28 February 2021

News Flash

अन्यायाविरुद्ध खणखणीत आवाज..

 ‘द लास्ट गर्ल’ हे पुस्तक तिची कहाणी सांगतं. ती होती, एक सर्वसामान्य घरातली एक सर्वसामान्य मुलगी.

आरती कदम arati.kadam@expressindia.com

त्यांच्या- म्हणजे आयसिसच्या दृष्टीनं नादिया मुराद ही कुणी तरी अल्पसंख्याक मुलगी.. तिला हवं तसं वापरायचं, लैंगिक गुलाम बनवायचं हेच त्यांना माहीत आणि तेच त्यांनी कित्येक मुलींबाबत केलं. पण नादिया या छळातून केवळ सुटली नाही तर तिच्यासारख्या अनेकींवरच्या अन्यायाला तिनं वाचा फोडली..

I  want  to  be  the last girl  in  the world with  a  story  like  mine…

नादिया मुरादच्या ‘द लास्ट गर्ल’ या पुस्तकातलं हे शेवटचं वाक्य, तिला भोगाव्या लागलेल्या कडेलोट यातनांचं सार सांगणारं! नादिया मुराद आत्तापर्यंत अनेकांना माहीत झाली आहे ते तिला मिळालेल्या नोबेल शांतता पुरस्कारामुळे (२०१८, डेनिस मुक्वेगे यांच्यासह विभागून). आज ती जगप्रसिद्ध आहे, संयुक्त राष्ट्रांची सदिच्छादूत आहे. अत्याचारग्रस्तांचा आवाज आणि स्त्री अधिकाराचा उद्गार बनली आहे. इस्लामिक स्टेट इन इराक अ‍ॅण्ड सीरिया अर्थात ‘आयसिस’च्या क्रूर कहाण्यांची साक्षीदार बनून न्याय मागणारी नादिया जगभर हिंडते आहे, आपल्या याझिदी धर्मातल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी आणि अद्यापही आयसिसच्या ताब्यात असलेल्या आपल्या असंख्य याझिदी बहिणींच्या सुटकेसाठी संयुक्त राष्ट्रांचे दरवाजे ठोठावते आहे. आज तिचं काम जगभर व्यापून राहिलं आहे, पण कोण होती ही नादिया?

‘द लास्ट गर्ल’ हे पुस्तक तिची कहाणी सांगतं. ती होती, एक सर्वसामान्य घरातली एक सर्वसामान्य मुलगी. २०-२१ वर्षांची. आई, आठ भाऊ  आणि दोन बहिणींबरोबर इराकच्या उत्तरेकडील सिंजार भागात, कोचो या छोटय़ाशा गावात राहणारी. शेती आणि मेंढपालन करणाऱ्या कुटुंबात राहणारी याझिदी धर्मातली मुलगी. आठ वर्ष चाललेलं इराण-इराक युद्ध, अमेरिकेचा हस्तक्षेप, सद्दाम हुसेनचे अल्पसंख्याकांना जबरदस्तीने त्यांच्या गावांतून हाकलून लावण्याचे प्रयत्न, आयसिसचा उगम आणि त्यानंतर त्यांची वाढत चाललेली दहशत.. एका बाजूला हे सुरू असताना त्या तुलनेत तिचं कोचो गाव मात्र शांत होतं. पण २०१४ चा ऑगस्ट महिना त्यांच्यासाठी काळ ठरला. सुन्नी मुस्लीम असणाऱ्या ‘आयसिस’च्या दहशतवाद्यांना धर्मग्रंथ नसणाऱ्या आणि पुनर्जन्म मानणाऱ्या याझिदी धर्माचं अस्तित्वच मान्य नव्हतं. या याझिदी पंथाला नष्ट करणं आपलं कर्तव्यच आहे, ही भावना घेऊन तिच्या गावात शिरलेल्या या दहशतवाद्यांकडून एका रात्रीत ३,००० याझिदी पुरुषांची हत्या केली जाते, काही हजार मुलींना ‘सेक्स स्लेव्ह’ वा लैंगिक गुलाम बनवलं जातं. एक हसतंखेळतं गाव उजाड होऊन जातं.. आणि अत्यंत कृश, सशाचं काळीज घेऊन जगणारी नादिया अन्यायाविरुद्धचा खणखणीत आवाज बनते!

