गोकुळवाडी हे शहीद जवान संदीप जाधव यांचे जन्मगाव. केळगाव पासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर वसलेल दहा पंधरा घरांच्या वस्तीच त्यांच गोकुळच. तिथं त्यांचं कुटुंब राहतं. या वस्तीत कुणालाही संदीप जाधव यांच्या निधनाची कल्पना नव्हती. जवानाचे वडील सर्जेराव जाधव यांनी मनावर दगड ठेवून मुलाच्या मृत्यूचं दुःख दाबून ठेवलं. सून आणि नातवंडांच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांना आपला मुलगा गेल्याचे घरच्यांना सांगण्याचे धाडसच होत नव्हते. मुलाच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर संपूर्ण रात्र त्यांनी दुःख बाजूला ठेवून हसत खेळत काढली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संदीप जाधव यांच्या मुलगा शिवेंद्रचा शनिवारी पहिलाच वाढदिवस आहे. त्यासाठी जाधव घरी देखील येणार होते. मात्र ते तिरंग्यात लपटून येतील, असे कोणाच्याही मनात नव्हते. मातृभूमीच्या रक्षणासाठी सीमेवर असलेल्या जाधव यांना मुलाच्या वाढदिवसाला घरी येण्यासाठी सुट्टी मिळाली नाही. फोनवरून लेकाला ते शुभेच्छा देणार होते. मात्र त्याअगोदरच भारतमातेच्या रक्षणासाठी या सुपुत्रःला वीरमरण आले. मुलगा सीमेवर शहीद झाला. नातू मांडीवर खेळतोय. इच्छा असूनही त्याच्या आजोबाना दुःखाला वाट मोकळी करून देता आली नाही. दिवस तसाच काढला. आज जेव्हा वस्तीवर ही बातमी समजली गोकुळवाडीत आक्रोश आणि हुंदके पाहायला मिळाले. आई, पत्नी, बाप सर्वजण दुःखात होते. मात्र दोन निरागस जीव सारे रडतात ते पाहून रडताना दिसले.

संदीप जाधव यांची तीन वर्षांची कन्या मोहिनीला कोण काय बोलतंय हे समजत होते. मात्र वर्षभराचा शिवेंद्रला सगळे का रडतायत काहीच कळत नव्हते. आज उशिरा संदीप जाधव यांचं पार्थिव गोकुळवाडीत येईल, असे सांगितले गेले. मात्र काही तांत्रिक अडचणी पुढे आल्यामुळे शुक्रवारी होणारा अंत्यविधी आता शनिवारी होणार आहे. ज्या दिवशी शिवेंद्रचा पहिला जन्म दिवस, त्याच दिवशी त्याच्या वडिलांचा अंत्यविधी असा योग नियतीने आणला आहे. मुलगा शहीद झाल्यानंतर सर्जेराव जाधव यांनी एक वेळेस युद्ध करून त्यांचा नायनाट करा, अशी भावना बोलून दाखवली. मात्र शिवेंद्रला जन्म, मृत्यू, वीरमरण काहीच कळत नाही. तो जसा मोठा होईल. तसा त्याचा  जन्म दिवस त्याला वडिलांच्या मृत्यूच्या आठवण घेऊन येईल.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fateful first birthday of sandeep jadhav martyrs daughter falls on his funeral day
First published on: 23-06-2017 at 21:14 IST