News Flash

कुतूहल संपत नाही!

गोविंद तळवलकर यांनी लिहिलेल्या लेखाचा हा संपादित अंश..

‘वाचस्पती’ गोविंद तळवलकर आणि ‘न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स’चे संस्थापक-संपादक रॉबर्ट सिल्व्हर्स हे दोघेही एकाच दिवशी काळाच्या पडद्याआड गेले. मराठी वाचकांना इंग्रजी पुस्तकांबद्दलची अभिरुची वाढवणारे लेखन तळवलकरांनी आवडीने केले, तर सिल्व्हर्स हे जगभरच्या इंग्रजी-वाचकांची अभिरुची वाढवण्यासाठीच पाक्षिक चालवीत राहिले. ग्रंथजीवन आणि राजकीय-सामाजिक-आर्थिक जीवन यांची समतानता ओळखणाऱ्या तसेच वास्तव आणि वाङ्मय या दोहोंविषयी कुतूहलयुक्त विश्लेषकवृत्ती असणाऱ्या फार थोडय़ांमध्ये, या दोघांचाही समावेश करावा लागेल.

रॉबर्ट सिल्व्हर्सबद्दल आणि त्यांच्या ‘न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स’विषयी गोविंद तळवलकर यांनी लिहिलेल्या लेखाचा हा संपादित अंश..

सध्या ‘(न्यूयॉर्क) टाइम्स’च्या ग्रंथपुरवणीचा दर्जा घसरला आहे आणि साठ सालीही तो तेव्हाच्या ‘संडे टाइम्स’, ‘ऑब्झव्‍‌र्हर’, ‘न्यू स्टेट्समन’ यांच्या तोडीचा नव्हता. ते कसेही असले, तरी तेव्हा व आजही ‘टाइम्स’च्या या पुरवणीतील जाहिराती आणि ललित व गंभीर पुस्तकांच्या लोकप्रियतेची जी आकडेवारी दर आठवडय़ाला प्रसिद्ध होते, तिला महत्त्व आहे.

‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या संपामुळे अस्वस्थ होऊन एपस्टिन पती-पत्नी व लोवेल पती-पत्नींनी ग्रंथपरीक्षणास वाहिलेले नियतकालिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. एडमंड विल्सन हे नावाजलेले लेखकही त्यांच्या चर्चेत भाग घेत होते. या सर्वानी रॉबर्ट सिल्व्हर्स यांना नव्या नियतकालिकाच्या संपादनकार्यात भाग घेण्यासाठी बोलावण्याचे ठरवले. याला सिल्व्हर्स यांनी लगेच मान्यता दिली. मग बार्बारा एपस्टिन व सिल्व्हर्स या दोघांची संपादक म्हणून नेमणूक होऊन, १ फेब्रुवारी १९६३ रोजी ‘न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स’ या नावाच्या पाक्षिकाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.

एपस्टिन व सिल्व्हर्स यांचे साहित्य व संस्कृतीच्या वर्तुळात अनेक मित्र असल्याने पहिल्याच अंकात ऑडेन, विल्यम सारोयान, नॉर्मन मेलर, मेरी मॅकार्थी, गोर व्हिडाल आणि इतर नामवंतांचे लेख होते. या अंकाचे अपेक्षेपलीकडे स्वागत होऊन एक लाख प्रती हातोहात खपल्या. यामुळे उत्साहभरित झालेल्या या लोकांनी आपल्या नियतकालिकाची आर्थिक बाजूही बळकट करण्याची मोहीम काढली. जाहिरातदारांचे पाठबळ मिळू लागले.

संपादनकार्यात बार्बारा एपस्टिन या मुख्यत: वाङ्मयीन पुस्तकांचा विभाग सांभाळत; तर सिल्व्हर्स हे राजकारण, समाजकारण, आर्थिक इत्यादी विषयांवरील पुस्तके व त्यांचे लेखक यांच्याकडे पाहात. जागरूक, संपादनाच्या बाबतीत काटेकोर आणि लेखकांशी संबंध ठेवण्यात व वाढवण्यात कधीही कसूर न करणारे असे हे दोघे सहकारी होते. २००६ सालच्या जूनमध्ये बार्बारा यांचे कॅन्सरमुळे निधन झाले आणि तेव्हापासून सिल्व्हर्स हे एकमेव संपादक म्हणून आजतागायत काम करीत आहेत.

