दोन्ही सिटीस्कॅन यंत्रे बंद, औषधेही मिळेनात; रुग्णांची ससेहोलपट

बिपिन देशपांडे, औंरगाबाद

yavatmal evm machines marathi news
३६ दिवस जागते रहो…! शासकीय गोदामात ‘ईव्हीएम’ कडेकोट बंदोबस्तात राहणार
cold water sold in the name of mineral water
मिनरल वॉटरच्या नावाखाली थंड पाण्याची विक्री ! शासकीय यंत्रणा ढिम्म
air pollution control system has been in dust since three months
पिंपरी : हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा तीन महिन्यांपासून धूळखात
Why three new swimming pools will start in Mumbai How to plan the municipal corporation
पाण्याचा तुटवडा, तरीही मुंबईत तीन नवे जलतरण तलाव का सुरू होणार? महापालिकेचे नियोजन कसे?

सोमीनाथ कारभारी कोरडे यांना तपासल्यानंतर घाटीतील डॉक्टरांनी काही औषधे सांगितली आणि सिटीस्कॅन करण्याचा सल्ला दिला. औषधे घेण्यासाठी गेले असता, खिडकीआतून आवाज आला, ‘ही औषधे नाहीत, बाहेरून खरेदी करा’. कोरडे यांनी नंतर चौकशी करीत सिटीस्कॅन यंत्र विभागाकडे धाव घेतली. तेथे त्यांना दोन्ही सिटीस्कॅन यंत्रे ६ सप्टेंबरपासून बंद असल्याचे सांगण्यात आले. हताश होऊन, ‘आता काय करायचे’, असा प्रश्न त्यांनी केला. तेव्हा उत्तर मिळाले, ‘खासगी रुग्णालयात जा’. कोरडे यांनी क्षीण स्वरात खर्चाबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांना, ‘अडीच ते तीन हजार रुपये खर्च येईल’, असे सांगण्यात आले. औषधांवर काम भागेल या आशेने कोरडे यांनी एका खासगी दुकानाच्या खिडकीपुढे चिठ्ठी धरली. आतून आवाज आला, ‘२६५ रुपये द्या’. ते ऐकून सोमीनाथ कोरडे यांचे अवसानच गळाले. त्यांनी आपले गाव गोलटगाव ते औरंगाबादपर्यंतच्या येऊन-जाऊन प्रवासासाठी ३०० रुपये खिशात आणले होते. त्यातील येण्यासाठीच त्यांना ८० रुपये खर्च आला. गावी परतायला पैसे लागतील म्हणून पाच रुपयांचा एक कप चहा घेतला आणि गावाकडचा रस्ता धरला.

औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) सध्या दीड ते दोन हजार दररोज तपासणीसाठी आलेल्या रुग्णांपैकी आठशे ते हजार रुग्णांना गोळ्या-औषधे मिळत नाहीत. सिटीस्कॅन करण्याचा सल्ला दिलेले सोमीनाथ कोरडे यांच्यासारखे दररोज किमान ५० रुग्ण. कोरडे हे तरुण शेतकरी. दोन भावांमध्ये अडीच एकर शेती. ते औरंगाबादपासून २० ते २५ किमीवरील गोलटगावचे. गाव काहीसे आडवळणाचे. आजारपण निघाले तर घाटीपर्यंत येण्यासाठी तीन ठिकाणांहून वाहन बदलावे लागते. गावापासून टोलनाका फाटय़ापर्यंत १० रुपये, फाटय़ापासून चिकलठाण्यापर्यंत ३० रुपये, तेथून बाबा पेट्रोल पंपापर्यंत पुन्हा ३० रुपये आणि पंपापासून घाटीपर्यंत १० रुपये, असे ८० रुपये त्यांना खर्चावे लागतात. सोमीनाथ कोरडे यांच्या कानावर कुऱ्हाडीचे घाव बसलेली मोठ्ठी जखम आहे. नऊ महिन्यांपूर्वी कानाच्या बाजूला एक शस्त्रक्रिया करून आतमध्ये काही स्टीलच्या पट्टय़ा बसवलेल्या आहेत. तेव्हापासून कधी कधी प्रचंड वेदना होतात. तीन-चार दिवसांपासून दुखणे असह्य़ झाल्यामुळे त्यांनी मंगळवारी घाटी रुग्णालय गाठले होते. आठवडय़ात दुसऱ्यांदा त्यांना यावे लागले होते.

