31 October 2020

News Flash

स्वप्न आणि स्वातंत्र्य

. सेठ दौलतराम यांच्याप्रमाणे आपणही ‘दिसावर’- म्हणजे बंगालमध्ये जाऊन खूप पैसे कमवायचे स्वप्न तो पाहतो.

रेश्मा भुजबळ

ही कथा समृद्धीचे स्वप्न पाहणाऱ्या राजस्थानच्या खेडय़ातील हरिलालची जितकी आहे, तितकीच ती भारताच्या स्वातंत्र्यलढय़ाची, त्यातील मूल्यसंघर्षांचीही आहे..

लहानपणी आपण आपल्या पालकांकडून किंवा नातेवाईकांकडून अनेक गोष्टी ऐकत असतो. त्यातल्या काही प्रतिमा आपल्या मनावर कायम ठसतात. मग त्या व्यक्तींच्या असतील, वास्तू किंवा वस्तूंच्या असतील. तशा गोष्टींतल्या- मग त्या सत्यातल्या असोत किंवा कल्पनेतल्या, काही पात्रांप्रमाणे आपण वागायचे ठरवतो किंवा मोठेपणी त्यांच्याप्रमाणेच आपल्याला व्हायचे असते. त्या व्यक्ती आपल्यासाठी ‘आयडॉल’ असतात. शेखावतीमधील रामपुरा येथे राहणाऱ्या हरिलाललासुद्धा त्याच गावातील शेठ दौलतराम यांच्याप्रमाणे मोठे नाव कमवायचे असते. ते त्याच्यासाठी ‘आयडॉल’ असतात. त्यासाठी तो राजस्थानमधील लहानशा खेडय़ातून पश्चिम बंगालमध्ये कोलकाता आणि त्यानंतर सध्या बांगलादेशात असणाऱ्या बोगरा येथे जातो. त्याच्या एक सामान्य मुलगा ते एक शेठ होण्याच्या जीवनप्रवासाची कथा म्हणजेच- ‘हरिलाल अ‍ॅण्ड सन्स’! तिचे लेखक आहेत सुजित सराफ. अवकाश संशोधन क्षेत्रात कार्यरत असलेल्या सराफ यांच्या याआधी ‘द पीकॉक थ्रोन’ आणि ‘द कन्फेशन ऑफ सुल्तान डाकू’ या दोन कादंबऱ्या प्रसिद्ध झालेल्या आहेत.

सुजित सराफ यांनी लिहिलेल्या या नव्या कादंबरीचा प्रारंभ होतो तो सन १८९० मध्ये. राजस्थानातील शेखावती भागातील रामपुरा या गावी. तिथे असणाऱ्या धुलीचंद तिबरेवाल यांचा मुलगा हरिलाल हा या कथेचा नायक. तो अवघा १२ वर्षांचा असताना वडिलांच्या आणि त्याच्या शाळेचे मास्तर भोलाराम यांच्या तालमीत शिकत असतो. मास्तर भोलाराम त्याला त्यांच्या ‘बनिया’ म्हणून असणाऱ्या व्यवसायासाठी आवश्यक आकडेमोड करायला शिकवत असतात, तर वडील व्यवहारज्ञानाचे धडे देत असतात. त्या वर्षी ‘छप्पनीया’चा दुष्काळ पडलेला असतो. दुष्काळ, तोही राजस्थानसारख्या रखरखाट असणाऱ्या ठिकाणचा. तेथील वर्णनच आपल्याला अंगावर शहारे आणायला पुरेसे असताना, तशा स्थितीत राहणे नक्की काय असेल हे आपल्या विचारांपलीकडचेच म्हणावे लागते. तर अशा या दुष्काळाच्या स्थितीत एके दिवशी मास्तर भोलाराम यांच्याकडे रात्रीच्या जेवणासाठी थोडे तांदूळ आणायला गेलेल्या हरिलालला त्याच्या वडिलांकडून गावातील सर्वात मोठय़ा हवेलीबद्दल आणि त्याचे मालक शेठ दौलतराम तसेच त्यांचा व्यवसाय, श्रीमंतीबाबत माहिती मिळते.