‘रिव्ह्यू’च्या आरंभकाळीच मोठय़ा घडामोडी घडल्या होत्या व नंतरही घडत राहिल्या. त्याच्या प्रकाशनानंतर अध्यक्ष केनेडी यांचा खून झाला. मार्टिन ल्युथर किंग व रॉबर्ट केनेडी यांच्या खुनांनी राजकीय खूनबाजीचे राजकारण अमेरिकेत रूढ होणार काय, असा प्रश्न पडला. ‘रिव्ह्यू’ने याची दखल घेऊन अनेक लेख प्रसिद्ध केले. अमेरिकेत व्हिएतनाम युद्धाच्या विरुद्ध वातावरण तापू लागले होते आणि अध्यक्ष जॉन्सन हे अमेरिकन सैन्य वाढवीत होते, यामुळे विरोध वाढतच गेला. ‘रिव्ह्यू’ने मग मेरी मॅकार्थी या लेखिकेस व्हिएतनाममध्ये पाठवले, तिच्या वार्तापत्रांनी इतिहास केला.  युद्धविरोध आणि एकंदरच सरकारविरोधी आंदोलने, यामुळे समाजात अस्थिरतेची भावना वाढत होती. १९७० सालच्या सुमारास युरोपातील काही देशांत तर हिंसाचारही वाढला. या हिंसाचाराच्या संबंधात हॅन्ना आरडन्ट या तत्त्वचिंतक लेखिकेने ‘रिव्ह्यू’त लिहिलेला लेख महत्त्वाचा होता. तिने लिहिले, ‘हिंसाचाराने क्रांती होईल, असे ज्यांना वाटते त्यांनी मार्क्‍स आठवावा; कारण त्याला या मार्गाने क्रांती अभिप्रेत नव्हती.’

या पाक्षिकाने केवळ राजकारण, अर्थकारण इत्यादी विषयांनाच महत्त्व देऊन न थांबता, ललित साहित्य, संगीत, चित्रकला, चित्रपट अशा अनेकविध क्षेत्रांतील व्यक्ती व त्यांचे कर्तृत्व यांविषयी जाणकारीने लिहिलेले लेखन प्रसिद्ध करण्यावर पहिल्यापासून कटाक्ष ठेवला आहे. ‘रिव्ह्यू’ने अमेरिकन वाचकांना त्यांच्या देशाच्या पलीकडे बरेच काही आहे आणि त्यांतले बरेच लक्षणीय आहे, याची जाणीव करून देण्याची महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. इंग्लिश लेखकांप्रमाणेच रशियन, जर्मन, फ्रेन्च, इटालियन इत्यादी लेखकांचे लेख व परीक्षणे येत असतात. यामुळे पूर्व युरोप, तुर्कस्तान, इजिप्तपासून भारत, जपान, चीन इत्यादी देशांतल्या लेखकांचे लिखाण ‘रिव्ह्यू’त येत असते.

व्हाक्लॉव हॉवेल हे ‘रिव्ह्यू’चे नित्याचे लेखक आहेत. अमर्त्य सेन यांचेही अनेक लेख या पाक्षिकात आले आहेत. सलमान रश्दी यांनी लेख व भाषणे यांतून मुस्लीम परंपरावाद आणि प्रतिगामी प्रवृत्ती यांवर जाहीर कोरडे ओढले आहेत. ‘रिव्ह्यू’तच त्यांचे हे लिखाण व भाषणे वाचायला मिळाली.

‘रिव्ह्यू’तील लेखांवर संपादकीय संस्कार होतात; काही वेळा अधिक समर्पक शब्द व वाक्यरचना सुचवून लेखकांच्या संमतीने बदल होतात. लेख, ग्रंथपरीक्षणे इतकेच काय, वाचकांच्या पत्रांच्या खालीही तळटिपा दिलेल्या दिसतात. पण विषयाचे विवेचन, लेखकाला त्याचे समाधान होईल एवढा लेख लिहून करता आले पाहिजे, यावर कटाक्ष बाळगला जातो.

