डॉ. जगतानंद भटकर

भारतभरात विविध ठिकाणी प्राचीन व मध्ययुगीन काळातील कामशिल्पे आढळतात. कामभावनेतील उत्कटता ते बीभत्सता अशा विविध चौकटींत या शिल्पांकडे पाहिले जाते. या दृष्टिकोनांचा वेध हे पुस्तक घेतेच, शिवाय या शिल्पांतून प्रवाहित होत राहिलेले भारतीय सांस्कृतिक संचितही ते आपल्यापुढे सादर करते..

शिल्पे ही संस्कृतीची प्रमाणके आहेत. मानवाच्या भौतिक, जैविक, आध्यात्मिक यांसारख्या सर्व जीवनधारणा आणि प्रेरणा या शिल्पांमधून अभिव्यक्त झाल्या आहेत. अभ्यासकांनी याच जीवनधारणांचा शोध घेत घेत संस्कृतीचा चेहरा स्पष्ट केला आहे. भारतीय संस्कृतीसुद्धा या शिल्पवैभवातून प्रकट होत आली आहे. ‘भारतीय कामशिल्पे’ हा खरे तर जागतिक पातळीवर चर्चिला जाणारा विषय आहे. सर्वसामान्यपणे कामभावनेवर बोलणे, लिहिणे ही तशी सर्वसंमत गोष्ट होत नाही; परंतु या कामशिल्पांचे तार्किक आणि तात्त्विक विश्लेषण होत आलं आहे.

डॉ. सुरेश रघुनाथ देशपांडे भारतीय शिल्पकलेचे साक्षेपी संशोधक. ‘भारतीय शिल्पवैभव’, ‘भारतीय कामशिल्पे’, ‘भारतीय गणिका’, ‘मराठेशाहीतील मनस्विनी’ यांसारख्या समाजमनात कुतूहल असणाऱ्या विषयांवर त्यांनी भारतीय संस्कृतीच्या परिप्रेक्ष्यात वस्तुनिष्ठ लेखन केलं आहे. ‘लव्ह इन स्टोन’ हे त्यांचे इंग्रजीतील पुस्तक अलीकडेच कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे. ‘भारतीय कामशिल्पे’ हा या पुस्तकाचा प्रतिपाद्य विषय. सर्व कामशिल्पांची स्थलपरत्वे माहिती या पुस्तकात दिली आहे. विशेषत: मध्य भारत आणि ओडिसा या प्रांतांतील मंदिरांतील कामशिल्पांची माहिती प्राधान्याने आली आहे.

पुस्तकाचे स्वरूप लक्षात घेता एक गोष्ट प्रकर्षांने लक्षात येते, ती म्हणजे या पुस्तकातील निष्कर्ष आणि मते ही प्रत्यक्ष सर्वेक्षणावर आणि संशोधनावर आधारित आहेत. कामशिल्पांची वर्णनेच केवळ येथे केलेली नाहीत, तर या कामशिल्पांचे तात्त्विक, तांत्रिक आणि तार्किक विश्लेषण केले आहे.

सिंधु संस्कृतीच्या अवशेषांत सापडलेल्या नृत्यांगनेपासून कामशिल्पांचा विचार केला जातो. अलीकडे १८-१९ व्या शतकापर्यंत कामशिल्पे भारतातल्या वेगवेगळ्या प्रदेशांत कोरलेली आढळतात; परंतु कामशिल्पे म्हणून जो काही विशेष अभ्यास केला जातो तो खजुराहो येथील मंदिरावर कोरलेल्या शिल्पांबाबत केला जातो. खुद्द लेखकानेही कामशिल्पे म्हणून जी काही आहेत ती मर्यादित असल्याचे मान्य केले असले, तरी आपल्या विषय विश्लेषणासाठी लेखकाने संपूर्ण भारतातील कामशिल्पांचा आढावा या ग्रंथातून घेतला आहे. अगदी छोटय़ा छोटय़ा ऐतिहासिक गावांमधील मंदिरांवर आढळणाऱ्या कामशिल्पांची उदाहरणे लेखकाने दिली आहेत. संपूर्ण भारतभरात आढळणाऱ्या शिल्पांची स्थलपरत्वे माहिती दिल्यानंतर लेखकाने या शिल्पांच्या निर्मितीमागील प्रेरणांचा आणि प्रयोजनांचा शोध एकेक सूत्र लावून घेतला आहे.

सर्व कामशिल्पांच्या स्थळ आणि काळ व्याप्तीचा अत्यंत मेहनतीने घेतलेला शोध ही या पुस्तकाची जमेची बाजू. अगदी सिंधू संस्कृतीपासून १८-१९ व्या शतकापर्यंतच्या शिल्पांची माहिती चित्रांसह येथे दिलेली आहे. खजुराहो, कोणार्क आणि मोढेरे येथील मंदिरवास्तूत आढळणारी कामशिल्पे आजवर लोकांपर्यंत आली आहेत. या ग्रंथातून मात्र भारतातील छोटय़ा छोटय़ा गावांतील मंदिरांवरील कामशिल्पे अभ्यासकांसमोर आणली आहेत. त्यामुळे कामशिल्पांमागील तत्त्वे शोधण्याचा हा पृष्ठस्तरीय प्रयत्न महत्त्वाचा वाटतो.

