आई राजा उदो-उदो, काळभरवनाथाचा चांगभलं या घोषात, संबळ, वाद्यवृंदाच्या गजरात पारंपरिक पद्धतीने तुळजापूरचा भेंडोळी उत्सव बुधवारी रात्री पार पडला. हा उत्सव पाहण्यासाठी व दर्शनासाठी भाविकांनी मंदिर परिसर, रस्त्यांवर मोठी गर्दी केली होती. तरुणांनी या वेळी फटाक्यांची आतषबाजी केली.
बुधवारी नरक चतुर्दशी पार पडली. सकाळपासूनच काळभरव व टोळभरवनाथास तेलाचे अभिषेक, कोंडबळाच्या माळा व खारे नवेद्य दिवसभर सुरू होते. सायंकाळी पाचच्या सुमारास काळभरवाचे अभिषेक झाले. यानंतर पुजारी वैजीनाथ गणपत वाघे, सचिन यादव, लहू डेस्के, विश्वनाथ पुजारी, विश्वास मोटे यांनी भेंडोळीची दंड बांधणी केली. रात्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने तहसीलदार सुजित नरहरे, दिलीप नाईकवाडी आदींनी काळभरवनाथाची आरती करून भेंडोळीची पूजा केली. यानंतर भेंडोळी प्रज्वलित करण्यात आली. रात्री साडेनऊच्या सुमारास भेंडोळी मंदिरात दाखल झाली. या वेळी भेंडोळी देवीगाभाऱ्यात जाऊन सिंहासनात दांड टेकून मंदिरात प्रदक्षिणा घालून महाद्वार चौक, आर्य चौक माग्रे कमानवेस येथील अहिल्याबाई यांच्या विहिरीमध्ये पुजारी क्षीरसागर यांच्या वतीने शांत करण्यात आली. भेंडोळी मंदिराबाहेर पडताच अभिषेक घाट झाली व देवीदास महंत मावजीनाथ यांच्या सिंहासनाने पंचामृत अभिषेकास प्रारंभ झाला. यानंतर गरीबनाथ मठातून मानाचा नवेद्य दाखविण्यात आला व रात्रभर पुजारी, सेवेकरी, भाविकांसह खास भोजन देण्यात आले. महंत मावजीनाथ यांच्यासमवेत नाथ संप्रदायाचे महंत श्यामनाथ महंत एकनाथजी, महंत रघुनाथजी, सोनारीचे महंत पीर, वृंदावनचे महंत राधेश्याम, कर्जतचे महंत दत्तू लोंढे आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhendoli festival celebrated in tuljapur
First published on: 14-11-2015 at 01:40 IST