विसाव्या शतकातील आघाडीची स्कॉटिश लेखिका म्युरिअल स्पार्क हिच्या जन्मशताब्दीची सुरुवात नुकतीच (१ फेब्रुवारीला) झाली. त्यानिमित्ताने तिच्या स्वयंभूपणे जगलेल्या आयुष्याचा आणि तितक्याच अलिप्तपणे लिहिलेल्या साहित्याचा घेतलेला हा वेध..

‘रात्री पुस्तकांची शेल्फं असतात

विसावलेली, झोपलेली,

तेव्हा येतात लेखकांची भुतं त्या शेल्फांजवळ,

आपणच लिहिलेल्या पुस्तकांचा शोध घेत

आणि बदलतात आपलेच शब्द,

आपल्याच ओळी,

कधी परिच्छेद, तर कधी पानंच बदलतात,

रात्रभर आपल्याच पुस्तकांवर काम करत राहतात.

मी शपथेवर सांगते, हो, नक्की असंच होत असेल

नाही तर, कित्येक दिवसांनी, वर्षांनी

तेच पुस्तक वाचताना

नवीनच काही तरी वाचतोय असं कसं वाटतं,

या कथेचा शेवट वेगळाच होता, या ओळी,

हे शब्द यात कुठे होते?

हा प्रसंग तर यात नव्हता,

हे आपल्याच लेखकाचं पुस्तक का,

असा संभ्रम वाचकाला कसा पडेल?’

( म्युरिअल स्पार्कच्या मूळ कवितेचा संक्षिप्त भावानुवाद.)

पुस्तकं वाचकांचं आणि स्वत:चंही भविष्य घडवतात आणि त्यात चर्चेने तडजोड होऊ  शकते. काळातील बदलानुसार आपलं आणि कलेचं परस्परांशी असणारं नातं बदलू शकतं. एखाद्या पुस्तकाचं, लेखकाचं पुनर्वाचन करताना काळाचा, परिस्थितीचा संदर्भ बदलतो, आपल्या आकलनाची पातळी बदलते आणि मग आपल्याला त्याच पुस्तकाच्या वाचनातून काही वेगळं, आधी लक्षात न आलेलं, नव्यानेच समजत जातं. ही वस्तुस्थिती, गमतीदार कल्पनेच्या द्वारा या कवितेत म्युरिअल स्पार्क या स्कॉटिश लेखिकेनं व्यक्त केली आहे.

१ फेब्रुवारी १९१८ रोजी जन्मलेल्या म्युरिअल स्पार्कचे जन्मशताब्दी वर्ष परवापासून सुरू झाले आहे. त्यानिमित्ताने युरोपीय, विशेषत: ब्रिटिश, स्कॉटिश साहित्यजगतात तिच्या पुस्तकांचे पुनर्वाचन होत आहे. तिच्या वाचकांना तिच्या या कवितेची आठवण होणं अगदी साहजिक आहे.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील ब्रिटिश कादंबरीकारांपैकी पन्नास थोर कादंबरीकारांची एक यादी ‘द टाइम्स’ने २००८ साली प्रकाशित केली होती. सर्वेक्षणावर आधारलेल्या या यादीत म्युरिअल स्पार्कचे नाव आठव्या क्रमांकावर होते. अत्यंत टोकदार शैलीबद्दल आणि नावीन्यपूर्ण विषयांमुळे १९६० व १९७० च्या दशकांत तिचे नाव सर्वतोमुखी होते. केवळ युरोपच नव्हे, तर अमेरिकेतही तिच्या कादंबऱ्यांनी वाचकांवर मोहिनी घातली होती. तिच्या कादंबऱ्यांमधील वाक्ये, विशिष्ट शब्दप्रयोग हे समाजात सतत वापरले जाऊ  लागले. त्यांना एक प्रतीकात्मकताच लाभली. ‘द प्राइम ऑफ मिस जीन ब्रॉडी’, ‘द पब्लिक इमेज’, ‘मेमेन्टो मोरी’ यांसारख्या तब्बल २२ कादंबऱ्या, अनेक कथा, कविता, समीक्षात्मक आणि चरित्रलेखन अशी विपुल लेखनसंपदा म्युरिअल स्पार्कच्या नावावर आहे!

१९६१ साली ‘आईकमन’ या जर्मन अधिकाऱ्यावर झालेला प्रसिद्ध खटला ऐकायला, ती जेरुसलेमला वार्ताहर म्हणून गेली खरी, पण वार्तापत्रांऐवजी तिनं ‘मॅन्डेलबॉम गेट’ ही कादंबरी लिहिली. कादंबरीत जेरुसलेमच्या इस्रायल आणि जॉर्डन नियंत्रित भागाचं, विभागलेल्या भूभागातील स्थितीचं जे वर्णन केलंय ते आजच्या वास्तवालाही लागू पडणारं आहे. जगभर चाललेल्या राज्याच्या, देशाच्या विभागणींचं चित्रण करणारी तिची ही कादंबरी आजही समकालीन वाटते.

