मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) ‘वडाळा – सीएसएमटी भुयारी मेट्रो ११’ मार्गिका मूळ संरेखनानुसार व्यवहार्य ठरत नसल्याने नवा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) १५ जूनपर्यंत नवीन आराखडा एमएमआरसीला सादर करणार आहे. प्रवासी संख्येच्या दृष्टीने ही मार्गिका व्यवहार्य ठरावी यासाठी संरेखनात बदल करण्यात येणार आहे. परिणामी, ही मार्गिका नेमकी कुठून कशी जाणार हे जूनमध्ये स्पष्ट होईल.
हेही वाचा : मुंबईत येत्या ३६ तासांत समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता, आयएमडी आणि आयएनसीओआयएसचा इशारा
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ३३७ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील ‘मेट्रो ११’ मार्गिकेच्या उभारणीची जबाबदारी राज्य सरकारने एमएमआरसीकडे दिली आहे. आधी ‘एमएमआरसी’ मेट्रो ११ ची उभारणी करणार होती. या मार्गिकेची जबाबदारी आल्यानंतर ‘एमएमआरसी’ने तिच्या अंमलबजावणीचे काम हाती घेतले. मात्र ‘एमएमआरसी’च्या मूळ आराखड्यानुसार ही मार्गिका प्रवासी संख्येच्या दृष्टीने व्यवहार्य ठरत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या मार्गिकेचा नव्याने आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती ‘एमएमआरसी’च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.