छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत डोक्यावर फेटा न बांधण्याचा निर्णय घेतला होता. आता आरक्षणाचा निर्णय झाला आहे. पण गावागावात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जे प्रश्नचिन्ह दिसते आहे. गावात जे काही सामाजिक चित्र निर्माण झाले आहे त्यामुळे डोक्यावर फेटा घालायची इच्छा होत नाही. फेटा घालायला लागणारा जो स्वाभिमान माझ्यामध्ये येत नाही, माझ्यामधील चिंता जोपर्यंत कमी होत नाही, राजकारणाच्या हेतूने समाजासमाजात निर्माण केलेल्या भिंती जोपर्यंत कमी होत नाहीत तोपर्यंत फेटा बांधता येणार नाही, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे. महालसावंगी येथे गडावर त्या बोलत होत्या.

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस आयुक्तांचे वाहन फोडले

गावागावात महाराष्ट्रातील सर्व जाती समुदाय एकत्र येत नाहीत तोपर्यंत फेटा बांधता येणार नाही. अगदी लहान मुलांनाही आता जात माहीत झाली आहे. आम्हाला १२ वीचा फॉर्म भरेपर्यंत जात माहीत नव्हती. आता महापुरुषही वाटून टाकले. ते छत्रपती आपले, ते ज्योतीबा त्यांचे, अहिल्याबाई त्यांच्या असे सुरू आहे. यातून मार्ग काढण्याची ताकद स्त्रीमध्ये असते. महासांगवी गडावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, या सर्वातून मार्ग काढण्याची शक्ती महिलांमध्ये असते. स्त्री समर्पित असते. तिचे विचार बदलत नाही. तिला दिलेल्या भूमिकेशी, त्यांच्या प्रामाणिकपणाशी जोडलेल्या असतात. दिलेला शब्द मोडत नाही. भाजपच्या आधात्मिक आघाडीचे प्रमुख आता या गडाकडे आले आहे. त्यामुळे कामे होतील, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.