आज पन्नास वर्षांनंतरही तिची पुस्तकं वाचली जातात, त्यांची पुनर्मुद्रणं होतात. एखाद्या लेखकासाठी हा किती समाधानाचा भाग. म्युरिअलसारख्या लेखिकेला याचा अधिक आनंद! कारण वाचकाला आनंद देणं हे आपलं ध्येय असं मानणाऱ्या म्युरिअलनं शालेय वयापासूनच लेखक होण्याचा निर्णय घेतला होता.

एडिनबर्ग, स्कॉटलंड येथे जन्मलेल्या म्युरिअलचे वडील ज्यू धर्मीय व व्यवसायाने इंजिनीयर होते आणि आई संगीतशिक्षिका व प्रेस्बेटेरियन ख्रिश्चन संप्रदायाची अनुयायी होती. आईची आई मात्र ज्यू होती. ज्यू आणि ख्रिश्चन धर्म व त्यातील वेगवेगळ्या विचारसरणी यांमुळे लहानपणापासूनच म्युरिअलच्या मनात धर्मविचारांचा सतत संघर्ष चाले आणि त्याचा शेवट तिने वयाच्या तिशीनंतर रोमन कॅथलिक चर्चला शरण जाण्यात झाला. पुढे तिच्या मुलाने, चित्रकार रॉबिन स्पार्क याने आग्रहाने ज्यू धर्माचा श्रद्धापूर्वक स्वीकार केल्याने मायलेकात कडोविकडीची भांडणं होत राहिली आणि दोघांनी एकमेकांचं नाव टाकलं. या धर्मातराचं सावट तिच्या आयुष्यावर शेवटपर्यंत राहिलं, त्या छायेतून बाहेर पडणं तिला जमलं नाही.

तिच्या कादंबऱ्यांतील अनेक नायिका या धर्मातरित अथवा अर्ध्या ज्यू, अर्ध्या ख्रिश्चन राहिल्या. मेरी मॅकार्थी या अमेरिकन लेखिकेप्रमाणेच म्युरिअल धर्मभावनेच्या गुंत्यात अडकलेली राहिली. आपल्याकडील साहित्यात धर्मभावनेची प्रेरणा आणि परिणाम ललित लेखनातून क्वचितच प्रतिबिंबित होताना दिसतो. त्यामुळे भारतीय मनाला या गोष्टी फारशा परिचयाच्या नाहीत.

रोमन कॅथलिक चर्चने आपल्याला आश्रय दिला या कल्पनेने मनोमनी शांत झालेली म्युरिअल म्हणते, ‘रोमन कॅथलिक धर्म हाच मला सर्वात विवेकवादी धर्म वाटतो. आपल्या आयुष्यातल्या अनेक प्रश्नांमधून सुटका करून घेण्याचा मार्ग मला या धर्माने दाखवला.’ गंमत म्हणजे, तिचे मुक्त, बंडखोर विचार इथेही दिसतातच. धर्मातर १९५४ साली झाले तरी तिने त्यातील कर्मकांडाला कायमच विरोध केला, तोही उघडपणे. चर्चमध्ये जाणे अनिवार्य असल्याने ती जाई; पण तेथील प्रार्थनासभा संपल्यावर. तेथील दुय्यम-तिय्यम दर्जाची, तीच तीच प्रवचनं ऐकण्यात आपला वेळ घालवावा असं तिला वाटत नसे. मात्र आयुष्यातील या महत्त्वाच्या बदलाने आपण शांतपणे आपलं काम करू शकलो, असा तिचा दावा होता. स्त्रियांना आपल्यातील कलागुणांचा, क्षमतांचा साक्षात्कार उशिराच होतो आणि आपणही त्याला अपवाद नाही, असे ती म्हणते. १९५७ मध्ये, म्हणजे वयाच्या ३९ व्या वर्षी तिची पहिली कादंबरी ‘द कम्फर्टर्स’आणि १९६१ मध्ये ‘द प्राइम ऑफ मिस जीन ब्रॉडी’ प्रसिद्ध झाली.

