|| परिमल माया सुधाकर

नव्या तंत्रमाध्यमांचा भारतीय समाजमनावर अगदी कमी कालावधीत पगडा बसला आहे, त्याचप्रमाणे चिनी समाजमनसुद्धा या नवमाध्यमांनी भारावले आहे. या नव्या तंत्रमाध्यमांनी चिनी समाजात घडवलेल्या स्थित्यंतरांबद्दल उपयुक्त चर्चा करणाऱ्या पुस्तकाविषयी..

२१ व्या शतकात नव्या माध्यमांनी अवघ्या जगाला विळखा घातला असताना चीनसारखा महासत्ता बनण्याची आकांक्षा असलेला देश त्यापासून वेगळा राहणे शक्य नव्हते. मागील दोन दशकांत चीनमध्ये माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीमुळे नव्या माध्यमांचा संचार लक्षणीयरीत्या वाढला आहे. ज्याप्रमाणे नव्या माध्यमांचा भारतीय समाजमनावर अगदी कमी कालावधीत पगडा बसला आहे, त्याचप्रमाणे चिनी समाजमनसुद्धा माहिती-तंत्रज्ञानातील नेत्रदीपक प्रगतीने भारावले आहे. माहिती-तंत्रज्ञानातील नवनव्या शोधांचा दैनंदिन जीवनात उपयोग करण्यावर पाश्चिमात्य जगताप्रमाणे चिनी समाजाचासुद्धा भर आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विज्ञानातील नवी क्षेत्रे पादाक्रांत करणे शक्य असल्याची जाणीव चिनी व्यवस्थेला व समाजमनाला झालेली आहे. त्यामुळे माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पाश्चिमात्य जगताशी बरोबरी करण्याची ईर्षां आणि वैज्ञानिक प्रगतीच्या पुढील टप्प्यात जागतिक नेतृत्वस्थानी असण्याची जिद्द चीनमध्ये निर्माण झाली आहे.

मानवाच्या समाज म्हणून झालेल्या उत्क्रांतीत वैज्ञानिक प्रगतीचा वाटा मोठा आहे. माहिती-तंत्रज्ञानामुळे मानवी समाजात मोठे बदल घडू लागले आहेत. वैज्ञानिक प्रगतीचा पुढचा टप्पा माहिती-तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच साकार होणार आहे. मात्र जोवर माहिती-तंत्रज्ञानाच्या वापरात मानवी समाज परिपूर्ण होत नाही, तोवर नव्या वैज्ञानिक गरजा व जिज्ञासा जागृत होणार नाहीत आणि त्याशिवाय वैज्ञानिक प्रगतीच्या पुढच्या शिखराकडे वाटचाल सुरू होणार नाही. त्यामुळे साहजिकच चीनसारख्या देशांचा भर माहिती-तंत्रज्ञानातील संशोधनाने निर्माण झालेल्या सामाजिक व आर्थिक शक्यतांची पूर्तता करण्यावर अधिक आहे. माहिती-तंत्रज्ञानाने जी ‘नवी माध्यमे’ (न्यू मीडिया) तयार केली आहेत; त्यात केवळ समाजमाध्यमां(सोशल मीडिया)चाच समावेश नाही, तर स्मार्ट शहरे, अतिवेगवान व सुरक्षित वाहतूक व्यवस्था, वेगाने सरासरी वयोमान वाढणाऱ्या समाजाच्या गरजांची पूर्तता करणारी माध्यमे आदींचाही समावेश आहे. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या एका अहवालानुसार – ज्या वेगाने चीनच्या लोकसंख्येचे सरासरी वय वाढते आहे, त्याप्रमाणात २०५० साली चीनला तब्बल १० ते १५ कोटी श्रमिकांची व विविध सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींची गरज भासू शकते. अशा परिस्थितींवर माहिती-तंत्रज्ञानातून उपलब्ध झालेल्या माध्यमांच्या साहाय्याने तोडगे शोधता येतील का, यावर चीनसह जगभर गंभीर विमर्श सुरू आहेत. या पाश्र्वभूमीवर चीनची विद्यापीठे आणि तेथील माहिती-तंत्रज्ञानाशी संबंधित संस्था नव्या माध्यमांचा कशा प्रकारे उपयोग होतो आहे आणि याबाबतीत सामाजिक स्तरावर कोणकोणते प्रयोग सुरू आहेत, याविषयी सजग झाल्या आहेत.