मात्र हे पुस्तक वा आठवणी लिहिण्याची गरज निर्माण झाली ती नादियावर आणि तिच्यासारख्या असंख्य मुलींवर झालेल्या शारीर अत्याचारांमुळे. ‘नग्नसत्य’ या मुक्ता मनोहर यांनी जगभरातल्या इतिहासावर आधारित लिहिलेल्या पुस्तकात त्या म्हणतात, ‘कधी वांशिक वर्चस्व म्हणजे देशप्रेम, तर कधी कधी धार्मिक वर्चस्व म्हणजे देशप्रेम, हे हातात हात घालून जाताना दिसतात. शासनपुरस्कृत वांशिक दंगली असोत वा आक्रमक धोरणामुळे सुरू केलेल्या वांशिक दंगली असोत, त्यांचं उद्दिष्ट जेव्हा एखाद्या जमातीचं र्निवशीकरण हे असतं तेव्हा त्यात अटळपणे स्त्रियांवर बलात्कार केले जातात. मुख्य हेतू ती संपूर्ण जमात नष्ट करण्याचा असतो, पुरुषी विषयवासना शमवण्यासाठी ते कधीच केले जात नाहीत.’ नादियाला आलेले अनुभवही याच प्रकारातले होते. लैंगिक गुलाम (यासाठी आयसिसचा शब्द- ‘सबीया’) म्हणून विकलं गेल्यानंतर आपल्याला काय भोगायला लागणार, याची कल्पना असूनही प्रत्यक्षात तिला जे भोगावं लागलं ते फारच क्रूर होतं. सुरुवातीला तिचा एकच मालक होता- हाजी सलमान. पण बलात्कार करताना इतका आवाज करायचा की संपूर्ण इमारत थरथरेल. मारहाण करणं, सिगारेटचे चटके देणं, बलात्कारापूर्वी मेकअप करायला लावणं, मध लावलेले तळवे चाटायला लावणं हे कमी क्रूर ठरलं जेव्हा तिनं पळून जायचा अयशस्वी प्रयत्न केला तेव्हा. ती पकडली गेली तेव्हा त्यानं तिला चाबकानं फोडून तर काढलंच, पण नग्न करून आपल्या सहा सुरक्षारक्षकांना तिच्यावर ‘सोडलं’. ती म्हणते, ‘एकामागोमाग एक बलात्कार. फक्त शरीरं बदलली जात आहेत एवढंच कळत होतं.. शेवटी शेवटी तर मी इतकी बधिर होत गेले, की त्यानंतर बलात्कार आणि आयसिस यांच्याबद्दलची भीतीच नष्ट होऊन गेली..’ ही पळून जाण्याची कृती तिला फारच महागात पडली. कारण नंतर सलमानने तिला विकून टाकलं. त्यानंतरच्या प्रवासात तिला रस्त्यावरील चेकपॉइंटवरच्या एका खोलीत बंद केलं गेलं. चेकपॉइंटवर येणारे-जाणारे कुणीही तिच्यावर बलात्कार करू शकत होते. ‘..माझ्या आतलं काही तरी मरून गेलं,’ ती सांगते. पण तरीही तिच्या मनात ना कधी आत्महत्येचा विचार आला, ना कधी स्वत:विषयी करुणा दाटून आली. तिला मरायचं नव्हतं, तिला जिवंत राहायचं होतं स्वत:वरच्या अत्याचाराची, आई-भावांच्या क्रूर हत्येची दाद मागण्यासाठी आणि मुलांनी आयसिसमध्ये भरती व्हावं यासाठी त्यांचं केलं जाणारं ‘ब्रेनवॉश’ जगासमोर उघडं पाडण्यासाठी. म्हणूनच ती त्यातून तीन महिन्यांत बाहेर पडू शकली आणि जगासमोर या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी खणखणीतपणे उभी राहिली. हे पुस्तक त्याचाच बुलंद आवाज आहे.

इतक्या क्रौर्याचा अनुभव देऊनही हे पुस्तक, मानवतेच्या दहशतवादावरल्या विजयाची गोष्ट सांगतं. एका बाजूला अन्वनित छळ आहे, तर दुसरीकडे सहृदय मनही आहे. नादियालाही माणुसकीचा अनुभव आला तो नासीर आणि त्याच्या कुटुंबाकडून. एके दिवशी तिला ठेवलेल्या खोलीला कुलूप लावलं नसल्याचं लक्षात आल्यावर सुटकेचा विचार पुन्हा एकदा तिच्या मनात आला आणि ती बाहेर पडली. दहशतवाद्यांच्या नजरा चुकवण्यासाठी बुरखा तिच्या उपयोगी आला. कुणाचा दरवाजा ठोठवावा या संभ्रमात असताना एक दरवाजा तिच्यासाठी उघडला गेला. सुन्नी मुस्लिमांचंच ते घर होतं; परंतु ते आयसिसच्या विचारांना न मानणारं होतं. मुलींवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध होतं. नादिया सुरक्षित हातात होती, मात्र तिला तिच्या कुटुंबात परत जायचं होतं.