शाळेत जाणाऱ्या १० ते १२ या वयोगटातील, वयात येणाऱ्या मुली व त्यांची आयुष्ये इतरांपेक्षा वेगळी, सर्वात उठून दिसावीत असा प्रयत्न करणारी जीन ब्रॉडी ही शिक्षिका. पारंपरिक अध्यापन पद्धतीपेक्षा वेगळा मार्ग निवडत, प्रत्यक्ष जीवनाचा अभ्यास शिकवण्याचा आग्रह धरणारी मिस ब्रॉडी बिनधास्त, आत्मविश्वासपूर्ण, उत्फुल्ल अशी आहे. ‘संवेदनशील वयातील मुली माझ्या हाती सोपवा, मग पाहा मी त्यांची व्यक्तित्वं कशी घडवते ते!’ असं आव्हान देणारी-घेणारी मिस ब्रॉडी व तिची कथा विलक्षण लोकप्रिय झाली. म्युरिअलच्या आत्मचरित्राचा एक तुकडाच तिनं इथे वापरला आहे. रेडिओ, दूरचित्रवाणी, नाटक व चित्रपट अशा सर्वच माध्यमांत या कादंबरीचं रूपांतर झालं आणि ती सारी रूपांतरेही समाजमानसावर प्रभाव गाजवणारी ठरली. प्रत्येकाच्या आयुष्यात बहराचा काळ येतोच आणि तो काही केवळ तारुण्यातच असतो असं नाही. तो कधीही येतो, पण तो आपल्याला ओळखता मात्र आला पाहिजे, असं म्युरिअल म्हणते. या कादंबरीवर निघालेल्या चित्रपटाला ऑस्कर मिळालं. या कादंबरीने म्युरिअल आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचली. त्याचा फायदा पुढच्या पुस्तकांनाही झाला. अनेक भाषांमध्ये तिच्या साहित्यकृती अनुवादित झाल्या.

‘मेमेन्टो मोरी’ ही विकल वृद्धावस्था, त्यातील शारीरिक तसेच मानसिक बदल यांचे चित्रण करणारी कादंबरी. अनेकांना ही कादंबरी तिच्या साहित्यकृतींमधील सर्वोत्तम कृती वाटते. ‘लक्षात ठेव, तुला मरायचे आहे,’ या धमकीवजा वाक्याने सुरुवात होणारे निनावी फोन कॉल्स आणि त्यामुळे होणारी मानसिक अवस्था, त्यातील करुण नाटय़ यात तिने रंगवले आहे.

१९५०च्या दशकातील इंग्रजी कादंबरीविश्वासाठी हा विषय आणि त्याची हाताळणी वेगळी होती. कधी निष्ठुरपणे आपल्या पात्रांचे दोष दाखवणे, कधी त्यांच्या स्वभावातील व परिस्थितीतील विसंगतींवर नेमकेपणाने बोट ठेवणे, तर कधी उपहासपूर्ण विनोदाच्या आश्रयाने परिस्थितीची जाणीव करून देणे असे विविध पर्याय वापरीत ती कथानक पुढे नेते.

म्युरिअलच्या कादंबऱ्या या प्रत्येकी शंभर ते सव्वाशे पानांपेक्षा मोठय़ा नाहीत. जाडजूड इंग्रजी कथा-कादंबऱ्यांमध्ये वेगळेपण दाखवणाऱ्या ‘या कादंबऱ्या डाएटवर आहेत की काय?’ अशी शंकाही एका समीक्षकाने घेतली! अर्थात, म्युरिअलला त्याचे सोयरसुतक नव्हते; कारण तिने समीक्षकांना फारसं मनावर घेतलं नाही. ‘माफी मागायची नाही, पश्चात्ताप करायचा नाही आणि कुणाला स्पष्टीकरणं द्यायची नाहीत,’ असा तिचा खाक्या होता. मुलाखतकार, पत्रकार यांच्यापासून ती कायम दूर राहणंच पसंत करे. आपलं खासगीपण जपणं तिला मनापासून आवडे.

वयाच्या १८ व्या वर्षी आपल्यापेक्षा १५ वर्षांनी मोठय़ा असणाऱ्या सिडने ओस्वाल्ड स्पार्क याच्याशी लग्न करून झिम्बाब्वेला गेलेल्या म्युरिअलला विसाव्या वर्षी मुलगा झाला; पण संसार पूर्णपणे अपयशी ठरला. पती हिंसक, मनोरुग्ण होता. त्याच्या नावाच्या आद्याक्षरांचा वापर करीत ती स्वत:चे वैवाहिक जीवन म्हणजे अलीकडच्या भाषेत एस.ओ.एस. (save our souls) आहे असे म्हणे. दुसरं महायुद्ध संपता संपता ती इंग्लंडला परत आली. मुलाला आई-वडिलांच्या ताब्यात देऊन स्वत: पेईंग गेस्ट म्हणून राहात, छोटय़ामोठय़ा नोकऱ्या करत दिवस कंठत होती. मुलाला या साऱ्याचा राग आला आणि त्याने आईशी उभा दावा धरला. तिने पाठवलेले पैसे नाकारण्यापासून तिच्यावर जाहीर आरोप करण्यापर्यंत त्याने केलेल्या साऱ्या गोष्टी तिने सहन केल्या, पण लेखन थांबवलं नाही.

