20 January 2019

News Flash

‘रात्रंदिन युद्धा’च्या कथा..

‘त्यांना सात गोळ्या लागल्या आहेत. जगण्याची शाश्वती नाही..’

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडाजवळच्या जंगलात नोव्हेंबर २०१५ मध्ये दहशतवाद्यांशी मुकाबला करताना जबर जखमी झालेले ४१ राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष यशवंत महाडिक यांना घटनास्थळावरून लष्कराच्या श्रीनगर येथील ९२ बेस हॉस्पिटलमध्ये हेलिकॉप्टरने नेले जात असताना त्यांच्या पत्नी स्वाती यांनी त्यांचे सहकारी मेजर प्रवीण यांना दूरध्वनीवरून एकच प्रश्न विचारला, ‘ते जगतील की मरतील एवढेच सांगा.’ त्याही अवस्थेत कर्नल महाडिक यांच्या पत्नीचा धीरगंभीर आवाज ऐकून मेजर प्रवीण सुन्न झाले. त्यांना काय बोलावे सुचेना. थोडय़ा वेळाने त्यांचा फोन पुन्हा खणखणला. या वेळी स्वाती यांनी विचारले, की त्यांच्या पतीला नेमक्या किती गोळ्या लागल्या आहेत. डॉक्टरांना एरवीही लोक देव मानतात. त्यातही श्रीनगरच्या ९२ – बेस हॉस्पिटलचे डॉक्टर सैनिकांमध्ये जादूगार म्हणूनच प्रसिद्ध आहेत. अत्यंत गंभीररीत्या जखमी जवानांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात त्यांचा हातखंडा. त्यांच्या कौशल्यावर भरवसा ठेवत मेजर प्रवीण यांनी स्वाती यांना कसेबसे उत्तर दिले.. ‘त्यांना सात गोळ्या लागल्या आहेत. जगण्याची शाश्वती नाही..’

.. कर्नल संतोष महाडिक आज आपल्यात नाहीत. पण ‘इंडियाज मोस्ट फीअरलेस’ हे पुस्तक लिहिले जात असताना स्वाती महाडिक लष्कराच्या चेन्नई येथील अधिकारी प्रशिक्षण संस्थेत (ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमी- ओटीए) प्रशिक्षण घेत होत्या. आणि हे परीक्षण लिहिले जात असताना त्या भारतीय लष्करात अधिकारी म्हणून दाखल झालेल्या आहेत.

जम्मू-काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारतीय सेनादलांनी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक्स’च्या पहिल्या अधिकृत वृत्तान्तासाठी हे पुस्तक गाजते आहे. तत्पूर्वी ईशान्य भारतातील दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्याला उत्तर म्हणून भारताने म्यानमारच्या हद्दीत घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा वृत्तान्तही या पुस्तकात आहे. या दोन्ही हल्ल्यांनी भारताच्या शत्रूंना खणखणीत उत्तर दिले. पण शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या वीरपत्नीने पतीचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अंगावर लष्करी गणवेश चढवून जे व्रत घेतले आहे, त्याने शत्रूच्या कानशिलात एक जोरदार चपराक बसली आहे. त्याचा आवाज कोणत्याही सर्जिकल स्ट्राइकपेक्षा मोठा आहे.

पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी हल्ले भारतासाठी नवे नाहीत. त्याला उत्तर म्हणून यापूर्वीही भारतीय सेनादलांनी अशा कारवाया केल्या आहेत. आजवर त्याची जाहीर वाच्यता होत नव्हती इतकेच. याहीपुढे कदाचित त्या होत राहतील आणि त्या त्या वेळच्या राजकीय गरजांनुसार तेव्हाची सरकारे त्यांचा जनभावनेला आकार देण्यासाठी वापरही करतील. मात्र जम्मू-काश्मीर, ईशान्येकडील राज्ये आणि नक्षलवादग्रस्त भागांत आपल्या सेनादलांसाठी रात्रंदिन युद्धाचा प्रसंग आहे. कोणी असे म्हणेल की, सेनादलांना त्याचसाठी तर प्रशिक्षण दिलेले असते. ती जबाबदारी- त्यातील धोक्यांनिशी- त्यांनी समजून-उमजून स्वीकारलेली असते. होय, सीमेचे रक्षण करताना जवान आपले कर्तव्य बजावत असतात हे खरेच आहे. पण जेव्हा कसोटीची वेळ येते तेव्हा प्राणांची पर्वा न करता रणांगणावर सर्वस्व पणाला लावण्यासाठी असाधारण धैर्य लागतेच. त्याचीही सेनादलांमध्ये वानवा नाही. म्हणूनच आपले विहित कर्तव्य बजावताना सैनिक त्यांच्या व्यावसायिक गरजेपेक्षा एक पाऊल पुढे जातात (इंग्रजीमध्ये ज्याला ‘अ‍ॅक्ट्स ऑफ ब्रेव्हरी बियाँड द कॉल ऑफ डय़ूटी’ किंवा ‘विलिंगनेस टू वॉक दॅट एक्स्ट्रा माइल’ म्हणतात) तेव्हा त्यांच्या आख्यायिका बनतात. दहशतवाद्यांचा सामना करताना वीरमरण पत्करलेले हवालदार हंगपन दादा त्यांच्या तुकडीत जिवंतपणीच आख्यायिका बनले होते. तो लौकिक त्यांनी मृत्यूनंतरही कायम राखला. त्यांची कहाणी वाचताना याचा प्रत्यय येतो.

