‘लातूर पॅटर्न’ने गेल्या दोन तपापासून आपले नाव राज्य व देशात गाजवले. या वर्षीही दहावीच्या परीक्षेत लातूर विभागाचा निकाल ८५.२२ टक्के इतका लागला आहे व लातूर जिल्हय़ाचा निकाल ८९.०५ टक्के इतका आहे. निकालाची ही आकडेवारी भ्रमाचा भोपळाच असल्याचे वास्तव लक्षात येत असल्यामुळे या गुणवत्तेबद्दलच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

२५ वर्षांपूर्वी लातूर, उदगीर येथील काही निवडक शाळांनी अतिशय परिश्रमपूर्वक गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न केले. शाळेच्या वेळेव्यतिरिक्त  कधी सकाळी तर कधी रात्री उशिरापर्यंत जादा तास घेतले. त्यासाठी वेगळे पसे घेतले नाहीत. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणात वाढ व्हावी यासाठी विशेष मार्गदर्शन केले. पहिल्यांदा उदगीरच्या लालबहादूर शास्त्री विद्यालयाचा विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत राज्यात पहिला आला. त्यानंतर लातूर, अहमदपूर अशा विविध ठिकाणचे विद्यार्थी राज्यभर गुणवत्तेत पहिले आले त्यानंतर ही गुणवत्ता बारावीच्या परीक्षेतही दिसून आली. दहावी व बारावीत चांगले यश मिळवण्यासाठी राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून विद्यार्थी लातूरला येऊ लागले व त्यातून गुणवत्तेच्या नावाखाली व्यावसायिकीकरण वाढले अधिकाधिक पसे कसे मिळवता येतील याकडे संस्थाचालकांचा कल वाढला. काही निवडक शाळा, महाविद्यालयाच्या गुणवत्तेचा लाभ उठवत खासगी शिकवणीवर्गाचे पेव फुटले. ते आता इतके वाढले आहे की, त्यात स्थानिक व दाक्षिणात्य असे दोन गट पडले आहेत. खरी गुणवत्ता आमच्याकडेच असल्याचा दावा हे गट करत आहेत. शिकवणीवर्ग परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून प्राणघातक हल्ल्यापासून अनेक घटना एकमेकांच्या ईर्षेपोटी घडत आहेत.

फटाके फोडून शिकवणीवर्गाचे उद्घाटन कदाचित राज्यात अन्य ठिकाणी अभावानेच झाले असावे. अकरावी, बारावीला केवळ महाविद्यालयात नामधारी प्रवेश घेऊन खासगी शिकवणीच्या भरवशावरच शिक्षण घेणारी पिढी राज्यभर निर्माण होते आहे. अद्याप लातुरातील काही निवडक महाविद्यालयाला हा रोग जडलेला नाही.  विद्यार्थी परीक्षेत नापास होणार नाही याची काळजी घेणाऱ्या शिक्षण पद्धतीमुळे शिक्षणातील गुणवत्तेची वाट लागते आहे. गेल्या काही वर्षांत इंग्रजी शाळांचे पेव मोठय़ा प्रमाणावर फुटले आहे. त्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचा दावा करणाऱ्या अनेक शाळा दाखल झाल्या आहेत. शहरातील जुन्या इंग्रजी शाळेत राज्य शासनाचा अभ्यासक्रम शिकवला जात होता. आता केंद्रीय अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्यामुळे राज्य शासनाचा अभ्यासक्रम शिकवल्या जाणाऱ्या इंग्रजी शाळाही रोडावल्या आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबात इंग्रजीचे स्तोम वाढत असल्यामुळे मराठीपेक्षा इंग्रजी शाळेत प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल वाढतो आहे. दुर्दैवाने इंग्रजी शाळेचा तोंडावळा छान असला तरी तेथील शिक्षकांना दहा, पाच हजार इतकाच पगार मिळत असल्यामुळे त्यांच्या गुणवत्तेबद्दल प्रश्नचिन्हच आहे.

काही जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या शाळांमध्ये उत्तम दर्जाचे शिक्षण मिळते, मात्र खासगी शाळेत प्रवेश दिला म्हणजे आपला इतरांपेक्षा वेगळा दर्जा आहे ही भावना बळावते आहे. शाळा आहे पण शिक्षण नाही अशी अवस्था अनेक ठिकाणी पाहायला मिळते. शिक्षकांच्या नव्या पिढीत गुणवत्तेपेक्षा पशाला अधिक महत्त्व आहे ही बाब त्यांनी अनुभवली असल्यामुळे शिक्षणातून अधिकाधिक पसे कसे कमावता येतील याकडेच ते लक्ष देत आहेत. त्यामुळे खरे शिक्षण हरवत चालले आहे.

पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलण्याची शिक्षण पद्धती असल्यामुळे एकूणच शिक्षण हे ढकलगाडा बनले आहे. लातूर पॅटर्नचा नावलौकिक टिकवण्यासाठी बोटावर मोजता येतील इतक्याच संस्था अद्याप प्रयत्नशील आहेत, मात्र त्यांचाही भर अनुदानित तुकडय़ांबरोबर विनाअनुदानित तुकडय़ा दरवर्षी कशा वाढतील यावरच अधिक आहे. यावर्षीच्या दहावीच्या निकालात विभागातील शंभर टक्के निकाल लागलेल्या १३३ शाळा आहेत तर ९० टक्के निकाल लागलेल्या ४८४  शाळा आहेत. ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणारे २१,५०२ विद्यार्थी असून त्यात लातूर जिल्हय़ातील १०,२२०, उस्मानाबाद जिल्हय़ातील ३,८३८ तर नांदेड जिल्हय़ातील ७,४४४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गतवर्षी शून्य टक्के लागलेल्या ३२ शाळा होत्या. यावर्षी हे प्रमाण कमी होऊन नऊ शाळांवर आले आहे. लातूर परीक्षा मंडळाच्यावतीने गतवर्षी ज्या शाळांचे निकाल शून्य टक्के लागले त्या शाळांवर स्वतंत्र संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आला होता. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे निकालात फरक पडला असल्याचे मंडळाचे प्रभारी सचिव गणपत मोरे यांनी सांगितले.