नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूप्रकरणावरील गूढाचा पडदा दूर करण्याचे सर्वच प्रयत्न वादग्रस्त ठरताना दिसतात. ते वाद राजकारणात आजही लागू असलेल्या धारणांशी निगडित असतात. आशीष रे यांचे ‘लेड टू रेस्ट’ हे पुस्तकही त्याला अपवाद नाही. या पुस्तकाच्या ‘वादावर पडदा!’ (१४ एप्रिल) या परीक्षणलेखावरील आनंद हर्डीकर लिखित ‘फसवे पुस्तक, फसवा लेख’ (२१ एप्रिल) या प्रतिक्रियात्मक लेखाचा हा प्रतिवाद..

आशीष रे यांचे ‘लेड टू रेस्ट’ हे पुस्तक फसवे आहे. त्यावरील रवि आमले यांचा ‘वादावर पडदा!’ हा परिचयलेख नव्हे, तर ‘गौरवलेख’ फसवा आहे.

– नेताजींसंबंधी पूर्वीपासून अभ्यास करणारे आणि आता दुसऱ्या एका पुस्तकाच्या परिचयलेखामुळे त्या अभ्यासाला पुन्हा चालना ज्यांना मिळाली ते रा. आनंद हर्डीकर यांचे हे मत. व्हॉटस्अ‍ॅप विद्यापीठातील इतिहास पदवीधरांनी असे मत मांडले असते, तर त्याकडे दुर्लक्ष करता आले असते. रा. हर्डीकर हे गंभीर अभ्यासक आहेत. शिवाय त्यांनी राष्ट्रीय अभिलेखागारात उपलब्ध असलेला आशीष रे व व्ही. पी. सिंग यांच्यातील पत्रव्यवहाराचा ‘सहा पानी दस्तावेज’ही अभ्यासला आहे व ‘पूर्वग्रहविरहित मनाने’ या कूटप्रश्नाचा वेध घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. तेव्हा त्यांनी केलेला प्रतिवाद गांभीर्यानेच घ्यावा लागेल. या लेखातून त्यांनी काही आरोपवजा प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातील पहिला प्रश्न असा की, रे यांनी ऑगस्ट, १९९० मध्ये तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांना पाठविलेल्या पत्राबाबत मौन का बाळगले?