कामभावनेतील उत्कटता ते बीभत्सता या चौकटीत कामशिल्पांचा विचार केला जातो. कोणी या शिल्पांकडे मानवाच्या जैविक क्रिया-प्रक्रियांच्या मुक्त प्रकटनाच्या दृष्टीने बघतो, तर कुणाला ही विकृती वाटते. कामशास्त्राच्या अध्ययनासाठी ही शिल्पे कोरली गेल्याचे एक मत आहे. प्रजेच्या सुफलतेसाठी लैंगिक स्वातंत्र्याला धर्माची मान्यता मिळावी यासाठी ही शिल्पे कोरली गेल्याचेही एक मत आहे. ‘जग कसे चालले आहे हे दर्शविण्यापलीकडे अन्य कोणताही हेतू वा उद्देश या शिल्पांच्या निर्मितीमागे असेल असे मला वाटत नाही,’ असे स्पष्ट मत रवीन्द्रनाथ टागोरांनी या कामशिल्पांसंदर्भात दिले आहे. अशा प्रकारे या कामशिल्पांच्या निर्मितीमागील हेतू शोधण्याचा प्रयत्न अनेक अभ्यासकांनी केलेला आहे. त्यात पाश्चात्त्य अभ्यासकांप्रमाणेच आनंद कुमारस्वामी, कार्ल खंडालवाला, कन्वर लाल, अजित मुखर्जी, देवांगना देसाई, एस. बी. दासगुप्ता आदी भारतीय कलासमीक्षकांचाही  समावेश होतो.

‘लव्ह इन स्टोन’ या पुस्तकातही कामशिल्पांच्या या सांस्कृतिक संचिताचे साधार विश्लेषण केले आहे. या शिल्पांचे अर्थ स्पष्ट करणारे ठाम वा निश्चित असे कोणतेही अनुमान साधार मांडणे सद्य:परिस्थितीत अशक्यप्राय असल्याचा निर्वाळा लेखकाने दिला असला तरीही भारतीय संस्कृतीच्या विविधांगी घटकांच्या संदर्भात या शिल्पांच्या निर्मितीमागील अंतस्थ हेतूचा अतिव्याप्त आलेख या पुस्तकातून जरूर हाती येतो.

पुस्तकातील पहिल्याच प्रकरणात भारतीय समाजाचा कामजीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, याचा वेध घेतला गेला आहे.  प्राचीन भारतातील बहुतेक कलाकृती, वास्तू-शिल्पं यांच्यामागची प्रेरणा ही धार्मिक होती.  त्या काळात या धर्माधिष्ठित कलेचा प्रसारही बराच झाला. दुसऱ्या प्रकरणात शिल्पकलेचे अधिष्ठान असलेल्या अशा विविध धर्म-संप्रदाय, या धर्म-संप्रदायांच्या तत्त्वज्ञानातून प्रकट झालेले वैषयिक तत्त्वे आणि कामशिल्पे यांचा सहसंबंध पडताळून पाहिला गेला आहे. योनीची प्रत्यक्ष रूपाने पूजा करणारा ‘कौल’ हा तांत्रिक संप्रदाय, विषयसुख मोक्षदायी मानणारा ‘कापलिक’ संप्रदाय, तसेच ‘नाथ’, ‘वज्रयान’, ‘सहजयान’ या सर्व संप्रदायांतील आचारधर्माची चिकित्साही कामशिल्पांच्या संदर्भात केली गेली आहे. ‘लिटरेचर ऑन सायन्स ऑफ लव्ह’ हे प्रकरण तर या पुस्तकाच्या प्रधान विषयाला न्याय देणारे ठरते. प्राचीन भारतीय साहित्यातील कामविषयक दृष्टिकोन हा खरे तर गहन विषय. डॉ. देशपांडे यांनी तो तेवढय़ाच संशोधनात्मक वृत्तीने मांडला आहे. कलेचे प्रयोजन आणि कारण हे ब्रह्मानंद मिळविणे आहे, असा एक विचार भारतीय साहित्यात दृढ आहे. कामभावना ही ब्रह्मानंद मिळवून देणारी भावना आहे. वैदिक साहित्यात प्रजननाच्या दृष्टीने कामभावनेस महत्त्व होते. ‘साहित्या’तून अभिव्यक्त होणारी कामभावना ही ‘शिल्पां’मधून अभिव्यक्त होणे, या परस्परपूरक बाबी लेखकाने तपशिलाने मांडल्या आहेत. ‘भारतीय साहित्यातील कामशास्त्र’ हा लेखकाच्या चिंतनाचा आणखी एक विषय. वात्सायनाच्या ‘कामसूत्रा’आधीही (इसवी सनाचे तिसरे-चौथे शतक) लेखन झालेला हा विषय ईश्वरी प्रेरणा म्हणून विकसित होत गेल्याचे विश्लेषण लेखकाने येथे सप्रमाण केले आहे. कामशास्त्रामध्ये रतिविलासासंबधी ज्या काही बाबी मांडलेल्या आहेत, त्या कामशिल्पांमधून दृग्गोचर होत असल्याचे लेखकाने स्पष्ट केले आहे.

