गोविंद डेगवेकर

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पर्शियाशी झालेल्या युद्धात फ्रान्सचा दारुण पराभव झाला. त्यामुळे झालेल्या सर्वव्यापी वाताहतीतही एक घराणे पाय रोवून उभे राहते, दागिने घडवण्याचा व्यवसाय सुरू करते आणि त्याच्या तीन पिढय़ा तो कल्पकपणे भरभराटीलाही आणतात.. त्या भरभराटीची रोचक कहाणी सांगणाऱ्या पुस्तकाविषयी..

जुलै, १८७० मध्ये फ्रान्सचा सम्राट नेपोलियन-तिसरा याने पर्शियाशी वैर घेतले आणि देशाला युद्धाच्या खाईत लोटले. या ६२ वर्षीय सम्राटाचे शरीर अनेक व्याधींनी आधीच विकल झाले होते, तरीसुद्धा त्याचा युद्धज्वर काही ओसरलेला नव्हता. रणांगणावर कसे आणि कितपत लढू, याचीच शाश्वती नसलेल्या सैन्याला पर्शियाच्या तोफांच्या तोंडी देण्याचाच तो प्रकार होता. सरतेशेवटी व्हायचे तेच झाले. पराभवामागून पराभवामुळे फ्रेंच सैनिकांचा गात्रभंग झाला तो कायमचाच. साधारण महिन्याभरात पर्शियन लष्कराने सैनिकांच्या दोन तुकडय़ांवर ताबा मिळवला. यातील एक तुकडी सम्राटाच्या नेतृत्वाखालील होती. ती सेदान येथे पर्शियाच्या टाचेखाली आली आणि नेपोलियन साम्राज्याचा नि:पात झाल्याची घोषणा करण्यात आली. सम्राज्ञी यूजिनी अंगावरील एकमेव दागिन्यासह इंग्लंडला पळून गेली. तिला राइड येथे घेऊन जाणाऱ्या जहाजाच्या मालकाची पत्नी लेडी बर्गोइन हिच्या हाती तिने लॉकेट सोपविले. देशाच्या अनिर्बंध सत्तेचे प्रतीक म्हणून कधीकाळी अंगावर मिरवलेले हिरे-मोती अशाश्वत भविष्यासाठी काही रक्कम मिळविण्यासाठी कामी आले होते.

पॅरिसमध्ये लष्करी छावण्या पडल्या होत्या. पर्शियाच्या वेढय़ात फ्रेंच सैनिक अडकले होते. पुढील पाच महिने वेढा तसाच कायम होता. यात पहिला घाला पडला तो छानछौकीच्या, आरामाच्या जीवनावर आणि नंतर मग फ्रेंचवासीयांच्या मुखी लावण्यासाठी अन्नही उरले नाही. पोटाची आग मिटविण्यासाठी पर्शियन सैनिकांच्या नजरा  हळूहळू लवलवत्या घोडय़ांवर पडू लागल्या. पुढे घोडय़ांचे मांसही कमी पडू लागले. फ्रान्स खंक झाला. प्रत्येक व्यवसाय जवळजवळ संपल्यात जमा झाला होता. देशातील एकतृतीयांश प्रदेशाची युद्धाच्या वणव्यात राखरांगोळी झाली होती.

पर्शियाचा चॅन्सेलर ओटो फॉन बिस्मार्क याने फ्रान्सच्या राजधानीवर बॉम्बवर्षांवाचा आदेश दिला आणि उरलासुरला प्रदेशही उद्ध्वस्त झाला. फ्रेंच सैनिक पर्शियाला शरण गेले. एकीकडे सैनिकांचे शिरकाण आणि दुसरीकडे नागरिकांना अन्नाचा एक दाणाही मिळणार नाही, याचा पुरेपूर बंदोबस्त पर्शियन लष्कराने केला होता. त्यामुळे हजारो फ्रेंच नागरिकांनी देश सोडलेला होता आणि तितकेच लोक देश सोडण्याच्या प्रयत्नात होते. पॅरिस शहर आता जवळपास रिकामे झाले होते. शहरात एकही कलावंत उरलेला नव्हता, ना कारागीर. फ्रान्सच्या आजवरच्या इतिहासातील हा सर्वात मानहानीकारक पराभव होता.