सिल्व्हर्स यांनी १९८४ साली नायपॉल यांना रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनासंबंधी लिहिण्यास सांगितले होते. याच अधिवेशनात रेगन यांची रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून निवड झाली. अधिवेशनातील रेगन यांचे भाषण इत्यादी ऐकून नायपॉल यांनी लिहिले, की यापुढे अमेरिकेत नवसनातनवाद वाढत जाणार. तसेच झाले. राष्ट्रीय अहंकार, आर्थिक बाबतीत धनिकांना झुकते माप आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात चढाई अशी रेगन यांची सूत्रे होती. नंतर जॉर्ज डब्ल्यू. बुश अध्यक्ष झाल्यावर याचे टोक गाठले गेले.

इराक युद्धास ‘रिव्ह्यू’ने प्रारंभापासून विरोध केला होता. इराकचे युद्ध सुरू झाले, तेव्हा अमेरिकेची बहुतेक सर्व वृत्तपत्रे आणि टी.व्ही.च्या वाहिन्या बुश यांची पाठराखण करीत आणि वाटेल त्या बातम्या तपास न करता प्रसिद्ध करीत. मग मायकेल मेसिंग या पत्रसृष्टीचा विशेष अभ्यास केलेल्या लेखकाने ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’ यांच्यापासून सर्वाचे पितळ उघडे पाडणारे लेख ‘रिव्ह्यू’त लिहिले.

‘रिव्ह्यू’ची दोन वैशिष्टय़े म्हणजे, त्यात येणारा पत्रव्यवहार. प्रसिद्ध झालेल्या लेखासंबंधी, बाजूने वा विरोधी पत्रे निवडली जातात. ती त्या त्या विषयाच्या अभ्यासकाने लिहिलेली असल्यामुळे हा बौद्धिक वाद उल्लेखनीय ठरतो. शिवाय पत्र लिहिणाऱ्याने चुका केल्या असतील, लेखात जे नाही, त्याबद्दल मत व्यक्त केले असेल, तर संपादकीय टीप देऊन प्रतिवाद केला जातो. दुसरे वैशिष्टय़ म्हणजे, डेव्हिड लेव्हिन यांची व्यंगचित्रे. लेखकाचे व त्याने कोणा व्यक्तीचा लेखात उल्लेख केला असेल, त्यांची छायाचित्रे न देता व्यंगचित्र देण्याचा परिपाठ ‘रिव्ह्यू’ने सुरू केला. एकच व्यक्ती निराळ्या प्रसंगी चित्रकाराला कशी दिसते त्यानुसार तिचे चित्रण होत असे. लेव्हिन यांची ही व्यंगचित्रे वाचकांच्या मनावर ठसली.

सिल्व्हर्स, बार्बारा एपस्टिन, लोवेल पती-पत्नी यांनी १९८४ साली ‘रिव्ह्यू’, री हेडरमन या धनिकाच्या कंपनीला विकण्याचा निर्णय घेतला. ही कंपनी प्रकाशन व्यवसायात असून ‘ग्रान्टा’ या गाजलेल्या मासिकाची मालकीही तिच्याकडे आहे. ग्रान्टा या मासिकाच्या संपादकास मिळत असलेल्या स्वातंत्र्यामुळे कंपनीचा मालक हेडरमन ‘रिव्ह्यू’चे स्वातंत्र्य अबाधित ठेवील, अशी खात्री करून घेऊनच हा विक्रीचा व्यवहार झाला.

गेल्या २५ वर्षांत ‘रिव्ह्यू’चा खप आणि जाहिरातींचे उत्पन्न वाढत गेले. आता खप दीड-पावणेदोन लाखांच्या घरात आहे. यांपैकी बहुसंख्य प्रती या वर्गणीदारांकडे जातात. इंटरनेटवर याचे १५ लाख वाचक आहेत. ज्यास टॅब्लॉइड म्हणतात, त्याच्यापेक्षा थोडय़ा मोठय़ा आकाराचे हे पाक्षिक आहे. प्रत्येक अंक ६४ पानांचा असतो. ऑक्टोबर हा इथे पानगळीचा महिना असतो. तेव्हा त्या वेळी दोन अंक बंद असतात.

