‘अ‍ॅलिस’ची भारतातल्या बाराएक भाषांमध्ये भाषांतरं झालेली असून पहिलं भाषांतर १९१७ साली गुजराती भाषेत झालंय. मराठीतलं पहिलं रूपांतर यानंतर ३५ वर्षांनी प्रकाशित झालं. भा. रा. भागवतांनी ‘जाईची नवलकहाणी’ या शीर्षकाने केलेलं हे रूपांतर मुंबईच्या ‘रामकृष्ण बुक डेपो’नं १९५२ मध्ये प्रसिद्ध केलं. मराठीतल्या या पहिल्याच रूपांतराला द. ग. गोडसे यांच्यासारखा मातब्बर चित्रकार लाभला होता. हे रूपांतर मुळात भा.रां.च्या ‘बालमित्र’ मासिकात गोडसेंच्या सजावटीसह क्रमश: प्रसिद्ध होत होतं आणि तीच चित्रं घेऊन हे पुस्तक छापण्यात आलं. या पुस्तकासाठी आचार्य अत्रे यांनी प्रस्तावना लिहिली होती. याची दुसरी आवृत्ती पुण्याच्या ‘नितीन प्रकाशना’तर्फे १९७४ मध्ये आली आणि तिच्यासाठी प्रभाकर गोरे यांची चित्रं घेण्यात आली. गोरेंच्याच चित्रांसह, पण प्रताप मुळीक यांचं मुखपृष्ठ घेऊन पुण्याच्या ‘उत्कर्ष प्रकाशना’ने १९९० मध्ये ‘जाईची नवलकहाणी’ची तिसरी आवृत्ती काढली.

भा. रा. भागवतांच्या पहिल्या आवृत्तीनंतर दोनच वर्षांनी, १९५४ साली, मुंबईच्या ‘केशव भिकाजी ढवळे प्रकाशना’कडून ‘वेणू वेडगांवांत’ हे ‘अ‍ॅलिस’चं दुसरं रूपांतर प्रकाशित झालं. रूपांतरकार होते- देवदत्त नारायण टिळक! टिळकांनी याला ‘महाराष्ट्रात अ‍ॅलिस’ शीर्षकाची छोटेखानी प्रस्तावना लिहिली होती. या पुस्तकाच्या शीर्षक पानावर किंवा श्रेय-पानावर चित्रकाराचा उल्लेख नाहीये, पण मुखपृष्ठावर आणि काही चित्रांवर ‘गोळिवडेकर’ किंवा ‘गोलिवडेकर’ अशी सही आहे. या रूपांतराच्या संदर्भात आणखीही थोडी कुतूहलजनक माहिती अशी : टिळकांनी वरील पुस्तक प्रकाशित होण्याच्या २६ वर्ष आधी ‘अ‍ॅलिस’चं आणखी एक रूपांतर केलं होतं. ‘आवडाबाईचा विस्मयपूरचा प्रवास’ या शीर्षकाने ते ‘बालबोधमेवा’ मासिकाच्या एप्रिल १९२८ ते एप्रिल १९२९ च्या अंकांतून क्रमश: आलं होतं. त्यातच थोडे बदल करून ‘वेणू वेडगांवांत’ तयार झालं.

Instagram friend sexually assaults young woman in nagpur
नागपूर : इंस्टाग्राम मित्राचा तरुणीवर लैंगिक अत्याचार
d gukesh
अग्रलेख: महाराष्ट्र ‘दीन’!
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Nita ambani in paithani
Video: पैठणी, चंद्रकोर अन् मराठमोळा साज! NMACC च्या वर्षपूर्ती कार्यक्रमात नीता अंबानी मराठीत म्हणाल्या…

‘अ‍ॅलिस’चं मा. गो. काटकर यांनी केलेलं ‘नवलनगरीतील नंदा’ हे आणखी एक रूपांतर ‘नितीन प्रकाशना’कडून १९७० मध्ये प्रकाशित झालं. त्यात १३ चित्रं आहेत. पण या चित्रांविषयी व मुखपृष्ठाविषयी काही कळू शकलं नाही. या मालिकेतलं चौथं पुस्तक हे ‘अ‍ॅलिस’चं मराठीतलं संक्षिप्त, पण एकमेव भाषांतर आहे. ते मूळ इंग्रजी नावानेच पुण्याच्या ‘सुपर्ण प्रकाशना’ने १९८७ साली प्रसिद्ध केलं. हे भाषांतर केलं होतं मुखपृष्ठ कलाकार सतीश भावसार यांनी. मात्र यातली एक गंमत म्हणजे या पुस्तकात एकही चित्र नाही आणि त्याचं मुखपृष्ठही चित्रविरहित आहे! पाचवं पुस्तक तरुण लेखक प्रणव सखदेव यांनी ‘आर्याची अद्भुत नगरी’ या नावानं केलेलं रूपांतर आहे आणि ‘ज्योत्स्ना प्रकाशना’ने ते गिरीश सहस्रबुद्धे यांच्या चित्रांसह ‘अ‍ॅलिस’ला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने २०१५ मध्ये प्रसिद्ध केलंय. याव्यतिरिक्त सुधाकर मनोहर यांनी केलेल्या ‘नवलनगरीत सुधा’ या एका संक्षिप्त रूपांतराचा ओझरता उल्लेख सुलभा शहा यांच्या ‘मराठी बालवाङ्मय : स्वरूप व अपेक्षा’ या प्रबंधात आढळला, पण त्यातल्या संदर्भ सूचीत तसंच अन्य सूचींतही त्याची काही माहिती नाही. मात्र ‘ग्रंथालय.ऑर्ग’च्या कॅटलॉगमध्ये हे ३२ पानांचं पुस्तक १९५२ सालचं असल्याचा उल्लेख आहे. म्हणजे हे रूपांतरही पहिल्या रूपांतरांपैकी एक आहे? मात्र त्या संकेतस्थळावरही त्याची इतर काहीही माहिती नाही.

ही सर्व रूपांतरं मिळवून त्यांच्यातली चित्रं ‘लिटहब’प्रमाणे एकत्र छापणं किती मौजेचं होईल! ही सर्व पुस्तकं प्रत्यक्ष पाहून परिपूर्ण सूची करू पाहणाऱ्या भविष्यातल्या एखाद्या संशोधकाला या माहितीचा कच्ची सामग्री म्हणून उपयोग होऊ शकेल. मात्र तिच्यात काही अपुऱ्या जागा आहेत. या विषयातल्या जाणकारांनी तिच्यात भर घालून ती निर्दोष करावी अशी अपेक्षा आहे.

jsawant48@gmail.com