लग्न म्हटलं की बडेजाव आला, पैशांची उधळपट्टी आली आणि डीजेच्यावर तालावर थिरकणारी तरुणाईदेखील आली. अनेक ठिकाणी लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च करुन श्रीमंतीचं प्रदर्शन केलं जातं. पैशांचं ओंगळवाणं दर्शन घडवणारे अनेक विवाह सोहळे आज काल पाहायला मिळतात. मात्र औरंगाबाद शहरात एक असा विवाह सोहळा पार पडला, जिथं रुखवताची जागा पुस्तकांनी घेतली होती. इतकंच काय तर आहेर आणि कन्यादानही पुस्तकांनीच करण्यात आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्योजक, अभियंता आणि अर्थविषयक अभ्यासक असलेल्या डी. एस. काटे यांची मुलगी सायली आणि सूर्यकांत पवार यांचा मुलगा अजिंक्य यांचा हा विवाह सोहळा होता. संसाराचं अर्थकारण समजून घेण्याच्या अगोदर सायली आणि अजिंक्य यांनी ‘अर्थजागर’ केला. काटे यांनी लिहिलेल्या ‘अर्थजागर’ पुस्तकाचं प्रकाशन या विवाह सोहळ्यात करण्यात आलं. लग्नात असा कार्यक्रम पार पडण्याचा हा पहिलाच प्रसंग असावा. मुलीचे वडील डी. एस. काटे यांच्या संकल्पनेला वर पक्षाकडील मंडळींनी पाठिंबा दिला. म्हणून भांडेकुंडे सासरी घेऊन न जाता सायली पुस्तक घेऊन माहेरी जात आहे. आपली सून ज्ञानाचा संस्कार घेऊन येत असल्यामुळे तिचे सासरे सूर्यकांत पवार आनंद व्यक्त केला. घरातील वडिल मंडळींनी घेतलेल्या निर्णयाला अजिंक्य आणि सायलीने पाठिंबा दिला. त्यामुळे लग्न समारंभात पुस्तकांचे स्टॉल पाहायला मिळाले. पुस्तकाचं प्रकाशन करून हा सोहळा पार पडला. शिवाय गरजू वाचनालयाला भेट म्हणून पुस्तकं देण्यात आली.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book publishing program in aurangabad marriage groom bride gifts books to guest
First published on: 19-06-2017 at 11:59 IST