|| सुहास सरदेशमुख

औरंगाबाद : साडेचार हजार रुपये पाणीपट्टी घेतल्यानंतर तीन दिवसाला एकदा येणारे पाणी, न सुटलेला कचऱ्याचा प्रश्न, निधी असून न बांधले गेलले रस्ते अशा एक-ना, नाना समस्या. शहराचे कारभारी स्वत:च्याच नादात असतात. फडणवीस सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेली १६८० कोटी रुपयांची पाणी योजना कधी सुरू होणार आणि कशी पूर्ण होणार, असा प्रश्न विचारला जातो आहे. पण समांतरप्रमाणे नवनव्या तांत्रिकतेत योजना अडकवून ठेवण्याचे कसब महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेकडे असल्याने सारे घोडे अडले आहे. तरीही औरंगाबादकरांनी विधानसभा निवडणुकीत सेनेच्या पदरात भरभरून टाकले. त्याच्या बदल्यात सेनेचे नेते आता राज्याचे नेतृत्व करत असल्याने प्रश्न सुटतील की त्याचा गुंता वाढेल, असा प्रश्न आवर्जून विचारला जात आहे.

शहरातील कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना औरंगाबादवासीयांची माफी मागावी लागली होती. निवडणुकीच्या काळात पाण्याचा प्रश्न विचारला की, सेनेचे नेते चिडायचे, पण काम काही मार्गी लागले नाही. अगदी निधी दिल्यानंतरही रस्त्यांची कामे अपूर्णच राहिली आहेत. कंत्राटदारांना काम पूर्ण करण्याचे इशारेवर इशारे दिले जातात. पण महापालिकेची आर्थिक स्थिती ना सुधारते, ना महापालिकेला स्वतंत्रपणे मदत केली जाते. परिणामी औरंगाबादचा बकालपणा वाढतोच आहे. स्मार्ट सिटीसारख्या उपक्रमातील निधीदेखील खर्च होऊ शकला नाही. कचऱ्याचे ढीग वाढत आहे. आठवडाभरापूर्वी महापौरांनीच सांगितले, कचरा उचलणारी एजन्सी नीट काम करत नाही. त्यामुळे साडेतीनशे टनाचा कचरा आता साडेचारशे टनांपर्यंत वाढला आहे. भाजपकडून आता सेनेला प्रश्न विचारले जात आहे. पाणीपुरवठय़ाच्या प्रश्नी अडचणीत आलेल्या शिवसेनेला पाणीप्रश्नी तातडीने उत्तर शोधावे लागणार आहे. अन्यथा महापालिका निवडणुकीत त्याचे परिणाम अधिक गंभीर होऊ शकते. अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सेनेच्या स्थानिक नेत्यांना कानपिचक्या दिल्या. शहरातील अंतर्गत रस्ते सुधारा, असेही त्यांनी सांगितले होते. दरवेळी शिवसेनेचे नेते म्हणून येणारे उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच औरंगाबाद शहरात येणार असल्याने त्यांना प्रशासकीय गोंधळ आणि त्यात पदाधिकाऱ्यांनी केलेल्या अनागोंदी अधिक स्पष्टपणे दिसतील, असे मानले जात आहे.

शहराचा विस्तार वाढतो आहे, तसाच त्याचा बकालपणाही वाढतो आहे. एखाद्या बाद झालेल्या योजनेतून किती दिवस पाणी मिळू शकते, याचा विक्रम म्हणून औरंगाबादच्या पाणीपुरवठय़ाकडे पाहावे लागेल. कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यात महापालिकेला अपयश आले. आíथक पातळीवर कुपोषण असतानाही अवाढव्य अंदाजपत्रक सादर केले जाते. एकूणच अर्थकारण बिघडवून टाकल्यामुळे शहराची अवस्था अधिक बकाल झाली आहे. -समीर राजूरकर, माजी नगरसेवक