अशा निवडक १४ वीरांच्या शौर्यगाथा लेखक-पत्रकार शिव अरूर आणि राहुल सिंग यांनी ‘इंडियाज मोस्ट फीअरलेस : ट्र स्टोरीज ऑफ मॉडर्न मिलिटरी हीरोज’ या पुस्तकात एकत्र केल्या आहेत. त्यामध्ये घटनांची पाश्र्वभूमी, कारवायांचे बारकावे, सैनिकांचे शौर्य-बलिदान आदी बाबी तर ओघाने आल्याच आहेत, पण त्या मोहिमांसाठी झालेली विविध पातळींवरील तयारी, सैनिकांनी वापरलेल्या शस्त्रास्त्रांचे तपशील, विस्तृत परिघातील एकंदर परिणाम, अन्वयार्थ आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे घटनांचा मानवी चेहरा खुबीने टिपण्यात लेखक यशस्वी झाले आहेत.

दहशतवादी हल्ले किंवा त्यांना प्रत्युत्तर म्हणून केलेल्या कारवायांच्या बातम्या काही काळ येत राहतात. प्रसारमाध्यमांच्या आणि सामान्य नागरिकांच्या रोजच्या धबडग्यात त्या काही वेळाने विरूनही जातात. प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्यदिनी राजधानीत शौर्यपदके देण्यात येतात तेव्हा काही वेळा शहीद जवानांच्या वीरपत्नी धीरगंभीरपणे पतीचे शौर्यपदक स्वीकारताना दिसतात. पुढे ती चित्रेही विस्मरणात जातात. पण या लेखकांनी पुस्तकात सांगितलेल्या कथांच्या बाबतीत हे सगळे तुकडे प्रयासाने जोडून, त्यांची संगती लावून एक परिपूर्ण चित्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे. भारतासारख्या देशात जिथे युद्धांच्या अधिकृत इतिहासाचेही अहवाल अद्याप जाहीर केले जात नाहीत आणि त्याचे दस्तावेजीकरण झालेले नाही तिथे लेखकांचा हा प्रयत्न स्तुत्यच आहे.

उरी येथील हल्ल्यानंतर देश पेटून उठला होता. पाकिस्तानने सहनशक्तीची सीमा पार केली होती. सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठी सेनादलांचे हात शिवशिवत होते. सरकार आणि सेनादलांनी त्या योजनेची तयारीही सुरू केली होती. पण पाकिस्तानला व उर्वरित जगाला त्यांचा सुगावाही लागू नये म्हणून पंतप्रधानांपासून ते नवख्या मंत्र्यांपर्यंत सर्वानी जाणूनबुजून दिशाभूल करणारी वक्तव्ये दिली याचेही वर्णन पुस्तकात आले आहे. कारवाईनंतर त्याची माहिती मिळण्यासाठी लेखकांनी लष्कराच्या मुख्यालयाकडे केलेल्या पाठपुराव्याला सात महिने काही उत्तर मिळाले नव्हते. मग एक दिवस नवी दिल्लीतील साऊथ ब्लॉकमधील लष्कराच्या कार्यालयाच्या तळघरात एका व्यक्तीशी त्यांची भेट घडवण्यात आली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये कारवाई करणाऱ्या तुकडीचा तो नेता होता. पुस्तकात त्याचा उल्लेख सुरक्षेच्या कारणास्तव ‘मेजर माइक टँगो’ असा केला आहे. लष्कराच्या खास पॅरा कमांडो पथकाच्या, अनामिक राहू इच्छिणाऱ्या या मेजरने कथन केलेला कारवाईचा इतिवृत्तान्त अंगावर रोमांच उभे करणारा आहे. एक किस्सा तर खास दलांच्या (स्पेशल फोर्सेस) कमांडोंच्या मानसिकतेबद्दल बरेच काही सांगून जातो. कारवाईला सुरुवात करण्यापूर्वी त्यांचे पथक बरेच तास नियंत्रण रेषेवर दबा धरून बसले होते. ‘आदेश मिळेपर्यंतची ती शांतता अत्यंत भयाण होती. ती सहन करणे अवघड होते. त्यापेक्षा प्रत्यक्ष हल्ला सोपा असतो. त्यासाठीच आमची जडणघडण केलेली असते. एकदा गोळ्यांची बरसात होऊ लागली की आम्हाला परिस्थिती सामान्य झाल्यासारखे वाटते आणि मनावरील दडपण दूर होते,’ असे मेजर टँगो सांगतात. म्यानमारमधील कारवाई ‘भारताच्याच भूमीवर झाली’ असे जरी त्या वेळी त्या देशाने म्हटले असले तरी या पुस्तकात याही कारवाईचे नेतृत्व केलेल्या एका (अनामिक राहू इच्छिणाऱ्या) अधिकाऱ्याच्या तोंडून तिचा वृत्तान्त साकार होतो.

