22 February 2020

News Flash

विधानसभेपूर्वी प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार

राजू शेट्टी यांची माहिती

(संग्रहित छायाचित्र)

पराभवाचे सारे खापर ‘ईव्हीएम’वर फोडत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. विरोधी पक्षातील छोटय़ा पक्षांनी सर्वानी एकत्र येऊन ही निवडणूक लढविणे आवश्यक आहे. त्यामुळे राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. या सर्व नेत्यांबरोबर काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र राहावे, अशी इच्छा असल्याने तसे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी औरंगाबाद येथे पत्रकार बैठकीमध्ये सांगितले.

वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या सव्वा लाखांहून अधिक मतांमुळे पराभव झाल्याचे सांगत शेट्टी म्हणाले की, शेतकऱ्यांनी मते दिली पण ती यंत्रातून आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही. त्यामुळे मतदान यंत्रावर अविश्वास आहेच. तसे नसते तर बहुतांश मतदार संघांत पडलेली मते आणि मोजलेली मते यामध्ये एवढी तफावत आढळली नसती. अलिकडेच ही आकडेवारी निवडणूक आयोगाने संकेतस्थळावर काढून टाकल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठवाडय़ातील दुष्काळाकडे सरकार गंभीरपणे लक्ष देत नसल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. शेतीचा विकास घटला आहे. आत्महत्या वाढत आहेत. सात महिन्यांपूर्वी दुष्काळ जाहीर करूनही सरकारने दुष्काळग्रस्तांची पुरेशी काळजी घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

शेती प्रश्नी रान उठवूनही निवडणुकीच्या रिंगणात यश मिळत नाही त्याला ‘ईव्हीएम’च कारणीभूत असल्याचे ते म्हणाले.

आजही शेतकरी आपल्या बाजूने असल्याचा दावा त्यांनी केला. राष्ट्रवादीबरोबर केलेली हातमिळविणी हातकणंगले मतदार संघातील अनेकांना भावली नाही काय, असे विचारले असता ते म्हणाले, आता साखर कारखानदार भाजपकडेच अधिक आहेत.

मतदार संघातील प्रत्येक कारखान्याकडून १०० टक्के रास्त हमी भाव मिळवून दिला असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर शेतकऱ्यांचा विश्वास अजूनही कायम असल्याचा दावा राजू शेट्टी यांनी केला.

आंदोलनाचा इशारा

दुष्काळग्रस्त भागात अनेक फळबागा सुकल्या आहेत. फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले याचे साधे पंचनामेही केले गेले नाहीत. येत्या आठ दिवसांत हे पंचनामे करून एकरी एक लाख रुपये मदत न दिल्यास आठ दिवसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर नागपूर येथे आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. तसेच विमा कंपन्याच्या अनागोंदीच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. येत्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मराठवाडय़ाही अधिक विस्तार करणार असल्याचेही शेट्टी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

आता मडके वाजवून घेतो

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर तिरकस हल्ला करत राजू शेट्टी म्हणाले की, शेतीचा विकास दर आता तीन टक्कय़ांनी घटला आहे. विकास होत आहे असे म्हणत शेट्टी म्हणाले,‘ कुंभारे मडके घडविताना एखादे मडके कच्चे निघते.’ आता तरी मडके तपासून घेत आहात का, असे म्हणताच ते म्हणाले, ‘आता एक एक मडके तपासूनच घेत आहे.’

First Published on June 13, 2019 1:21 am

Web Title: meet ambedkar before assembly
Next Stories
1 औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूरमध्ये पाऊस
2 दहावी परीक्षेत मराठवाडय़ाचा टक्का घसरला
3 मराठवाडय़ातील ११ धरणे जलवाहिन्यांनी जोडणार