21 March 2019

News Flash

भारतीय क्रिकेटचा ‘रिपोर्ताज’

भारतीय क्रिकेटचा इतिहासपट उलगडून दाखवणाऱ्या पुस्तकाबद्दल..

|| धनंजय रिसोडकर

भारतीय क्रिकेटचा इतिहासपट उलगडून दाखवणाऱ्या पुस्तकाबद्दल..

ज्यांच्या रक्तात क्रिकेट भिनलंय किंवा क्रिकेट हा ज्यांच्यासाठी धर्म आहे, असे कोटय़वधी नागरिक भारतात आहेत. अशा भारतीयांना त्यांच्या लाडक्या ‘देवां’चे विक्रम, त्यांची मैदानावरील अन् बाहेरील कामगिरी, त्यांचे बालपणापासूनचे गुरू, मित्र.. अशा अनेक बाबी अगदी तोंडपाठ असतात. मात्र, जेव्हा मैदानावर काही विशेष घडत असतं, त्या वेळी आपल्या संघाच्या ‘ड्रेसिंग रूम’मध्ये काय सुरू असते? खेळाडूंच्या मनात त्या क्षणी नक्की काय उलघाल होत असते? संघनिवडीपासून अखेरचे ११ खेळाडू मैदानावर उतरेपर्यंत काय काय घडतं? याविषयी मात्र फारच थोडय़ांना ठाऊक असतं. थोडक्यात, पडद्याच्या मागे घडणाऱ्या नाटय़ाविषयी सामान्य क्रिकेटप्रेमी अनभिज्ञ असतात. शिवाय ज्या काही मोजक्या क्रिकेटपटूंनी पुस्तके लिहिली आहेत, त्यात त्यांनी वादांपासून शक्यतो लांब राहण्याचाच पर्याय निवडलेला दिसतो. त्यामुळे पडद्यावर दिसते तितकेच क्रिकेट आणि त्यातील बारकावे सामान्यांना ज्ञात असतात. अशा वेळी समोर येतं बोरिआ मजुमदार लिखित ‘इलेव्हन गॉड्स अ‍ॅण्ड अ बिलियन इंडियन्स’ हे पुस्तक. पडद्यावरील व पडद्यामागील अनेक रंजक घडामोडींची माहिती देत ते भारतीय क्रिकेटचा इतिहासपट उलगडून दाखवतं.

१९७१ सालातील वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्धचे ऐतिहासिक विजय, १९८३ च्या विश्वचषकातील नाटय़, विदेशातील मालिकाविजय, गांगुली-चॅपेल द्वंद्व, आयपीएलचा उदय, २०११ च्या विश्वचषकातील थरार, सचिनची निवृत्ती, विराटपर्वाचा उदय.. असे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील महत्त्वाचे टप्पे या पुस्तकात गुंफण्यात आले आहेतच; मात्र तब्बल साडेचारशे पृष्ठांच्या या पुस्तकाचे वेगळेपण म्हणजे, भारतीय क्रिकेटमधील विविध काळांतील या खेळाडूंचे ‘देवत्व’ आणि त्यांचे ‘माणूसपण’ अशा दोन्ही बाबींचं दर्शन त्यात घडतं. अस्सल क्रिकेटप्रेमी, भारतीय क्रिकेटच्या इतिहासाचे दस्तावेजीकरण करू इच्छिणारा अभ्यासक आणि सामान्य क्रिकेटप्रेमी जिथं पोहोचू शकणार नाही अशा वर्तुळात सहजपणे प्रवेश करू शकणारा क्रीडा पत्रकार अशा तिहेरी भूमिकेतून मजुमदार यांनी हे पुस्तक लिहिलं आहे, याची जाणीव पुस्तक वाचताना सातत्यानं होते.

१८३९ साली बॉस्वेलनामक एका ब्रिटिश शाळामास्तराने भारतात क्रिकेटच्या शुभारंभाचा पहिला प्रयत्न केला. पुढे पारशी समाजानं इथं क्रिकेट रुजविण्यात दिलेलं योगदान, तसेच ब्रिटिशांनी भारतीय सैनिकांना क्रिकेट शिकवून त्याचा उपयोग कसा करून घेतला, याबाबतचे किस्से मोठे रंजक आहेत. त्या वेळी लष्कराच्या ज्या छावण्यांमध्ये क्रिकेट खेळले जात होतं, त्याच बराकपूर, डमडम, आग्रा, कटक, मिदनापूर अशा छावण्यांमधूनच १८५७ च्या उठावाला चालना मिळाली. क्रिकेट या खेळाने भारतीय सैनिकांना कसे मानसिक बळ दिले, त्याचे अनोखे निरीक्षण पुस्तकात नोंदवलेले आहे. पुढे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील भारतीय क्रिकेटच्या इतिहासाची केलेली उजळणीही रंजक तितकीच माहितीपूर्ण आहे. १९३२ च्या जूनमध्ये लॉर्डस्वर इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिलं पाऊल टाकणाऱ्या भारतीय संघाचा पुढे कसोटी मानांकनात अव्वलत्व गाठण्यापर्यंतचा तब्बल आठ दशकांचा प्रवास अत्यंत प्रवाहीपणे या पुस्तकात मांडला आहे. वसाहत आणि वसाहतोत्तर काळातील भारतीय क्रिकेटच्या इतिहासाचं मजुमदार यांनी केलेलं ‘समालोचन’ वाचनीय झालं आहेच, पण त्यातून आधुनिक भारताच्या वाटचालीत क्रिकेटचं असलेलं स्थानही अधोरेखित झालं आहे.

मजुमदार हे गेल्या दीड दशकांहून अधिक काळ क्रीडा पत्रकार व समीक्षक म्हणून कार्यरत आहेत. या काळातील भारतीय क्रिकेटमधील साऱ्याच बऱ्या-वाईट घटनांचे ते अभ्यासू निरीक्षक आहेत. त्यामुळे २००१ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध ईडन गार्डन्सवर झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने मिळवलेला ऐतिहासिक विजय असो वा २००८ साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ओढवलेला वाद; ग्रेग चॅपेल यांच्या प्रशिक्षकीय काळात भारतीय क्रिकेट संघाची झालेली अधोगती असो वा आयपीएलमधील सामनानिश्चिती प्रकरणातील धरपकड किंवा २०११ सालचे विश्वचषक विजेतेपद- या व अशा अनेक घटना मजुमदार यांनी फार जवळून पाहिल्या असल्याने या काळातील घटनांवरील लिखाणात अधिक खोली दिसून येते. एकूणच मैदानावरील घडामोडींची इत्थंभूत माहिती राखणाऱ्या क्रिकेटप्रेमींना मैदानाबाहेरीलही नाटय़ उलगडून दाखवण्यात मजुमदार यशस्वी ठरले आहेत.

  • ‘इलेव्हन गॉडस् अ‍ॅण्ड अ बिलियन इंडियन्स’
  • लेखक : बोरिआ मजुमदार
  • प्रकाशक : सायमन अ‍ॅण्ड शूस्टर पृष्ठे : ४४५, किंमत : ६९९ रुपये

 

dhananjay.risodkar@expressindia.com

First Published on May 5, 2018 2:32 am

Web Title: eleven gods and a billion indians