अशा या हतोत्साह करणाऱ्या वातावरणात कोणत्याही प्रकारचा व्यवसाय उभारणे जवळजवळ अशक्य होऊन बसले होते. लुइस फ्रान्स्वा कार्तिए यांची स्थिती याहून काही वेगळी नव्हती. त्यांनी पॅरिस सोडण्याचा निर्णय घेतला आणि स्पेनच्या उत्तरेकडील बास्क प्रांतातील सॅन सॅबेस्टिन येथे स्थिरावले. ‘पर्शियन सैनिकांकडून या भूमीवर होत असलेली बळजोरी उघडय़ा डोळ्यांनी पाहण्याची माझ्यातली ताकद आता संपलीय,’ असे त्यांनी त्यांचा मुलगा अल्फ्रेड याला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. म्हणजे कार्तिए घराण्याचा जडजवाहिऱ्यांचा उन्नत अवस्थेला पोहोचलेला व्यवसाय अल्फ्रेड याच्या हाती सोपविल्यानंतरची ही घटना होती. परंतु युद्धकाळातही अल्फ्रेड यांनी पॅरिस न सोडता कुत्र्या-उंदरांच्या मांसावर गुजराण करीत दिवस काढले. हाती काहीच शिलकी नाही, अशी अवस्था असताना अल्फ्रेड यांच्या मनात एक आशा फुलली ती दागिने विकणाऱ्यांच्या आणि ते खरेदी करणाऱ्यांच्या इच्छेमुळे. अल्फ्रेड यांनी दोघांची गरज पुरवली. यात एका मदनिकेचीही मदत त्यांना झाली आणि त्यानंतर त्यांनी इंग्लंडमध्ये दालनच उघडले. अर्थात वडील फ्रान्स्वा यांनी सोपवलेली जबाबदारी निव्वळ अल्फ्रेड वारसदार आहे म्हणून नव्हती, तर व्यवसायासाठी दिलेली काहीएक रकमेची परतफेड केल्यानंतरच कंपनी विकण्याचे वा तिचे हस्तांतरण करण्याचे अधिकार फ्रान्स्वा यांनी अल्फ्रेड यांना दिले होते, हे विशेष. या दीड शतकांहून अधिक काळच्या व्यावसायिक भरभराटीची रोचक कहाणी ‘द कार्तिएस् : अनटोल्ड स्टोरी ऑफ द फॅमिली बिहाइण्ड द ज्वेलरी एम्पायर’ या पुस्तकात वाचायला मिळते.

हिरे-मोत्यावरील कलाकुसरीत जगभरात मोठे नाव कमावलेल्या, किंबहुना या व्यवसायातील सम्राटपदी पोहोचलेले कार्तिए घराणे. अर्थात सम्राटपदाला पोहोचण्याआधीचा प्रवास सोपा नव्हता, हे वाक्य हमखास अशा धाटणीच्या पुस्तकांमध्ये छापले जातेच. म्हणजे खूप खूप संपत्ती कमावलेल्या आणि चरमपदाला पोहोचलेल्या अनेक घराण्यांच्या कथा या अशाच असतात. पण कार्तिए घराण्याचा उन्नतीच्या दिशेने झालेला प्रवास त्याहून निराळा आहे. ही उन्नती केवळ खिसेभरू या प्रवृत्तीतून साधलेली नव्हती. अभंग जिद्द, सचोटी, प्रसंगी प्रचंड नुकसान सोसण्याची तयारी आणि समजा नियतीने तसे काही घडवून आणलेच तर त्याला हसतमुख चेहऱ्याने सामोरे जायचे हे कार्तिए घराण्याच्या वृत्तीतच पडलेले आणि पाडलेले पैलू होते. त्यांतील काही परिस्थितीने दिलेले होते, तर काही स्वत:हूनच सिद्ध केलेले होते. ‘पैलू’ हा शब्द या घराण्याचा प्राण होता. कार्तिएचा व्यवसायच माणिक-मोती, पाचू-हिऱ्यांचे दागिने घडविण्याचा आणि विकण्याचा होता. राजस ऐश्वर्याला कुठेही उणेपणा येऊ नये, अशी अस्सल कारागिरी आणि ते दालनात विकण्यासाठी ठेवल्यानंतर लागणारी प्रसन्नता कार्तिए घराण्याकडे काठोकाठ होती. आजकालच्या अनेक जवाहिऱ्यांच्या चकचकीत काऊंटरवरील सेल्समनच्या चेहऱ्यावर ताणून आणलेल्या हसण्याच्या अभिनयासारखी ती नव्हती. कार्तिएच्या सुहास्याचा अव्हेर समोरच्या व्यक्तीला अर्थात ग्राहकाला जवळजवळ अशक्य व्हायचा. या साऱ्याचे उगमस्थान लुइस फ्रान्स्वा होते. त्यांनी कार्तिएच्या वारसांसाठी जणू मंत्रच दिला होता : ‘सर्वाचा आदर करा. मग त्याचे समाजातील स्थान कितीही खालचे असो वा सर्वात वरचे. सर्वासम दयाबुद्धीने वागा!’

