औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून करोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत असून मराठवाडय़ात हिंगोली जिल्ह्यातील हे प्रमाण एवढे दिवस अधिक होते. आता औरंगाबाद शहरातील करोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण ९०.५१ झाले आहे. फक्त जालना जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.९२ राहिले आहे. मराठवाडय़ातील सर्व जिल्ह्यांमध्ये रुग्णप्रसार काहीसा कमी झाला असून संसर्गमुक्त होण्याचे प्रमाणही वाढते राहिले आहे. गेल्या आठवडय़ातील रुग्णवाढीची सरासरी लक्षात घेता शनिवारी औरंगाबाद जिल्ह्यात २७४ जणांना करोनाबाधा झाली असून शनिवारी सकाळी नऊ  वाजेपर्यंत मराठवाडय़ातील आठ जिल्ह्यांत २४ जणांचा मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सहा जणांचा मृत्यू झाला.

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून ग्रामीण भागातील रुग्णांचे मृत्यू वाढू लागले आहेत. उपचाराचे टप्पे आता जवळपास नक्की झाले असून आरोग्य अधिकारी आणि यंत्रणेला विषाणूची वर्तणूक कोणत्या आजाराला बळ देईल याची पुरेशी माहिती झाल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या २० दिवसांपासून रेमडेसिवीर या इंजेक्शनचा पुरेसा साठा असल्याचे दिसून येत आहे. ऑक्सिजनच्या पुरवठय़ावर नियंत्रण असून बहुतांश जिल्ह्यातील द्रवरुप प्राणवायूचे प्रकल्पही पूर्ण होत आले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील हा प्रकल्प निविदास्तरावर आहे.

मराठवाडय़ातील आठ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत तीन हजार ४४३ जणांचा मृत्यू झाला असून मृत्यू दर २.८६ झाला आहे. मराठवाडय़ात सर्वाधिक मृत्युदर परभणी आणि उस्मानाबादचा आहे.  सर्वात कमी म्हणजे १.५० मृत्युदर हिंगोली जिल्ह्याचा आहे. करोना संसर्गाच्या सर्व टप्प्यांत हिंगोली जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आणि मृत्युदराचे प्रमाण सर्वात कमी दिसून आले. आता औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ९०.९१ टक्के एवढे झाले आहे.