हरिलालच्या मनात ती हवेली आणि शेठ दौलतराम यांची कथा पक्की ठसते. सेठ दौलतराम यांच्याप्रमाणे आपणही ‘दिसावर’- म्हणजे बंगालमध्ये जाऊन खूप पैसे कमवायचे स्वप्न तो पाहतो. त्यासाठी अंथरुण पाहून हातपाय पसरणाऱ्या आणि अल्पसंतुष्ट असणाऱ्या वडिलांना तो पूर्ण सत्य न सांगता शेठ दौलतराम यांचे मुख्य मुनीम खेमचंद बियानी यांचा मुलगा हेमराज याच्यामार्फत आपले कोलकात्याला जाणे निश्चित करतो. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात किंवा हुशारी समजत असते असे म्हणतात. त्याप्रमाणे हरिलाल आपल्या वडिलांना एकदा म्हणतो की, रामपुरासारख्या ठिकाणी कोणी आयुष्यभर का राहील? त्याच्या उंच भरारीची ही जणू सुरुवातच म्हणावी लागेल.

त्या काळात १२ वर्षांच्या हरिलालचा वाङ्निश्चय झालेला असतो. तो दिसावरला जाणार ही बातमी त्याच्या सासऱ्यांना कळते. तो एकदा दिसावरला गेला की किती वर्षांनी परतेल, याची खात्री नसल्याने ते लग्नाची घाई करतात. हरिलालच्या कथेतून आपण स्वातंत्र्यपूर्व काळातले जीवन अनुभवतो. त्या काळी सगळ्याच गोष्टी मुहूर्त काढून पंडितजींना विचारून केल्या जात असल्याने हरीचा दिसावरला जाण्याचा आणि त्याच्या आधी तीन दिवस लग्नाचा मुहूर्त काढला जातो.

पराकोटीच्या दुष्काळस्थितीत परमेश्वरीशी झालेले हरीचे लग्न, त्यातील रीतिरिवाज यांचे सखोल वर्णन लेखकाने केले आहे. त्यामुळे आपल्याला वाळवंटाची, उंटाच्या सफारीची, राजस्थानी जेवणावळीची, तिथल्या परंपरांची (दुष्काळ नसता तर काय असते आणि दुष्काळामुळे काय होते) सफर घडते. हरी हेमराजबरोबर कोलकात्याला जायला निघातो. त्याच्या डोक्यात शेठ दौलतराम यांची गोष्ट – अकराव्या वर्षी घर सोडून दिसावरला जाणे, हे पक्के ठसलेले आहे. त्यामुळे तो एकटय़ाने जाण्याचे साहस करायला तयार होतो. लहानग्या, तरीही त्याच्या वयाच्या तुलनेत हुशार आणि समंजस असणाऱ्या हरिलालला रेल्वे प्रवासाबाबत, मोठय़ा शहरांबाबत असणारी उत्सुकता, त्याच्या मनात डोकावणारे बालसुलभ प्रश्न, लोकांबद्दल तयार होणारी मते, स्वत:ला पारखून बघणे हे सगळेच कादंबरीत विस्ताराने येत जाते.

पैसा आणि पाणी सांभाळून खर्च करण्याची वडिलांनी दिलेली शिकवण लक्षात असणाऱ्या हरीला कोलकात्यातील पाण्याची मुबलकता आणि सहज मिळणारा पैसा भुरळ घालतोच. खेमचंद बियाणी यांच्या शिस्तीत आणि शेठ दौलतराम यांच्या प्रसिद्ध ‘फर्म’मध्ये काम करताना एकीकडे मुनीम म्हणून धडे गिरवत गिरवत तो पावसावर सट्टा लावण्याचेही धडे कधी गिरवतो, हे त्यालाच समजत नाही. ‘मारवाडी’ म्हणून जगताना, ते संस्कार सांभाळताना हरी बंगाली बोलायला, अननसाचे सरबत आणि चहावर चहा प्यायलाही शिकतो. ताग, सुती कापड यांचा व्यवसाय इंग्रजांबरोबर करायला लागतो. त्या वेळच्या कोलकात्यातल्या प्रसिद्ध फर्मचा, तेथील इमारतींचा, रस्त्यांचा, ट्रामचा, गोदामांचा उल्लेख आपल्याला इतिहासकाळात घेऊन आणतो.

कोलकात्याहून चार वर्षांनी घरी गेलेल्या आणि तेथे दीडएक वर्षे राहून पुन्हा कोलकात्याला परतलेल्या हरीला तिथल्या, तसेच त्याचे कार्यालय असणाऱ्या ‘लाल गोदाम’ इमारतीतील वातावरणात झालेला बदल जाणवतो. त्याला स्वदेशी आंदोलनाविषयी समजते. रवींद्रनाथ टागोर यांचे आंदोलन तो पाहतो. अधांतरी असणाऱ्या भविष्याचा शेवटचा सट्टा तो लावतो आणि सर्व काही गमावून बसतो. त्याच्या या सट्टा प्रकरणामुळे इंग्रज शिपाई त्याच्या मागावर लाल गोदामपर्यंत पोहोचतात. त्यामुळे अवघ्या १९ वर्षांच्या हरीला खेमचंदजी बोगरा येथे पाठवण्याचा निर्णय घेतात. तिथे हरीची खऱ्या अर्थाने शेठ बनण्याकडे वाटचाल सुरू होते. तिथे असणारे मुनीम त्याच्या आजोबांच्या नावाने त्यांच्या दुकानाची नोंद करायचे ठरवतात, तेव्हा अतिशय ठामपणे हरी त्यांना दुकानाचे नाव ‘हरिलाल अ‍ॅण्ड सन्स’ असे सांगतो.