‘रिव्ह्यू’संबंधी ‘गार्डियन’ या पत्राने दोन वर्षांपूर्वी पुढीलप्रमाणे अभिप्राय दिला होता. त्याने लिहिले, ‘न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स हे नाव दिशाभूल करणारे आहे. हे पाक्षिक न्यूयॉर्कमध्ये छापले जाते आणि त्यात पुस्तक परीक्षणे येतात, हे खरे आहे. पण जो कोणी या पाक्षिकाचा अंक पाहील, त्याला हे समजेल, की त्यात यापेक्षा बरेच काही आहे. हे मासिक नाही आणि वृत्तपत्र नाही. न्यूयॉर्क व पुस्तके यांच्यापलीकडे त्याची झेप असते. हे संशोधनात्मक वा विद्वत्तापूर्ण लिखाण प्रसिद्ध करते, पण ते विद्वज्जड नाही; काटेकोरपणे संपादन करताना ते रूक्ष होऊ  दिले जात नाही.’ ‘गार्डियन’ने सिल्व्हर्स यांच्या संपादकीय कर्तृत्वासंबंधी म्हटले होते की, त्यांनी कर्तव्य म्हणजे काय, हे दाखवून दिले.

दहा-अकरा वर्षांपूर्वी बर्कली विद्यापीठात सिल्व्हर्स यांची दीर्घ मुलाखत झाली होती. या मुलाखतीत त्यांनी आपली संपादनकार्याबद्दलची दृष्टी आणि या कामातले अनुभव स्पष्ट केले होते. त्यांनी सांगितले की, पुस्तकांची आणि त्यावर परीक्षण लिहिण्यासाठी समीक्षकाची निवड, यांबाबत आपण बरेच काटेकोर राहतो. ‘रिव्ह्यू’कडे येणाऱ्या प्रत्येक पुस्तकावर वा अधिकाधिक पुस्तकांवर अभिप्राय दिलाच पाहिजे, असे बंधन ठेवले जात नाही. यामुळे निवडक पुस्तकांना न्याय देण्याइतके समीक्षण येऊ  शकते.

समाजाच्या विचारांना नुसती चालनाच न देता, विचारालाच वळण देण्याचे सामथ्र्य असलेली पुस्तके थोडीच असतात; पण जी पुस्तके विशेष अभ्यासपूर्वक लिहिलेली असतात, त्यांची निवड केली जाते व त्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. निवडलेल्या पुस्तकावर अभिप्राय देणारा समीक्षक हा त्या पुस्तकाच्या केवळ गुणांवरच लिहील असे नाही, काही वेळा गुण नमूद करून अगदी वेगळा विचारही समीक्षक मांडतो.

जगभर राज्य शासन, मोठमोठय़ा व्यापारी संघटना इत्यादी व्यक्तिगत स्वातंत्र्यांचा संकोच करण्याच्या उद्योगात असतात. ही वस्तुस्थिती चिंताजनक असल्याची एपस्टिन व सिल्व्हर्स यांची धारणा होती. याविरुद्ध जागृती निर्माण करणारे साहित्य देण्यावर ‘रिव्ह्यू’ने कटाक्ष ठेवला.

पुस्तके व लेखक यांच्याबद्दल आपल्याला कुतूहल आणि एक प्रकारची आश्चर्याची भावना असते, असा खुलासा सिल्व्हर्स यांनी केला होता. या लोकांची विचारप्रक्रिया कशी चालते आणि आपल्या विचारांना ते शब्दरूप कसे देतात, यांबद्दलचे कुतूहल कधीच संपले नसल्याची कबुली त्यांनी दिली.

(साधना प्रकाशनाने २०१२ साली प्रकाशित केलेल्या गोविंद तळवलकर लिखित ‘वैचारिक व्यासपीठे’ या पुस्तकातून साभार..)

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2017 2:29 am

Web Title: govind talwalkar the new york review of books robert b silvers
Next Stories
1 लोकांना जे हवं, तेच!
2 उफाडा ओसरल्यावर..
3 ‘खुलाशा’नंतरही उरणारं पुस्तक..
Just Now!
X