राजे-महाराजांच्या कहाण्या प्रत्येकालाच आवडत असतात. भव्य राजमहाल, शूर राजा, सुंदर राजकन्या, त्यांच्यावर संकट म्हणून चालून येणारा अक्राळविक्राळ राक्षस/ चेटकीण, राजाविरोधात कटकारस्थान करणारा एखादा दरबारी.. अशा ठरावीक साच्यातल्या या गोष्टी सारख्याच असल्या तरी, अशी प्रत्येक कहाणी वाचायला, ऐकायला, पाहायला कुणालाही आवडतेच. भारतासारख्या देशात तर पौराणिक कथांची वाचकांवर भुरळ आहे. वाचकांच्या कल्पनाविश्वात अशा गोष्टींना विशेष जिव्हाळ्याचे स्थान आहे. त्यामुळेच ‘बाहुबली’ हा सिनेमा जेव्हा पडद्यावर झळकला, तेव्हा गर्दीचे सर्व विक्रम या चित्रपटाने मोडीत काढले. वाचकांनी रंगवलेल्या कल्पनाचित्रांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्य़ाने पडद्यावर उतरवणाऱ्या या चित्रपटाची चर्चा संपता संपत नाही. राजवाडय़ांची भव्यता, अंगावर शहारे आणणाऱ्या लढाया आणि निसर्गाचे विशाल रूप दाखवणारी दृश्ये हीच ‘बाहुबली’च्या यशाची कळसूत्री ठरली. या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या तिसऱ्या भागाचीही चर्चा/ मागणी जोर धरत आहे. हा तिसरा चित्रपट येईलही अथवा नाहीही, पण ‘बाहुबली’ची भव्यता व्यापण्याचा प्रयत्न करणारे पुस्तक मात्र वाचकांच्या भेटीला आले आहे.

‘बाहुबली’ चित्रपटातील नायक- खलनायक यांच्या व्यतिरिक्तही अनेक पात्रे अशी आहेत, ज्यांनी या कथेत रंजकता आणली. त्यातीलच एक व्यक्तिरेखा शिवगामीची. ही यातील माहिष्मती साम्राज्याची राजमाता. दोन्ही चित्रपटांमध्ये शिवगामीची व्यक्तिरेखा केंद्रस्थानी नसली तरी, ती महत्त्वाची आहे. करारी मुद्रा, पुत्रप्रेमापेक्षा अधिक असलेले प्रजाप्रेम आणि न्यायप्रियता या गुणांमुळे  ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावली. याच व्यक्तिरेखेभोवती गुंफलेली ‘द राइज ऑफ शिवगामी’ (The Rise of Sivagami )  ही कादंबरी बाजारात आली आहे. ‘बाहुबली’च्या जन्माआधीच्या माहिष्मती साम्राज्याची ही कथा आहे, हे नावावरून लक्षात आले असेलच. शिवगामीचा माहिष्मती राजघराण्यातील प्रवेश आणि वाढते प्राबल्य याभोवती फिरणारी ही कादंबरी. मात्र हा केवळ या व्यक्तिरेखेचा परिचय नाही, तर शिवगामीला केंद्रस्थानी ठेवून गुंफली गेलेली एक रहस्यमय कादंबरी आहे. त्यामुळे ‘बाहुबली’च्या चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे.

या कादंबरीची अनेक वैशिष्टय़े आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ‘बाहुबली’ मालिकेतील असले तरी हे पुस्तक बाहुबलीचे पटकथाकार के. व्ही. विजयेंद्र प्रसाद किंवा एस. एस. राजमौली यांनी लिहिलेले नाही. तर, ‘असुरा’, ‘अजय’ या महाभारतातल्या व्यक्तिरेखांवर बेतलेल्या लोकप्रिय कादंबऱ्यांचे लेखक आनंद नीलकंठन यांच्या लेखणीतून ‘शिवगामी’चा जन्म झाला आहे.

‘शिवगामी’ ही कादंबरी भारतीय साहित्यात येऊ घातलेल्या नव्या प्रयोगाची नांदी आहे. आपल्याकडे आतापर्यंत कथा-कादंबऱ्यांवर आधारित अनेक चित्रपट, नाटके, मालिका प्रदर्शित झाल्या आहेत. यात नवीन असे काही नाही. परंतु, ‘शिवगामी’च्या निमित्ताने प्रथमच एका चित्रपटाच्या पटकथेतून प्रेरणा घेऊन नवीन कथा पुस्तकरूपात अवतरली आहे. ‘बाहुबली’ ही व्यक्तिरेखा थेट पडद्यावरूनच प्रेक्षकांच्या भेटीला आली. मात्र आता ती पुस्तकरूपातूनही वाचकभेटीला येईल हे ‘शिवगामी’ कादंबरीवरून दिसते आहे.

खरं तर, हा प्रयोग परदेशांत कित्येक वर्षांपासून सुरू आहे. ‘स्टार वॉर्स’, ‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’, ‘प्रीडेटर’, ‘ट्रान्सफॉर्मर्स’ अशा आधी रुपेरी पडद्यावर झळकलेल्या चित्रपटांतून प्रेरणा घेऊन त्यातील व्यक्तिरेखा पुस्तकाद्वारे पुन्हा जिवंत केल्या गेल्या आहेत. आधी चित्रपट, मग त्यावर आधारित पुस्तक आणि मग त्या पुस्तकावर आधारित नवा चित्रपट असा त्रिकोणही अशा मालिकांनी पूर्ण केलाय. मात्र, भारतीय साहित्यात ‘बाहुबली’ निमित्ताने प्रथमच असा प्रयोग होत आहे.

‘शिवगामी’ हे पुस्तक कदाचित ‘बाहुबली’चं जनतेवरचं गारूड कायम ठेवण्यासाठी किंवा तो चर्चेत ठेवण्यासाठी निर्माण झालं असेलही. अलीकडे ‘फ्रँचाइझ’च्या नावाखाली आपल्याकडेही चित्रपटांवर आधारीत गेम्स किंवा कॉमिक्स वा खेळणी बाजारात चांगली खपू लागली आहेतच. त्यामुळे हे पुस्तकही तसाच काहीसा प्रकार असू शकतो, असेही म्हणता येईल. परंतु या निमित्ताने एखाद्या कथेचे विविध कंगोरे धुंडाळून त्यातून नवीन साहित्य निर्माण करण्याची कल्पकता उभारी घेत आहे, हेही नसे थोडके. विशेषत: ‘बाहुबली’सारख्या कथेतील भल्लालदेव, देवसेना, कटप्पा, बिज्जलदेव अशी अनेक पात्रं स्वत:ची स्वतंत्र कथा सांगण्याइतपत सक्षम असताना, अशी संधी दवडता येणे अशक्यच. त्यामुळेच आता या पुस्तकांच्या मालिकेत येत्या काळात कटप्पा किंवा देवसेना यांच्यावर आधारित कादंबऱ्यांची भर पडल्यास नवल वाटू नये!

आसिफ बागवान

asif.bagwan@expressindia.com