करोनाकाळात उद्योगाचे चाक रुतून बसले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. काहींनी नवे उद्योग सुरू केले. या काळात सहजपणे कर्जेही मिळत गेली. पण ‘उद्योग’ वाढीस लागायला हवा, नवउद्योजकांना त्यातील खाचखळगे कळावेत या उद्देशाने औरंगाबादच्या उद्योजकांनी करोनाकाळातही उद्योजकता वाढीला प्रोत्साहन दिले. २०१५ पासून मराठवाडा अ‍ॅक्सीलेटर फॉर ग्रोथ अ‍ॅन्ड इनक्युबेशन कौन्सिल (मॅजिक)ची स्थापना केली. गेल्या पाच वर्षांत केलेल्या विविध उपक्रमांमुळे ४३ उद्योजक आता यशस्वीपणे उलाढाल करू लागले आहेत.

उद्योगांनी नवनवे प्रयोग करावेत म्हणून या संस्थेने केलेले प्रयत्न पाहून जर्मन येथील ‘आयझेड’या कंपनीने ‘इनोव्हेशन प्रमोशन सेल’ स्थापन करण्यास मदत केली. या माध्यमातून महिलांना आणि लघुउद्योजकांना मार्गदर्शन करणारी संस्था आता नावा रूपाला येत आहे. केंद्र सरकारच्या वतीने ‘स्टार्ट अप’ योजनेला येत्या १६ डिसेंबर रोजी पाच वर्षे होत असतानाच औरंगाबादमध्ये नवउद्योजकांना प्रोत्साहन देणाऱ्या ‘मॅजिक’मुळेही उद्योजकतेला बळ मिळते आहे. पैठण येथील विलास मोरे हे या तरुण उद्योजकाने करोनाकाळात केशकर्तनालयात दाढीसाठी वापरली जाणारी नवे रेझर तयार केले. सर्वसाधारणपणे केशकर्तनालयामध्ये ब्लेड अर्धे तोडून कव्हरमध्ये बसविले जायचे. पण एकाच कव्हरमध्ये टाकणाऱ्या ब्लेडमुळे निर्जंतुकीकरणाची १०० टक्के खात्री होत नव्हती. विलास मोरे यांनी प्लास्टिकच्या सहाय्याने असा भाग बनविला तो एकदा वापरात आला की, तो काढून टाकता येईल. त्यामुळे करोनाकाळातही निर्जंतुकीकरणाची खात्री देता येईल या नव्या रेजरचे उत्पादन सुरू झाले. या उद्याोगासाठी  लागणारे भागभांडवल आणि उद्योग उभारणीसाठीचे बळ औरंगाबाद येथील उद्योजकांच्या ‘मॅजिक’ संस्थेकडून देण्यात आले आहे. अशा अनेकांना मदत करणारे ‘मॅजिक केंद्र’ नावारूपाला येत आहे.  मर्यादित काळात ऑफिसची जागा, वैयक्तिक मार्गदर्शन, उत्पादन आरेखन आणि विकासासाठी मदत, उत्पादन परीक्षण आणि छाननी, मोठय़ा उद्योगांच्या भेटी, पेटंट आणि ट्रेडमार्कसंबंधी मार्गदर्शन आदी बाबी उद्योजकांना समजावून सांगण्याचे प्रयत्न या केंद्राकडून होतात.

अशी मदत, असे यश उद्योग संघटनेकडून करण्यात आलेल्या मार्गदर्शनामुळे चार जणांना स्वामीत्व हक्क (पेटंट ) मिळविण्यात मदत करण्यात आली आणि चार जणांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मागील पाच वर्षांत ५०हून कार्यशाळेतून २५०० पेक्षा विद्याार्थी, नवउद्योजकांना मार्गदशन आणि उद्यामशील बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. चार उद्योजक गेल्या वर्षांत स्वयंपूर्ण झाले असून त्यांची उलाढाल आता एक कोटीपेक्षा अधिकची झाली आहे. १४ नवउद्योग करणाऱ्या (स्टार्ट अप) प्रोत्साहनपर १५ लाखांची थेट मदत करण्यात आली. तसेच तीन खुल्या नवोपक्रम स्पर्धेत ६०० हून अधिक जणांनी सहभाग नोंदविला. यातील अनेकांना उद्योजक होण्यासाठी मदत करण्याची संस्थेची भूमिका असल्याने दर शनिवारी अभिनव संकल्पनांचे विशेषज्ञांकडून मोफत मार्गदर्शनाची सोय केली आहे.

या उपक्रमात उद्योजक मार्गदर्शक म्हणून उद्योजक मिलिंद कंक, सुरेश तोडकर, प्रसाद कोकीळ, सुनील रायठठ्ठा, मुकुंद भोगले, प्रशांत देशपांडे, केदार देशपांडे, रितेश मिश्रा, रोहित दाशरथी असे अनेकजण प्रयत्न करत असतात.

हे सगळे घडते कसे?

नव उद्योजकतेला प्रोत्साहन देणारी ही बाब अचानकपणे पुढे आलेली नाही. औरंगाबाद येथे १९६८-१९६९ मध्ये स्थापन केलेल्या उद्योगिक संघटनेचे नाव २००२ मध्ये ‘चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीक्लचर’ असे करण्यात आले.

तेव्हापासून या भागातील शेतकरी कुटुंबातील तरुणांना उद्योजक बनावे यासाठी खासे प्रयत्न सुरू झाले. गेल्या काही वर्षत ८१ कोटी रुपयांची गुंतवणूक झालेल्या ऑटो क्लस्टरमुळे उद्योजकतेला वाव मिळत आहे. सरकारच्या मदतीने इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर, कौशल्य विकास असे प्रकल्पही कार्यान्वित आहेत. त्या प्रयत्नातून ‘मॅजिक ’ ही संस्थाही पुढे जात आहे. यातून नवे उद्योजक आणि औद्योगिकतेला प्रोत्साहन दिले जात आहे.

उद्योग केवळ पैसे उपलब्ध आहेत म्हणून वाढत नसतो किंवा उभाही राहत नसतो. त्यासाठी उद्यामशीलता विकसित व्हावी लागते. ही प्रक्रिया एका दिवसातील नसते. त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. मराठवाडय़ासारख्या भागात उद्योजकता वाढीस लागवी, नवीन संकल्पांना प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रयत्न सुरू होते. त्याला रचनात्मक रूप देत पाच वर्षांपूर्वी मराठवाडा अ‍ॅक्सीलेटर फॉर ग्रोथ अ‍ॅन्ड इनक्युबेशन कौन्सिलची स्थापना करण्यात आली आहे. त्याला आता यश मिळताना दिसत आहे. उद्योजक उभे करण्यासाठी संघटनात्मक पातळीवर सुरू असणारे हे प्रयत्न नव्या वाटेने जाणारे आहेत. नवउद्यमींना प्रोत्साहन देण्यासाठी करणाऱ्या उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. या संस्थेमध्ये दहा संचालक आहेत. प्रत्येक जण नवीन उपक्रमांना आणि नवीन उद्योजकांना मार्गदर्शन करत असतो. त्याचा आता परिणाम होताना दिसत आहे.

– आशिष गर्दे, संस्थापक संचालक