तेथून पुढे हरिलालच्या विस्तारत जाणाऱ्या व्यवसायाची आणि कुटुंबाची कहाणी सराफ यांनी मांडली आहे. ही कथा १९७२ पर्यंत- म्हणजे हरिलालच्या मृत्यूपर्यंत आहे. त्या दरम्यान फाळणी, स्वातंत्र्यपूर्व लढा, गांधीजी असे संदर्भ कथेत येत राहतात. हरिलालच्या कथेबरोबरच मारवाडी धार्मिक पद्धती, त्यांचे विचार, हरिलालचे दुसरे लग्न, त्यापासून झालेली मुले हेही अनुषंगाने येते. कट्टर मारवाडी पद्धतींमुळे, पुरुषसत्ताक पद्धतीमुळे होणारी स्त्रियांची घुसमट, त्यांचे बंदिस्त जीवन हेही विस्ताराने येते. त्या काळातील जातीयवाद कुठे तरी मनाचा तळ ढवळून काढतो. हरिलालचा परमेश्वरीपासून झालेला मुलगा त्रिभुवन हा आधुनिक विचारांमुळे वेगळा ठरतो. त्याचे विचार हरीला कळत नाहीत, मात्र त्याला त्याचे कौतुक असते. त्रिभुवनचे विचार काळाच्याही पुढे जाणारे आहेत. मात्र कधी कधी त्यालाही हरिलालच्या कट्टरतेपुढे झुकावे लागतेच.

स्वातंत्र्यपूर्व काळाची कथा असूनही आजच्या प्रश्नांची बीजे त्या काळात होती, हे दिसून येते. भाकड गायींचा प्रश्न, गाय, डुक्कर यांच्या मांसाचा उपयोग आहारात करणे वगैरे मुद्दे कथेत येतात. हरिलालच्या लहानपणी त्याच्या आवडत्या गायीला त्याचे वडील गोशाळेत सोडतात. कारण दुष्काळामुळे दूध न देणाऱ्या गायीला सांभाळणे अवघड असते. ही घटना बालपणी मनावर ठसलेली असताना हरी जेव्हा बोगरा येथे राहात असतो, तेव्हा तो खाटिकखान्यात मारण्यासाठी आलेल्या गायींचा प्रेमाने सांभाळ करतो. त्यासाठी गोशाला खरेदी करतो. लेखक सुजित सराफ यांच्या आजोबांची ही कथा. त्यांच्या भावाने हरिलाल यांच्या मृत्युपूर्वी त्यांच्याशी बोलून त्यांच्या आठवणी जमा केल्या. त्यानंतर एकूणच हरिलाल यांच्या विस्तारलेल्या कुटुंबातील सदस्यांशी बोलून त्यांच्या आठवणी जमा करून गुंफलेली ही जीवनकथा! यातील ऐतिहासिक संदर्भ आपल्याला इतिहासाची सफर घडवून आणतात. त्याचप्रमाणे त्या काळचे रीतिरिवाज, धार्मिकता यांचेही कंगोरे समजून देतात. तसेच आपल्या वडीलधाऱ्यांकडून झालेल्या चुका आपण टाळल्या तर नक्कीच आपले भवितव्य उज्ज्वल असते, हेही लक्षात येते. असे असतानाही ही केवळ इतिहासाची सफर ठरत नाही, तर वर्तमान आणि भविष्याबद्दलही ती विचार करायला लावणारी कथा ठरते.

‘हरिलाल अ‍ॅण्ड सन्स’

लेखक : सुजित सराफ

प्रकाशक : स्पीकिंग टायगर

पृष्ठे: ५१६, किंमत : ६६९ रुपये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2019 1:07 am

Web Title: harilal and sons book review by sujit saraf zws 70
Next Stories
1 बुकबातमी : ‘एलआरबी’ची सजग चाळिशी..
2 गाथा भारतातल्या वलंदेजांची..
3 मिठाईचा संस्कृती-संगम
Just Now!
X