‘सेज’ प्रकाशनाच्या ‘चायना स्टडीज्’ या मालिकेअंतर्गत प्रसिद्ध झालेले ‘न्यू मीडिया अ‍ॅण्ड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सोशल लाइफ इन चायना’ हे संपादित पुस्तकही त्या सजगतेचाच परिपाक आहे. शांघाय विद्यापीठातील दोन प्राध्यापक (शिनश्यन वू, हान ड्रेन्ग) आणि दक्षिण चीन तंत्रज्ञान विद्यापीठातील एका प्राध्यापक (शिआऊकुन वू) यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हे संपादित पुस्तक साकार झाले आहे. शहरीकरण व शहरीकरणाशी संबंधित धोरणांच्या व्यवस्थापनात माहिती-तंत्रज्ञानाची भूमिका, विशेषत: ई-प्रशासन, सामाजिक सुरक्षा, निर्णय प्रक्रिया व निर्णयाची अंमलबजावणी करणारी व्यवस्था आदी मुद्दय़ांवर विविध अभ्यासकांनी स्वतंत्र लेखांत विस्तृत चर्चा केली आहे. याशिवाय जागतिक आर्थिक संकट, घटते ऊर्जा स्रोत आणि प्रदूषणाचे संकट या सार्वत्रिक समस्यांवर नव्या माध्यमांच्या साहाय्याने मात करण्याबाबतचा ऊहापोहही काही लेखांत आढळतो.

नव्या माध्यमांनी चार क्षेत्रांवर कशा प्रकारे प्रभाव पाडला आहे, याचे विश्लेषण हा पुस्तकातील सर्व लेखांना सांधणारा धागा आहे. स्मार्ट शहरांच्या बांधणीत नव्या माध्यमांचा प्रभाव आणि उपयोग हे यापैकी पहिले क्षेत्र. चिनी विद्वानांसह युरोपीय तज्ज्ञ मंडळींनी याबाबत स्वतंत्र लेखांत विवेचन केले आहे. युरोपमध्ये उगम पावलेली ‘स्मार्ट सिटी’ ही संकल्पना चीनने चालू शतकाच्या सुरुवातीलाच उचलून धरली. मात्र युरोपीय शहरांची संरचना आणि चिनी शहरांची संरचना परस्परांहून भिन्न आहे. युरोपमधील बहुतांश शहरे स्थिरावली आहेत, तर चीनच्या शहरीकरणाला अद्याप विराम मिळालेला नाही. साहजिकच स्मार्ट शहरांकडून युरोपच्या अपेक्षा आणि चीनच्या अपेक्षा वेगवेगळ्या आहेत. मात्र या वेगवेगळ्या अपेक्षांना पूर्ण करण्याची क्षमता माहिती-तंत्रज्ञानात आहे.

पुस्तकात चर्चिलेले दुसरे क्षेत्र म्हणजे शहरी जीवनाशी संबंधित विविध व्यवस्था आणि कार्यपद्धती. या क्षेत्रातील नव्या माध्यमांचा सहभाग व उपयोग याविषयीचा ऊहापोह काही लेखांत आहे. उदाहरणार्थ, शहराच्या निरनिराळ्या भागांतील हवाप्रदूषणाच्या रोजच्या नोंदी घेणे व त्या नागरिकांसह संबंधित अधिकारी वर्गाकडे पोहोचवणे. या कामासाठी नव्या तंत्रमाध्यमांचा उपयोग आणि या माहितीच्या आधारे नागरिक व अधिकारी यांच्या दैनंदिन व्यवहारांत व कार्यतत्परतेत फरक पडला आहे की नाही, याबाबतची निरीक्षणे घेण्यासाठीही नव्या माध्यमांचा उपयोग याची चर्चा एका लेखात आहे. याशिवाय शहरांतील सांस्कृतिक कार्यक्रम, विविध उत्सव यांचा नागरिकांच्या आनंदी वर्तणुकीशी कसा संबंध आहे; दुसऱ्या पिढीतील स्थलांतरित श्रमिकांवर समाज-माध्यमांचा कितपत व कसा प्रभाव आहे, आदी मुद्दय़ांचे विवेचनही याचसंदर्भात केले आहे. चीनच्या शहरीकरणात अलीकडच्या काळात स्थलांतरित श्रमिकांना स्थान मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र त्यांचा ग्रामीण सांस्कृतिक परंपरांशी असलेला ऋणानुबंध अद्याप कायम आहे. याचा चीनच्या शहरीकरणाच्या प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता मोठी असल्याने याविषयीचे चिंतन आवश्यक झाले आहे.