एकूणच तटस्थपणा, अलिप्तता हा तिच्या स्वभावाचा, लेखनाचा एक विशेष राहिला. आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून त्यातील मानवी व्यक्तिरेखांचे चित्रण तिने वास्तवपूर्ण केलंय. त्यांचे स्वभावदोष, वर्तनविसंगती, दांभिकपणा दाखवताना अनेकदा ती निष्ठुर, औपरोधिक होते. स्वत:च्या जीवनाबाबतही असाच अलिप्तपणा तिने जपला. म्हणूनच आत्मचरित्राला तिने नाव दिलंय- ‘Curriculum Vitae – CV’.. म्हणजे केवळ व्यक्तिगत परिचय. लोकांची अपेक्षा होती, की यात तरी तिच्याविषयी तिच्या मनात खोलवर असणारं काही बाहेर पडेल. त्या वेळी जॅकलिन केनेडी ओनॅसिस या ‘डबलडे’ या प्रकाशनात संपादक होत्या. त्यांनी आपणहून या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी एक लाख डॉलर्स देऊ केले होते; पण ते पुस्तक त्यांना मिळालं नाही आणि ‘बेस्टसेलर’ म्हणून आगाऊ  नोंदणी झाली तरी प्रत्यक्ष पुस्तक वाचल्यावर लोकांचा अपेक्षाभंगच झाला. कारण त्यात तिनं आपलं मन उघड केलंही आणि केलं नाहीही. लोकांपुढे जाणं, जाहीरपणे बोलणं सतत टाळणाऱ्या म्युरिअलनं आत्मचरित्राच्या पहिल्या भागात, आपल्या आयुष्यातील केवळ ३९ वर्षांचं- आपली पहिली कादंबरी प्रकाशित होईपर्यंतचं- वर्णन केलं आहे.

आयरिस मरडॉक, ग्रॅहॅम ग्रीन, एवलिन वॉ, डब्ल्यू. एच. ऑडेन यांच्यासारख्या कवी, कादंबरीकार, तत्त्वचिंतक यांच्याशी मैत्री असणारी म्युरिअल आपल्या लेखनकाळात स्वत:ला पूर्णपणे कोंडून घेतल्यासारखी राहात असे. तिचं लेखन बहुतांशी एकटाकी होई.

मनात असं येतं की, शालेय जीवनातही उत्तम कवयित्री म्हणून पुरस्कार मिळवणारी, १९५० च्या सुमारास ‘पोएट्री रिव्ह्य़ू’ या नियतकालिकाची संपादिका, ‘पोएट्री सोसायटी’ची अध्यक्ष आणि मुख्य म्हणजे स्वत: उत्तम कविता लिहिणारी म्युरिअल इतकी अलिप्त कशी? कविमन हे अधिक संवेदनशील असतं या समजाला छेदच दिला तिनं!

परिस्थितीनं तिला स्कॉटलंड, झिम्बाब्वे, इंग्लंड, फ्रान्स, इटली अशा अनेक ठिकाणी फिरवलं. त्यामुळे आपण सगळीकडून हद्दपार होतोय, कुठेच रुजू शकत नाही, अशी काहीशी भावना झाल्यानं हा कोरडेपणा असेल? तिला मांजरीची उपमा दिली जाते ती यातूनच. आपल्या जडणघडणीत कोणाचा फारसा वाटा नाही, असं मानत एकटेपणाला कवटाळणारी म्युरिअल ८८ व्या वर्षी इटलीतील आपल्या घरी मृत्यू पावली.

आयुष्यभर स्वयंभूपणानं जगलेल्या, म्युरिअलनं आपलं स्पार्क हे नाव सार्थ केलं. ठिणगीसारखं तेजपूर्ण, प्रकाशमान, पण दाहकता नसलेलं तिचं लेखन, त्यातील व्यक्तिरेखा (आणि जीवनही) अनेकांना प्रेरणादायी ठरल्या. तीन वेळा बुकर पुरस्कारासाठीच्या लघुयादीत नामांकन मिळालेल्या म्युरिअलला इतर अनेक पुरस्कार मिळाले. पण त्याही बाबतीत ती समाधानी होती. तिच्या म्हणण्याप्रमाणे, ही समधात वृत्ती तिच्या आकाशातल्या पित्यानं तिला दिली होती. त्यामुळे ना खंत ना खेद!

‘करिक्युलम् व्हिटे’

लेखक : म्युरिअल स्पार्क

 प्रकाशक : पेंग्विन  

पृष्ठे : २२४, किंमत : सुमारे ५१५ रुपये (८ डॉलर)

मीना वैशंपायन   meenaulhas@gmail.com