औरंगाबाद :  मुलीचा बालवयातच विवाह लावणाऱ्या पालकांसह पती, सासू-सासऱ्यांविरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणातील अल्पवयीन मुलीला मुंबईत प्रसूतीसाठी दाखल केले असता रुग्णालय व्यवस्थापनाने यासंदर्भाने माहिती दिल्यानंतर बालविवाहाचा प्रकार उघड झाला असून पीडितेच्या पतीला रविवारी अटक करण्यात आली आहे.  पतीला ३ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. पी. कदम यांनी सोमवारी दिले आहेत.

प्रकरणात मुंबई येथील आरसीएफ पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस शिपाई सीमा अंभोरे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, २५ ऑक्टोबर रोजी फिर्यादी या कर्तव्यावर असतांना मध्यरात्रीनंतर त्यांना शताब्दी रुग्णालयातून (गोवंडी, मुंबई) फोन आला. त्यात, १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी नऊ महिन्याची गर्भवती असून तिला तिच्या आईने बाळंतपणासाठी रुग्णालयात आणल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णालय गाठून पीडिता आणि तिच्या आईची चौकशी केली. तेव्हा २०२० मध्ये पीडितेच्या आजीने तिचे लग्न तिच्या आत्याच्या मुलाशी करण्याचे ठरवले होते. त्यानुसार पीडितेचे २७ जुलै २०२० रोजी दीपकशी (नाव बदलेले) लग्न लावण्यात आले. पीडिता ही पती व सासू-सासऱ्यांसोबत औरंगाबादेतील जवाहरनगर परिसरात राहत होती. या प्रकरणी सहायक लोकाभियोक्ता आर.सी. कुलकर्णी यांनी आरोपी व पीडितेच्या बाळाची डीएनए चाचणी करायची असून गुन्हा दाखल झालेल्या इतर आरोपींना अटक करण्याच्या अनुषंगाने माहितीसाठी  बालविवाहितेच्या पतीला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.