पुढल्या घटना वेगानं घडतात. नादियाचा कोचोबाहेर असलेल्या भावाशी- हेन्झीशी- फोनवरून संपर्क होतो आणि तिच्या सुटकेचा मार्ग किलकिला होतो. मात्र आयसिसचा सक्त पहारा असताना इराकमधून कुर्दिस्तानात पोहोचणं अवघडच. नासिर या संपूर्ण वाटेवर तिच्याबरोबर सावलीसारखा असतो, अगदी जिवावर उदार होऊन. आयसिसच्या लोकांना शंका जरी आली तरी त्याचंच नाही तर त्याच्या कुटुंबाचं काय होईल, याची पूर्ण कल्पना असूनही हे सपूर्ण कुटुंब नादियाच्या सुटकेसाठी ठामपणानं उभं राहिलं आणि त्यांनी ते निभावलं.  हेन्झीसारखे आणखी काही तरुणही जीव धोक्यात घालून लैंगिक गुलाम म्हणून विकल्या जाणाऱ्या मुलींना सोडवण्यासाठी ‘तस्करी’चा मार्ग अवलंबत होते. त्यांनीही अनेकींना सोडवलं. दरम्यान, कुर्दीश सैन्यानेही प्रयत्न सुरू केले होते. नादियाचा नासीरबरोबरचा सुटकेचा प्रवास थरारक आहेच. बनावट पारपत्र बनवणं, ओळख बदलणं, नवरा-बायकोचं नाटक करणं, या साऱ्यांतून तिचं भावापर्यंत पोहोचणं, इतरही मुलींची सुटका, भूसुरुंगांमुळे भाचीचा मृत्यू पाहावा लागणं, हे २२ वर्षीय नादियासाठी किती भयानक असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो.

नादियानं निदान आपल्या भावनांना शब्दांद्वारे वाट करून दिली; परंतु अशा असंख्य मुली अनेक ठिकाणी शारीर व्यापारात अडकवल्या गेल्या आहेत. त्यांच्याही कहाण्या शब्दबद्ध करण्याची गरज या पुस्तकाच्या निमित्ताने अधोरेखित होते.

आठवणींचं हे पुस्तक नादियाबरोबर लिहिलंय, पत्रकार जेन्ना क्राजेस्कीने. नादियाच्या भावनिक विस्फोटाला तिनं दिलेल्या सौम्य रूपामुळे हे पुस्तक ‘सेन्सेशनल’ झालेलं नाही. बलात्कारांचा अनुभव असो की याझिदींचं घडवून आणलेलं हत्याकांड, कुठेही बटबटीतपणा न येता संयत रूपात येतं आणि म्हणूनच वाचकांच्या मनाला अधिक भिडतं. एक प्रसंग वर्णन केला आहे.. एकामागोमाग एक बलात्काराने बधिर झालेल्या नादियाला त्याही परिस्थितीत एका सुरक्षारक्षकाचं कृत्य लक्षात राहतं. तो बलात्कार करण्यापूर्वी स्वत:चा गॉगल काढतो. काळजीपूर्वक टेबलावर ठेवतो आणि मग तिच्यावर ‘तुटून’ पडतो. गॉगलची काळजी करणाऱ्या त्याला जिवंत नादियाबद्दल जराही सहानुभूती नसावी, या विसंगतीतलं कौर्य वाचक म्हणून आपल्यालाही अस्वस्थ करतं. मात्र नादियाचंही त्या भयानक अवस्थेतही मनाचा तोल जाऊ  न देणं, स्मरणशक्तीच्या बळावर सहीसलामत सुटणं, जिवंत राहण्याची आणि सुटकेची तिची मनाच्या तळापासूनची इच्छा, याचमुळे ही एक साधीसुधी मुलगी ‘ह्य़ूमन राइट्स प्राइझ’ जिंकून जागतिक स्तरावरची कार्यकर्ती ठरली.

अमेरिकेचा हस्तक्षेप, इराण-इराक युद्धाचे पडसाद, आयसिसचा प्रभाव, कुर्दिश सैन्याचं काहीसं दुटप्पी वागणं कमी होत चाललेली याझिदींची संख्या, या साऱ्या विषयांना हे पुस्तक स्पर्श करीत असलं तरी ‘सेक्स स्लेव्ह’ म्हणून विकल्या गेलेल्या आणि अनन्वित अत्याचार सहन करणाऱ्या नादिया आणि तिच्यासारख्या असंख्य याझिदी मुलींचा आवाज जगानं ऐकावा, त्यांना न्याय मिळावा, याची गरज प्रामुख्यानं व्यक्त करतं.

कारण जोपर्यंत माणसातलं क्रौर्य, स्वार्थ जिवंत आहे, दुसऱ्या माणसांविषयी, त्याच्या जाती-धर्माविषयी तिरस्कार आहे तोपर्यंत अमानुष अत्याचार सहन करणारी नादिया मुराद ही जगातली ‘लास्ट गर्ल- शेवटची मुलगी’ असूच शकत नाही..  ही जगाची शोकांतिका आहे.. हा मानवतेचा पराभव आहे.

‘द लास्ट गर्ल : माय स्टोरी ऑफ कॅप्टिव्हिटी अ‍ॅण्ड माय फाइट अगेन्स्ट द इस्लामिक स्टेट’

लेखक : नादिया मुराद, जेन्ना क्राजेस्की

प्रकाशक : विरागो बुक्स

पृष्ठे: ३०६, किंमत : ४९९ रुपये

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2020 5:15 am

Web Title: the last girl my story of captivity and my fight against the islamic state by nadia murad zws 70
Next Stories
1 दैववाद की उत्क्रांतीवाद?
2 पुस्तक नेमके कुठे नेते?
3 कथा‘सार’
Just Now!
X