जिद्द, चिकाटी, कठोर मेहनत, सातत्य, नावीन्य आणि कामातील आनंद या साऱ्याचा पाया लुइस फ्रान्स्वा यांनी घातला. कठोर मेहनतीची लुइस यांची व्याख्या २४ तासांतले १४ ते १५ तास कसून काम, अशी होती. अर्थात त्या बदल्यात मिळणारी रक्कम मोजण्याचे कष्ट त्यांना कधी पडले नाहीत, इतका तो अल्प असायचा! लुइस फ्रान्स्वा यांना शिकायचे होते. पण घरात सात तोंडे खाणारी. शिक्षण सोडून लुइस वडील पिअर यांनी सुचविलेल्या दागदागिने तयार करणाऱ्या पॅरिसमधील मरेस भागातील कारखान्यात प्रशिक्षणार्थी म्हणून काम करू लागले. रोज अर्धा तास पायी प्रवास करून लुइस कारखान्यात कामाला सुरुवात करत, पण कामात शिक्षा करण्यासाठी वरिष्ठांकडे अनेक कारणे असायची. म्हणजे प्रशिक्षणार्थीच्या कानशिलात लगावणे, हाताला मिळेल ते फेकून मारणे, नाहीच तर चाबकाचे फटके मारून एखाद्याला सुतासारखे सरळ करण्याची कला कंपनीतील प्रत्येक वरिष्ठाला साधली होती. कंपनीचा नवा मालक मस्यू बर्नार्ड पिकार्ड याने फ्रान्स्वा यांची चिकाटी पाहिली आणि त्यांना हात दिला. पिकार्डने विकायला काढलेली कंपनी फ्रान्स्वा यांनी विकत घेतली आणि ‘कार्तिए’च्या हिरेजडित मुकुट-मोत्याच्या दागिन्यांच्या निर्मितीला १८४७ पासून आरंभ झाला.

गुरू हातचे राखून शिष्याला शिकवत असतो, असे काही थोर कलावंतांच्या बाबतीत गमतीने म्हटले जाते. म्हणजे गुरूच्या अंगचा एखादा दुर्मीळ गुण शिष्याच्या रक्तात नाही मुरत कधी कधी, असा त्या गमतीमागचा अर्थ असतो.  पण स्वत:जवळ शिल्लक काही ठेवायचेच नाही. जे काही द्यायचे ते भरभरून, असे जर एखाद्या गुरूने ठरवले असेल आणि जे जे गुरू ओतेल ते ते शोषून घेण्याची शिष्याची तयारी असेल, तर मग गुरू आणि शिष्य हे दोघे शरीराने अलग, पण अंतरंगातून एकच असतात. पॅरिसमधील अत्यंत नावाजलेले जवाहीर अडॉल्फ पिकार्ड आणि लुइस फ्रान्स्वा यांच्यातील गुरू-शिष्याचे नाते हे असे होते. असे हे एकत्व एकमेकांसाठी ऊर्जास्रोत म्हणून कसे काम करते, हे या पुस्तकात कथन करण्यात आले आहे.

या पुस्तकात कार्तिए घराण्याचे आजोबा, वडील आणि तीन नातू यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख मांडण्यात आला आहे. यात कार्तिए घराण्यातील सदस्यांमध्ये असलेल्या भावनिक नात्यांची वीण लेखकाने वेगवेगळ्या घटनांमधून उलगडून दाखवली आहे. कार्तिए घराण्याचे स्वत:चे असे रिवाज होते. भावना आणि कर्तव्य या दोन्हींची त्यांनी कधीही मिसळ केली नाही. कठोर शिस्तीला पर्याय नव्हताच आणि झटपट यशावर कार्तिए घराण्यातील तीनही पिढय़ांनी कधी विश्वास ठेवला नाही.

अल्फ्रेड यांची तीन मुले लुइस, पिअर आणि जॅकस्. या तिघांनी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ‘कार्तिए’चे साम्राज्य विभागून घेण्याचा महत्त्वाकांक्षी नियोजनबद्ध निर्णय घेतला. तिघांमधल्या पिअर कार्तिए याने १९०२ साली इंग्लंडमध्ये दालन उघडले. जॅकस्ने १९०९ मध्ये न्यू यॉर्कमध्ये, तर सर्वात थोरला लुइस याने पॅरिसमध्येच राहणे पसंत केले. तिघेही समाजशील व्यावसायिक म्हणूनच कायम आघाडीवर राहिले. सुरुवातीला केवळ भारत आणि ब्राझिलमध्येच मिळणाऱ्या हिऱ्यांचा जगात अन्य कोठे शोध लागतो का, यासाठी फिरस्ती सुरू ठेवली. सौंदर्याची सर्वोत्तम जाण असलेल्या तिघा भावांनी आशिया खंडातील भारतात आणि आफ्रिका खंडातील इस्लाम देशांत वापरल्या जाणाऱ्या हिऱ्यांच्या दागिन्यांची निर्मिती करून आपला जागतिक प्रभाव कायम ठेवला. त्याच वेळी एक बंधनही ते नेहमीच पाळत आले : एकदा तयार केलेला दागिना पुन्हा तसाच बाजारात आणायचा नाही. आजही ‘कार्तिए’ने केलेली निर्मिती ही पहिल्या निर्मितीहून निराळीच असते.

‘द कार्तिएस् : अनटोल्ड स्टोरी ऑफ द फॅमिली बिहाइण्ड द ज्वेलरी एम्पायर’

लेखक : फ्रान्स्वा कार्तिए ब्रिकेल

प्रकाशन : बॅलन्टाइन बुक्स

पृष्ठे : ६२५, किंमत : ७९९ रु.

govind.degvekar@expressindia.com