कामशास्त्रासंबंधी आदिवासी संस्कृतीतील दृष्टिकोनाचा वेध घेणारे एक प्रकरणही पुस्तकात आहे. त्यात आदिवासींची समाजरचना आणि सांस्कृतिक वैशिष्टय़े यांच्यातील स्थायित्वाचा विचार करून त्यांच्या विवाहपद्धतीवर प्रकाश टाकला आहे. मद्य, मांस आणि मैथुन या तीन महत्त्वाच्या बाबी आदिम समाजात प्राधान्याने प्रचलित होत्या. आदिवासींची निष्पाप कामभावना त्यांच्या कलाविषयक जगण्यातून दिसून येते. त्यामुळेच भारतातील अनेक मंदिरे आणि त्यांवरील कामशिल्पे यांत आदिम समाजाचा सहभाग आहे, असे साधार मत लेखकाने येथे मांडले आहे.

कामशिल्पे ही केवळ रतिविलासाचे चित्र प्रस्तुत करत नाहीत, तर त्याबरोबरच काही प्रतीके आणि प्रतिमा या शिल्पांमधून दिसून येतात. एका स्वतंत्र प्रकरणात लेखकाने कामशिल्पे आणि भारतीय संस्कृतीची प्रतीके यांचा सहसंबंध पडताळून दाखविला आहे. ‘शिवलिंग’ हे भारतीय संस्कृतीमधील महत्त्वाचे प्रतीक. या प्रतीकाचा झालेला आध्यात्मिक उत्कर्ष लेखकाने विस्तृतपणे मांडला आहे. ‘वृषभ’ हे आणखी एक महत्त्वाचे प्रतीक. ‘वृष’ म्हणजे सिंचन करणे. ‘वृषभ’ हे पुरुषत्वाचे प्रतीक आहे. ‘पूर्णकुंभ’ हे शारीर प्रतीक. हे कुंभ मातेच्या आणि भूमातेच्या गर्भाशयाचे प्रतीक मानले जाते. हे कुंभ भारतीय मंदिरशिल्पांतील महत्त्वाचे शिल्पांकन आहे. भूमी, योनी आणि चित्शक्ती या अर्थाने पाहिले जाणारे कमळ हे प्रतीक जीवनोत्पादक समजले जाते. शिल्पकलेत कमळाचे अलंकरण अनिवार्य दिसते. ते शिल्पकलेतील कामभावनेला जगण्याच्या सुफलतेचा भावार्थ देतात.

‘मदर गॉडेस’ हे कामशिल्पांच्या प्रेरणा प्रकट करणारे आणखी एक अभ्यासपूर्ण प्रकरण. मातृका मूर्ती आजही भारतात संततीप्रीत्यर्थ पुजल्या जातात. स्त्रीची प्रजोत्पादक शक्ती लक्षात आल्यामुळे तिला मातृदेवतेचे स्वरूप प्राप्त झाले. तिच्या या मातृदर्शक नैसर्गिक प्रवृत्तीचे शिल्पांकन होऊ लागले. हीच पुढील कामशिल्पांची सुरुवात होय, हे लेखकाने सप्रमाण सिद्ध केले आहे.

चार पुरुषार्थामधील एक असणाऱ्या ‘काम’ या पुरुषार्थाला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे; परंतु ही कामभावना स्त्री-सौंदर्य, स्त्री-साहचर्य याशिवाय अपूर्ण आहे. ही अपूर्णता कलेतून प्रकट होत राहते. भारतीय कामशिल्पांची व्याप्ती ही बीभत्सता, उत्तानता, विकृती, रतिविलास या किंवा अशा भावनांपुरती मर्यादित नाही. जीवनोत्पत्ती आणि सुफलता ही मूलभूत तत्त्वे त्यामागे आहेत, हे संस्कृती विकसनाचे टप्पे लक्षात घेऊन डॉ. देशपांडे यांनी या पुस्तकातून मांडले आहे. शिवाय शिल्पकाराचे कौशल्य हादेखील त्यांच्या चिंतनाचा विषय आहे. लेखकाने आपल्या मतांच्या पुष्टीसाठी वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत आणि संस्कृत साहित्यातील अनेक संदर्भाचा वापर केला आहे. त्यामुळे हे पुस्तक कामशिल्पांवरील महत्त्वाचा संदर्भग्रंथ ठरेल यात शंका नाही.

‘लव्ह इन स्टोन’

लेखक : डॉ. सुरेश देशपांडे

 प्रकाशक : कॉन्टिनेन्टल प्रकाशन

 पृष्ठे : १७०, किंमत : २५० रुपये 

mvkoshjagatanand@gmail.com