काय होती रे यांच्या त्या पत्रातील भूमिका? तर त्यांना १९९० मध्ये असे वाटत होते की, नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झालेला नाही. त्या अपघाताबाबतच्या पुराव्यांतील अंतर्गत विसंगती, परस्परविरोध लक्षात घेऊन त्यांचे तसे मत झाले होते. तसे त्यांनी सरकारला कळविले होते. याबाबत रा. हर्डीकर यांचा आरोप असा की- ही माहिती रे यांनी ‘आपमतलबी’पणे आणि ‘लपवाछपवी’च्या हेतूने दडवली. तो रे यांचा दुटप्पीपणा होता आणि हे रवि आमले यांच्या लक्षातच आले नाही. वस्तुत: ते पत्र शोधण्यासाठी राष्ट्रीय अभिलेखागारापर्यंतही जाण्याची आवश्यकता नाही. त्याचा उल्लेख अनुज धर यांच्या ‘इंडियाज् बिगेस्ट कव्हर-अप’ या पुस्तकातही येतो. पण प्रश्न आमलेंना ती माहिती असण्या-नसण्याचा नाहीच. प्रश्न रे यांनी त्याबाबत मौन बाळगून दुटप्पीपणा केला की काय, हा आहे. आता समोर असणारे पुरावे, त्यांचे विश्लेषण, अभ्यास यातून एखाद्याने आपले आधीचे मत बदलले, तर त्यास दुटप्पीपणा म्हणावे ही इतिहासाच्या शास्त्रातील नवी पद्धत आहे की काय, याची कल्पना नाही. परंतु ‘१९९५ पर्यंत’ रे यांचे पूर्वीचे मत बदलले होते. नेताजींचा मृत्यू अपघातातच झाला असल्याचे ‘पुरेसे नि:संदिग्ध पुरावे’ आपणासमोर आले होते, असे रे यांनी या पुस्तकातच म्हणून ठेवले आहे. यावर रा. हर्डीकर यांचा सवाल आहेच, की त्यांनी (पक्षी- रे यांनी) कोणते नवे पुरावे शोधून काढले हे सप्रमाण दाखवून द्यायला हवे होते. आता २०१५-१६ मध्ये केंद्र आणि प. बंगाल सरकारने त्यांच्याकडील गोपनीय फायली खुल्या केल्या. नेताजी १९४५ नंतर रशियात गेले, तेथे स्टॅलिनने त्यांना अटकेत ठेवले, असा प्रवाद होता. ज्येष्ठ संपादक दिवंगत गोविंदराव तळवलकर हे नेताजींबाबत संशोधन करीत होते. त्यांनी त्याबाबत रशियाकडे विचारणा केली असता, नेताजींना रशियात कोणत्याही तुरुंगात ठेवले नसल्याचा स्पष्ट निर्वाळा रशियन स्टेट अर्काइव्हकडून देण्यात आला. ती पत्रे १३ जुलै आणि १३ नोव्हेंबर २०१५ ची. या सगळ्याच्या अभ्यासातून, स्वत: केलेल्या संशोधनातून रे यांनी बोस यांच्याविषयीच्या षड्यंत्र सिद्धांतांना विराम देण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्यातूनच तर त्यांचे पुस्तक उभे राहिले आहे.

मात्र रा. हर्डीकरांसाठी ते पुरेसे नसावे. त्यांचे म्हणणे एकच की, डॉ. पूरबी रॉय यांच्या पुस्तकाचा तर्कशुद्ध प्रतिवाद कुठे रे यांनी केलाय? मग ‘तो (म्हणजे नेताजी १९४५ नंतर रशियात होते हा) षड्यंत्र सिद्धांत रद्दीच्या टोपलीत फेकण्याजोगा असल्याचे’ रे यांनी दाखवून दिले आहे, असे आमले कसे म्हणतात? तर ते असे म्हणतात, याचे कारण एक तर ‘कॉक अ‍ॅण्ड बुल स्टोरीज्’ या प्रकरणात तो षड्यंत्र सिद्धांतच असल्याचे रे यांनी म्हटले आहे. रशियाकडून आलेल्या अधिकृत उत्तरांनी तो प्रश्न संपविला असून, त्यावर २०१६ मध्ये जाहीर झालेल्या गोपनीय फायलींनी शिक्कामोर्तब केले आहे, असे रे सांगत आहेत. आता रे यांची ती मांडणी तर्कशुद्ध नाही असे रा. हर्डीकरांना ते पुस्तक वाचूनही वाटत असेल, तर त्यास कोण काय करणार?

परंतु रा. हर्डीकर एवढय़ावरच थांबत नाहीत. रे यांनी काय काय करायला हवे होते याचा सल्ला देताना, ते ‘गुमनामीबाबा प्रकरणा’कडे वळतात आणि म्हणतात, की गुमनामीबाबा हे नेताजीच असल्याचा दावा एवढी वर्षे केला जात आहे. पण हा संपूर्ण ‘षड्यंत्र सिद्धांत’ रे यांनी विचारातच घेतलेला नाही. वस्तुत: त्याची सविस्तर दखल रे यांनी घेतलेली आहे. हे गुमनामीबाबा म्हणजे कृष्णदत्त उपाध्याय ऊर्फ कप्तानबाबा होते व ते एका खून प्रकरणात पसार झाले होते, असे सांगणाऱ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. रे यांनी त्याचाही उल्लेख केला आहे. रा. हर्डीकर यांच्याकडील पुस्तकाच्या प्रतीतून कदाचित ती पाने गहाळ असतील. अन्यथा त्यांनी असा दावा का बरे केला असता? असो.

