कोंबडीपालन करणाऱ्यांकडून खरेदीत मोठी घट

बिपीन देशपांडे, लोकसत्ता

औरंगाबाद : चीनमध्ये करोना आजाराचा उद्रेक झाल्यानंतर त्याचे परिणाम इतर देशातील उद्योग, व्यापार, व्यवसायांवर होताना दिसत आहेत. राज्यातील कोंबडीपालन व्यवसायावरही त्याचे परिणाम दिसत असून कोंबडय़ांसह त्यांच्या खाद्यान्नासाठी होणारी खरेदी मंदावल्यामुळे मक्याचे दरही क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयांनी गडगडले आहेत.

जानेवारी महिन्यात मक्याचे दर १ हजार ८०० ते १ हजार ९५० रुपयांपर्यंत होते. तर सध्या मालाचा दर्जा पाहून मक्याचे दर क्विंटलमागे १ हजार ३०० ते १ हजार ५०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत, असे व्यापारी बंडुभाऊ चोपडे यांनी सांगितले. तर करोना आजाराचा परिणाम मक्याच्या दरावर जाणवत असल्याचे व्यापारी बद्रीनारायण जाजू यांनी सांगितले.

मक्याची खरेदी ही प्रामुख्याने कोंबडीपालन करणारे व्यावसायिक करतात. कोंबडय़ांच्या प्रमुख खाद्यामध्ये ७० टक्के मक्याचा वापर केला जातो. कोंबडय़ांच्या ४५ दिवसांच्या वाढीत पहिल्या दहा दिवसांमध्ये देण्यात येणाऱ्या खाद्यान्नाला प्री-स्टार्टर म्हणतात. तर दुसऱ्या दहा दिवसांमध्ये स्टार्टर व नंतरच्या कालावधीतील खाद्यान्नाला फिनिशर, असे म्हटले जाते. यामध्ये ७० टक्के मका, १० टक्के तांदूळ, १० टक्के गहू व गूळ, असे मिश्रण असते. मात्र सध्या करोनाच्या धास्तीने कोंबडय़ांचेही दर घसरलेले आहेत.

पळशी येथील शकील चाँद शहा यांनी सांगितले, की सध्या आम्ही एक हजार पक्ष्यांची (कोंबडीचे पिल्लू) खरेदीसाठीची नोंदणी थांबवलेली आहे. एका पिलाचे ४५ दिवस पालन-पोषण करून ७० ते ८० रुपयांना विक्री होत असेल तरच ते आम्हाला परवडते. मात्र सध्या ४२ ते ४५ रुपयांपर्यंतचीच कोंबडीची मागणी आहे. कोंबडीला वाढवण्यापर्यंतचा खर्च हा ६५ रुपयांपर्यंतचा येतो. एका कोंबडीमागे २२ रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. बाजारभाव गडगडल्यामुळे आमच्याकडून मक्याची खरेदीही फारशी होत नाही. त्यामुळे दरही गडगडले आहेत.

* नोव्हेल करोना विषाणूंचा कुक्कूट पक्षी व उत्पादनांवर कसलाही परिणाम होणार नाही. राज्यात एकूण ७ कोटी ४२ लाख इतकी कुक्कूट संख्या आहे.

* मका व सोयाबीन उत्पादक शेतकरी विशेषत: कुक्कूटपालन उद्योगाशी संलग्न आहेत. मात्र नोव्हेल करोना विषाणू हा सांसर्गिक असून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीत संक्रमित होतो.

* करोना विषाणू (इन्फेक्शिअस ब्राँकायटिस) मानवामध्ये संक्रमित होत नसल्याबद्दल शास्त्रीय संदर्भ आहेत.

* अफवांवर विश्वास ठेवू नये, असे पुण्यातील औंध येथील पश्चिम विभागीय रोगनिदान प्रयोगशाळेच्या रोग अन्वेषण विभागाने कळवले आहे, असे पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. अरविंद चव्हाण यांनी सांगितले.