कारण. शोधपत्रकारिता निरस असून भागत नाही, लोकांपर्यंत काय नि कसं पोहोचवायचं, याचं भान असावं लागतं आणि त्यासाठी लेखनगुणांसोबत बहुश्रुतपणा हवाच. हे सारं वुडवर्ड यांच्याकडे नक्की आहे. त्यामुळे ‘बाराशे पुस्तकांपैकी वुडवर्ड यांचीच एवढी चर्चा का होते? बाकीच्यांची का नाही?’ याचं उत्तरही उघड आहे!