या झाल्या प्रत्यक्ष रणांगणावरील कथा. पण शांतता काळातही सैनिकांना केव्हाही मरणाचा सामना करावा लागतो. जगातील सर्वात उंच युद्धभूमी ठरलेल्या सियाचीनमधील हिमस्खलनात अडकल्यानंतर काही तास का होईना मृत्यूला हुलकावणी देणाऱ्या लान्स नाईक हणमंतप्पा कोप्पड यांची कथा मती गोठवणारी आहे. सतत धुमसणाऱ्या सीमांपासून नौदल तसे काहीसे दूर. नौदलाच्या युद्धांचा प्रसंग तसा विरळा. पण आजकाल सागरी चाच्यांनी समुद्रावर दहशतवाद्यांप्रमाणेच आव्हान उभे केले आहे. सागरी चाच्यांनी ग्रस्त अरबी समुद्र आणि एडनच्या आखातात गस्तीला गेलेल्या ‘आयएनएस सुमित्रा’ या युद्धनौकेला २०१५ साली अचानक जवळच्या संघर्षग्रस्त येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेची जबाबदारी सोपवली जाते आणि ती कमांडर मिलिंद मोकाशी यांच्या नेतृत्वाखालील नौसैनिक कौशल्याने व धैर्याने पार पाडतात. या कारवाईत केवळ भारतीयच नव्हे तर अन्य देशांचे नागरिकही वाचवले जातात आणि भारताची जागतिक पातळीवर वाहवा होते. काही वर्षांपूर्वी याच एडन बंदरात अमेरिकेच्या ‘यूएसएस कोल’ या युद्धनौकेवर झालेला दहशतवादी हल्ला आयएनएस सुमित्रावरील प्रत्येक नौसैनिकाला माहीत होताच. पण तरीही त्या दिव्यात कर्तव्यभावनेने उडी घेणाऱ्या नौसैनिकांच्या शौर्याची जातकुळी एकच! सागरी कारवाईची आव्हाने आणि पोत वेगळा असला तरीही.

या शौर्याला वायुसैनिकांनी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. गुजरातमधील जामनगर येथील हवाई तळावरून २०१६ सालात स्क्वॉड्रन लीडर रिजुल शर्मा मिग-२९ लढाऊ विमानातून नेहमीप्रमाणे उड्डाण घेतात. तळापासून ११० किमी अंतरावर आकाशात १० हजार फुटांवर विमानाची कॅनॉपी- म्हणजे कॉकपिटवरील काचेचे आवरण- निखळून पडते आणि साधारण १२०० ते १३०० किमी प्रति तास वेगाने उडणाऱ्या विमानाच्या केबिनमध्ये शर्मा उघडे पडतात. तुफान वेगाने वाहणारे थंड वारे त्यांच्या शरीराला काही सेकंदांत गोठवून टाकतात. विमानातून इजेक्शन सीट वापरून बाहेर पडण्यास तळावरून परवानगी मिळते. पण तसे करणे म्हणजे विमान गमावणे! ते विमान सोडत नाहीत. सगळे धैर्य एकवटून व कौशल्य पणाला लावून स्वत:सह विमानाला तळावर परत आणतात. विमान नागरी वस्तीवर व कच्छजवळील समुद्रातील तेलविहिरींवर पडू न देता परततात. विमान सुखरूप परत आणून देशाचे कोटय़वधी रुपये वाचवतात आणि काही दिवसांत बरे होऊन पुन्हा हवेत झेपावतात. कामाकडे केवळ एक व्यवसाय म्हणून पाहून हे होत नाही. त्यांच्यासाठी विमान हा धातू आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा नुसता एक सांगाडा नसतो. तो जिवाभावाचा सोबती असतो. सैनिक आणि शस्त्रांतील हे द्वैत संपून अद्वैत निर्माण होते तेव्हाच अशा शौर्यगाथा फुलतात.

हल्ले थांबणार नाहीत. त्यात जिवलग जखमी झाले, शहीद झाले की आम्हाला दु:ख होणार, यातना होणार, नुकसान होणार. पण त्याने आम्ही खचणार नाही. आमचा आत्मा नष्ट होणार नाही. आम्ही धैर्याने पुन्हा उभे राहून लढू. या पुस्तकातील कथांच्या नायकांनी हाच संदेश दिला आहे. सर्जिकल स्ट्राइक्सनेही भारताच्या या बदलत्या भूमिकेला मूर्त स्वरूप दिले आहे.

  • ‘इंडियाज मोस्ट फीअरलेस : ट्र स्टोरीज ऑफ मॉडर्न मिलिटरी हिरोज ’
  • लेखक : शिव अरूर, राहुल सिंग
  • प्रकाशक : पेंग्विन रँडम हाऊस इंडिया
  • पृष्ठे : २७२, किंमत : २५० रुपये

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com

First Published on November 25, 2017 2:44 am

Web Title: indias most fearless true stories of modern military heroes