चित्रकलेच्या लिलावांमधल्या बोली हुच्चपणे वाढत असतात, याची माहिती अनेकांना असेलच. पण हाच न्याय जुन्या आणि दुर्मीळ पुस्तकांनाही लागू होतो, हे मुंबईच्या एका लिलावकंपनीनं नुकतंच सिद्ध केलं. ‘सॅफरॉनआर्ट. कॉम’या २००० सालापासून कार्यरत असलेल्या चित्रलिलाव-कंपनीची ‘स्टोरी लिमिटेड’ ही उपकंपनी हल्लीच स्थापन झाली. डिझाइन, दागदागिने व जडजवाहीर, अन्य संग्रा वस्तू आणि पुस्तकं यांचे लिलाव आता ‘स्टोरी लिमिटेड’मार्फत व्हावेत, असं ‘सॅफरॉनआर्ट.कॉम’ नं ठरवलं. तोवर ‘सॅफरॉनआर्ट.कॉम’चा पसारा इतका वाढला होता की, अमेरिकेत आणि दिल्लीसह अन्य भारतीय शहरांत त्यांचे ‘.कॉम’च्या – म्हणजे इंटरनेटवरल्या- लिलावांखेरीज प्रत्यक्ष लिलावसुद्धा होऊ लागले होते. कोटय़ानुकोटींच्या बोली ‘सॅफरॉन’नं पाहिल्या होत्या. पण ‘स्टोरी लिमिटेड’नं फक्त कलापुस्तकांपुरताच ठेवलेला हा पहिलाच लिलाव. त्यातून फार तर ४५ लाख रुपये मिळतील, अशी अटकळ खुद्द लिलावकर्त्यांनीच बांधली होती.. पण एकंदर बोली लागल्या तब्बल ९७ लाख ९३ हजार ९९ रुपये, इतक्या! काही पुस्तकं एकेकटी, तर काही पुस्तकांचे संचच्या संचच विकण्याची चतुराई ‘स्टोरी लिमिटेड’नं दाखवली होती. ‘मार्ग’ या त्रमासिकाचे जानेवारी १९४७ ते जून २०१३ पर्यंतचे दरवर्षीचे बांधीव खंड (एकंदर ६४ खंड) सर्वाधिक – १९ लाख सहा हजार २०० रुपयांची बोली मिळवणारे ठरले. त्याखालोखाल १२ लाख २७ हजार ९९७ रुपयांची बोली एफ. एन. सूझा यांनी लिहिलेल्या ‘वर्ड्स अँड लाइन्स’ सह त्यांच्या १९४० च्या दशकापासून भरलेल्या प्रदर्शनांच्या पुस्तिकांचा संच (वरचं छायाचित्र पाहा) मिळवून गेला! सूझांच्या या संचात तीन घडय़ांच्या पत्रिकेपासून कापडी बांधणीच्या पुस्तकापर्यंतचे २१ जुने छापील नग होते. तिसऱ्या क्रमांकाची बोली होती नऊ लाख ९७ हजार २०० रुपयांची, तीही ‘इंडियन आर्टिस्ट्स’ या १६ मासिकवजा पुस्तकांच्या संचाला मिळाली. चौथी आठ लाख ४० हजारांची बोली अमृता शेर-गिल यांच्या विषयीची आठ पुस्तकं-मासिकं अशा संचानं मिळवली.. युरोपात वाढलेल्या आणि आधुनिक भारतीय कलेची एक अध्वर्यू ठरलेल्या या चित्रकर्तीच्या पत्रव्यवहाराचं पुस्तक तीन वर्षांपूर्वी निघालं होतं, ते नवं पुस्तकसुद्धा पाच हजार रु. वगैरे किमतीचं होतं! राजा रविवर्मा यांच्याविषयी १९०३ साली रामानंद चटर्जी यांनी लिहिलेलं पुस्तक आणि ‘राजपूत’ या मासिकाचा १९११ सालचा (रविवर्मावर एक लेख असलेला) अंक, या जोडीची किंमत आली पाच लाख ९६ हजार ४०० रुपये. गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोरांच्या हस्ताक्षरातला एक कागद चिकटवलेली ‘गीतांजली’ ची १९१९ सालची प्रत चार लाख ४१ हजार २४० रुपयांना विकली गेली, तर शांतिनिकेतनचेच नंदलाल बोस यांच्याविषयीची दोन इंग्रजी पुस्तकं, त्यांच्यावरला लेख असलेलं एक वार्षिक आणि त्यांनीच बंगालीत लिहिलेलं पुस्तक असा चारचा संच तीन लाख ५६ हजार ७६० रुपयांची बोली मिळवणारा ठरला!
अशी ५१ पुस्तकं (किंवा संच) या लिलावात होते. त्यापैकी ४१ विकले गेले. तेव्हा कलापुस्तकं महाग असतात म्हणून यापुढे ओरड न करणं बरं! ती आज महाग वाटली, तरी उद्या त्यांना सोन्याचा भाव येईलही!!