घाटीत दोन सिटीस्कॅन यंत्रे आहेत. दहा वर्षांपूर्वीचे. आता रुग्ण तपासण्याची यंत्रणांची क्षमता संपली आहे. येथे दोन प्रकारचे रुग्ण तपासले जातात. एक कर्करोगाचे व दुसरे इतर आजारपणाचे. कर्करुग्णांची तपासणी इंजेक्शन देऊन केली जाते. यापूर्वीपर्यंत दररोज किमान २५ कर्करुग्णांना तपासले जायचे. तर इतर किमान शंभर रुग्णांची दररोज तपासणी व्हायची. यंत्रालाही काही मर्यादा असतात. किती काळ ते काम करील, असा सिटीस्कॅन विभागात काम करणाऱ्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा प्रश्न होता. नवीन यंत्र येईपर्यंत आम्ही रुग्णांना बाहेरूनच सिटीस्कॅन करण्याचा सल्ला देतो. नवीन यंत्र कधी येईल सांगता येत नाही. एका यंत्रातील टय़ूब गेलेली आहे, असे सांगितले जाते.

घाटीत औषधींचाही कित्येक दिवसांपासून तुटवडा आहे. गंगापूर तालुक्यातील कोबापूरचे कपूरचंद अंबरसिंग मयर यांच्या मातोश्रींना आठवडय़ापूर्वी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आतडय़ांचा आजार आहे त्यांना. त्यापायी त्यांना लागणारी औषधी घाटीत उपलब्ध नाहीत. आठवडाभरात दहा हजार रुपयांची औषधे बाहेरून आणावी लागली असल्याचे कपूरचंद सांगतात. राहुल खारडे हा तरुण बुलढाण्याचा. येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो. अंग खाजते आहे म्हणून घाटीत दाखवण्यासाठी आला. त्यालाही औषधे बाहेरून आणण्याचा सल्ला मिळाला. त्याच्या गोळ्यांची जेनेरिक औषधी दुकानात किमत आहे २०० रुपये. इतर दुकानांत त्यापेक्षा अधिक पैसे मोजावे लागू शकतात. पण बहुतांश जणांना- विशेषत: ग्रामीण भागातील रुग्णांना जेनेरिक औषधी दुकानांविषयीची माहितीच नाही. औषधांसाठी बाहेरचा रस्ता दाखवलेल्यांपैकी राहुलसारखे संदीप सुरडकर, लक्ष्मण सातपुते हेही होते. बाहेरून खरेदी केलेल्या औषधींसाठी २८६ रुपये खर्च आल्याचे लक्ष्मण सातपुते यांनी सांगितले. औषधेही बाहेरून आणायची असतील तर इथे यायचे कशासाठी, असा त्यांचा प्रश्न होता. घाटीत दररोज बाह्य़रुग्ण विभागात १७०० ते १८०० रुग्ण तपासले जातात. त्यातील किमान आठशे ते एक हजार रुग्णांना औषधांसाठी बाहेर जावे लागते. घाटीत किमान २० रुपयांत तपासणी तर होते, एवढेच काय ते गरीब रुग्णांना समाधान मिळते.

असह्य़ दुखणे थांबवण्यासाठीची (पेनकिलर), अ‍ॅलर्जी, त्वचेच्या आजारासाठीचीही औषधे घाटीमध्ये नाहीत. अ‍ॅलर्जीसाठीची सेट्राझिन, डिक्लोफेनॅक गोळी (पेनकिलरसाठी), किईझो सोप, केटोडर्म क्रीम या त्वचेच्या आजारासंबंधीची, आम्लपित्त (अ‍ॅसिडिटी)ची रॅनटॅक गोळी, ऑग्युमेंटीनसारखी (अ‍ॅन्टिबायोटिक), कानासाठीचे ड्रॉप अशी काही औषधे उपलब्ध नसल्यामुळे बाहेरून आणण्यास सांगितले जाते.