औरंगाबाद : शिवसेना प्रचार कार्यालयासमोर २०-२५ चारचाकी आणि ४०-५० दुचाकी गाडय़ा उभ्या. कार्यकर्ते खुर्च्यामध्ये रेंगाळलेले. राज्याच्या राजकारणाचा मागोवा व्हॉटसअ‍ॅपच्या नजरेतून बघणारे सारे. काही महिला कार्यकर्त्यां, काही तरुण प्रचार कार्यालयाची शोभा वाढविणारे. बाजूला खासदार खैरे यांनी खास पत्र्याचे शेड तयार करून बांधलेले गाय-वासरू. हे समृद्धीचे प्रतीक म्हणून. खासदार खैरे यांच्या अंगारे-धुपारे याची चर्चा राजकीय पटलावर सुरू आहे. खासदार खैरे यांच्यासमोर निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसकडून  सुभाष झांबड यांचे नाव जाहीर झाले आणि तेव्हापासून प्रचार कार्यालयात चर्चा सुरू झाली ती खैरे यांच्या नशिबाची. गेल्या चार वेळा निवडून येणाऱ्या खैरे यांच्याविषयी शहरात आणि ग्रामीण भागात नाराजी आहे. मात्र, त्यांना पर्याय नाही, असे राजकीय चित्र निर्माण झाले आहे. त्याचीच चर्चा नशिबाच्या अंगाने शिवसैनिकांमध्येही दिसून आली.

समर्थनगरातील सावरकर चौकाजवळच खासदार चंद्रकांत खैरे यांचे प्रचार कार्यालय आहे. आठवडाभरापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. प्रचार कार्यालयात एक छोटेखानी मंच. त्या मंचावर युतीतील नेते बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी आणि गोपीनाथ मुंडे या दिवंगत नेत्यांची छायाचित्रे. तर इतर ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आणि वाजपेयी यांची मोठी छायाचित्रे. उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे यांच्या प्रतिमा तुलनेने बाळासाहेबांपेक्षा छोटय़ा. कार्यालयात शे-दोनशे खुर्च्यावर बसलेले तरुण, महिला आणि ज्येष्ठ कार्यकर्ते, बाजूच्या चार तात्पुरत्या केलेल्या खोल्या. पैकी एकामध्ये वॉररूम. एक खैरे यांना प्रत्यक्ष स्वत संपर्क साधण्यासाठी तर इतर दोन रुममध्ये आवश्यक साहित्य, माध्यम जनसंपर्काची सोय केलेली. मतदारसंघातील विधानसभानिहाय तालुक्यांतील गावांची माहिती दर्शवणारे नकाशांचेही चित्र.

औरंगाबादची निवडणूक गल्ली विरुद्ध मोहल्ला अशी. त्याला धार्मिक किनार मोठी. त्यामुळेच तशीच प्रचार आखणी केली जात आहे. पण प्रचार आखणीपेक्षाही सध्या खासदार खैरे यांच्या नशिबावर चर्चा जोरात झडतात. एक शिवसैनिक म्हणाला, ‘भले आमचे वाद असो, पण मतदानाच्या दिवशी आमचे बोट धनुष्यबाणावरच जाते. भाजपचे नेते कितीही नाराज असले तरी त्यांना खासदार खैरे यांना निवडून आणण्यासाठी काम करणे अपरिहार्य आहे. कारण त्यांना मोदींना पंतप्रधान बनवायचे आहे.’ भाजपची ही अपरिहार्यता आणि खैरे यांचे नशीब असा चर्चेला रंग चढलेला असतो.