या प्रतिवादलेखाचा शेवट करताना रा. हर्डीकर यांनी, आमले यांनी या पुस्तकाला अंतिम निर्णायक प्रमाणपत्र देण्याची धाडसी व अभिनिवेशी घाई केली असल्याचे म्हटले आहे. धाडस का? तर अद्याप गुमनामीबाबाचे गूढ उकलले नाही म्हणून! बरोबरच आहे. ते उकलायलाच हवे. पण उकलले तरी, ‘गुमनामीबाबा हेच नेताजी’ ही ज्यांची श्रद्धा आहे किंवा त्या श्रद्धेवर ज्यांचे स्वार्थ उभे आहेत ते त्यावर विश्वास ठेवतील? किमान पेशवाईतील तोतयांच्या बंडांचा इतिहास ज्यांना माहीत आहे ते तरी तसे समजण्याचे धाडस करणार नाहीत. गुमनामीबाबाबद्दल तर एक साधा प्रश्न आहे. नेताजी हे एवढे मोठे नेते होते की, त्यांना भारतात येण्यापासून देशातील कोणतीही शक्ती अडवू शकली नसती. तरीही नेताजी भारतात येऊन गुमनाम बनून का राहिले? त्यांचे देशावर प्रेम नव्हते? बरे संन्यास घेऊन एकदा गुमनाम राहायचे ठरविल्यानंतर ते कुणाला रशियातल्या गोष्टी का सांगत बसले असते? किंवा मग त्यांच्या सामानात चार्ल्स बर्लिट्झचे ‘द बम्र्युडा ट्रँगल’, जॉर्ज अ‍ॅडम्स्कीचे ‘फ्लाइंग सॉसर्स फेअरवेल’ वा आय. जी. बर्नहॅमचे ‘सेलिब्रेटेड क्राइम्स’ अशी पुस्तके का सापडली असती? अशा प्रश्नांना उत्तरे नाहीत आणि तरीही अगदी नेताजींचे काही नातेवाईक गुमनामीबाबालाच नेताजी समजून चालले आहेत. अर्थात, आशीष रे हेही नेताजींचेच नातेवाईक. ते मात्र तोतयांची बंडे मोडून काढत आहेत. त्याचबरोबर नेताजींच्या प्रतिमेचे पुनर्लेखन करण्याचे प्रयत्नही ते उधळवून लावू पाहात आहेत.

आजच्या- म्हणजे ‘नेताजी विरुद्ध नेहरू’ असा सामना लढवून, पंडित नेहरूंना त्यात खलनायक ठरविण्याचा उद्योग लोकप्रिय असल्याच्या – काळात नेताजींच्या मृत्यूविषयीचे षड्यंत्र सिद्धांत काय आहेत व त्यांची वासलात रे यांनी कशी लावली हे सांगणे आवश्यक खरे, परंतु त्याहून महत्त्वाचे होते हे षड्यंत्र सिद्धांत समाजमनातील ज्या पूर्वग्रहांच्या, प्रोपगंडाच्या पायांवर उभे आहेत, ज्यातून व ज्यासाठी लोकांच्या मनात संशयाची भूतं जागविण्यात आली आहेत, त्यांचा लक्ष्यभेद रे यांनी कसा केला हे सांगणे. असा लक्ष्यभेद करणे ही रे यांच्या पुस्तकलेखनामागील एक प्रेरणा असल्याचे सतत जाणवत राहते. त्याबाबतचा परिचयलेख लिहिताना बाकीचे काय नजरेत आले नाही, यापेक्षा ती प्रेरणा नजरेआड झाली नाही ना हे पाहणे महत्त्वाचे होते. ते नीट पाहिले गेले हे आता समजते आहे.

– रवि आमले

ravi.amale@expressindia.com