पुस्तकात प्रकाशझोत टाकलेले तिसरे क्षेत्र म्हणजे चीनमधील माध्यमांवर माहिती-तंत्रज्ञानाचा प्रभाव व त्या अनुषंगाने घडणारे बदल हा आहे. चीनच्या सिनेक्षेत्रावर नव्या माध्यमांचा आणि माहिती-तंत्रज्ञानाचा प्रचंड प्रभाव आहे. चिनी सिनेमाला हॉलीवूडच्या दर्जाचे बनवण्यासाठी चित्रपट निर्मात्यांचा खटाटोप चालला आहे. यासाठी आवश्यक ते सर्व तांत्रिक सहकार्य करण्याची चिनी सरकारची तयारी आहे. चीनला महासत्ता व्हायचे असेल, तर केवळ आर्थिक व लष्करी शक्ती वाढवून ते स्थान टिकवता येणार नाही याची चीनच्या सत्ताधारी पक्षाला चांगलीच जाणीव आहे. यासाठी मनोरंजन (सिनेमा, समाजमाध्यमे व टीव्ही), शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवणे चीनच्या साम्यवादी पक्षाला आवश्यक वाटते आहे. चिनी प्रेक्षकांची मनोरंजनाची भूकसुद्धा सातत्याने वाढते आहे. मनोरंजनाचा आशियाई स्तर आणि मनोरंजनातील तंत्रज्ञानाचा पाश्चिमात्य स्तर अशी भारतीय सिनेमातील जुगलबंदी चिनी सिनेमातदेखील बघावयास मिळते.

पुस्तकातील चर्चेत समाविष्ट चौथे क्षेत्र पत्रकारितेच्या शिक्षणात होत असलेल्या बदलांच्या संदर्भात आहे. नव्या माध्यमांच्या आगमनाने पत्रकारितेचे क्षेत्र आमूलाग्र बदलू लागले आहे. नव्या माध्यमांना न्याय देण्यासाठी चीन व अमेरिकेच्या पत्रकारिता शिक्षणात होत असलेल्या बदलांची तुलना एका प्रकरणात करण्यात आली आहे. मुळात चीनमध्ये पत्रकारिता आणि त्यासाठीचे शिक्षण-प्रशिक्षण आहे का, अशा शंकांना छेद देणारा हा तुलनात्मक अभ्यास आहे. चीनमध्ये आर्थिक सुधारणा लागू झाल्यानंतर विविध नियतकालिकांच्या प्रकाशनाला उधाण आले होते. नियतकालिके म्हटले तर पत्रकारिता आणि त्यासाठीचे शिक्षणसुद्धा आलेच! याच काळात पत्रकारिता शिकवणाऱ्या(!) संस्थांचे पीक जसे भारतात आले, तसे चीनच्या शिक्षण संस्थांमधूनही अनेक युवक-युवती ‘पत्रकार’ बनून बाहेर पडू लागले. पर्यावरण पत्रकार, क्रीडा पत्रकार, सिनेपत्रकार, आंतरराष्ट्रीय बातम्यांचे पत्रकार, वाणिज्य पत्रकार, तंत्रज्ञान पत्रकार, गुन्हेगारीच्या बातम्यांचे पत्रकार, शिक्षणसंबंधी पत्रकार, इत्यादी इत्यादी. ही नियतकालिके आणि त्यांतील पत्रकार-संपादक हे आता चीनच्या नागरी जीवनाचे महत्त्वाचे भाग झाले आहेत. माहिती-तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून समाजमाध्यमांचे जाळे तयार होण्यापूर्वी हे सर्व घडले होते. समाजमाध्यमांच्या प्रसाराने तर प्रत्येक चिनी नागरिकाला इतरांपुढे व्यक्त होण्याची संधी मिळाली आहे आणि अनेक नागरिकांनी या संधीला कवटाळले आहे.

चिनी समाजात घडत असलेली स्थित्यंतरे या पुस्तकातील लेखांमध्ये व्यवस्थित टिपलेली आहेत. चिनी समाजकारणातील सर्वच बदल एका पुस्तकात समाविष्ट करणे शक्य नाही आणि उचितही नाही. मात्र नव्या माध्यमांच्या प्रभावातून होणारे बदल आणि नव्या माध्यमांमार्फत घडवण्यात येणारे बदल याबाबतचे एक चित्र या पुस्तकातून निश्चितच उभे राहते.

  • ‘न्यू मीडिया अ‍ॅण्ड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सोशल लाइफ इन चायना’
  • संपादन : शिनश्यन वू, हान ड्रेन्ग, शिआऊकुन वू
  • प्रकाशक : सेज
  • पृष्ठे: २५६, किंमत : १,१७५ रुपये

parimalmayasudhakar@gmail.com