उच्च विद्याविभूषित व मितभाषी अशी ओळख असलेल्या एका २५ वर्षीय तरुण प्राध्यापकाची निर्घृण हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. कपिल किशन भीमेवार असे या मृताचे नाव असून हत्या करताना मारेकऱ्यांनी अवलंबिलेली पद्धत  पोलीस यंत्रणेला चक्रावणारी असून लवकरच आरोपीचा शोध लागेल, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे यांनी सांगितले.
नांदेडपासून १५ कि. मी. अंतरावर असलेल्या बारड येथील कपिल भीमेवार हा तरुण बालपणापासूनच गावात हुशार म्हणून प्रसिद्ध होता. माध्यमिक शिक्षण गावातच पूर्ण झाल्यानंतर त्याने बी.फार्मसीसाठी यवतमाळ जिल्’ाातल्या पुसद येथे प्रवेश घेतला. तेथे पदवी पूर्ण करून तो सध्या विष्णुपुरी येथील सहयोग फार्मसी कॉलेज येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होता. बारडहून ये-जा करणाऱ्या कपिल भीमेवार याला सोमवारी साडेपाच वाजता त्याच्या एका मित्राने भ्रमणध्वनीवर फोन केला. तुझा डबा विसरला आहे तू घेऊन जा, असे त्याने सांगितल्यानंतर त्याचा नंतर कोणाशीही संपर्क झाला नाही. या संभाषणानंतर अवघ्या पंधरा मिनिटात त्याचा भ्रमणध्वनी बंद पडला.
सोमवारची रात्र गेल्यानंतर काल भीमेवार याच्या नातेवाइकांनी त्याचा शोध सुरू केला. परंतु शोध न लागल्याने शेवटी त्याच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. एकीकडे पोलिसांना माहिती दिल्यानंतरही भीमेवार याचे नातेवाईक त्याचा शोध घेत असताना दुपारी पुणेगाव शिवारात त्याची मोटारसायकल (एम.एच. २६ – यु – ९०३८) सापडली. मोटारसायकल सापडल्यानंतर वेगवेगळ्या शंका-कुशंका व्यक्त केल्या जात असतानाच रात्री असदवन येथील ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या एका शिवारात एक शव आढळून आले. चेहऱ्यापासून कमरेपर्यंत जाळलेले हे शव कपिल भीमेवार याचेच असल्याचे त्याच्या मित्रांनी ओळखले. त्यानंतर त्याचे आई-वडील व अन्य नातेवाइकांना कळवण्यात आले. त्यांनीही शव कपिलचेच असल्याचे सांगितले. तत्पूर्वी कपिलच्या वडिलांना निजामाबादहून एक फोन आला होता. ‘तुमचा मुलगा माझ्या ताब्यात आहे. ५० लाख रुपये द्या’ असे पलीकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे हा फोन कपिलच्याच मोबाईलवरुन आला होता. कपिलच्या वडिलांनी पोलिसांना ही माहिती दिली. पोलीस पथक निजामाबादपर्यंत पोहोचले. परंतु फारसे काही निष्पन्न झाले नाही.
अत्यंत गुंतागुंतीची हत्या असल्याने पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. कपिलचे फेसबुक अकाऊंट, व्हॉटस्अॅप व गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्याला आलेले कॉल तपासण्याचे काम सुरू होते.  पाच तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत उत्तरीय तपासणीची कारवाई करण्यात आली. शिवाय डीएनए चाचणीसुद्धा केली जाणार असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे यांनी सांगितले. आम्ही या हत्येचा सर्वबाजूने तपास करत आहोत. लवकरच आरोपींचे धागेदोरे हाती लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इतवारा उपविभागाचे उपअधीक्षक बनकर यांनी सांगितले की, काही धागेदोरे आमच्या हाती लागले आहेत. परंतु जोपर्यंत ठोस पुरावे सापडणार नाहीत, तोपर्यंत याबाबतीत अधिक बोलणे उचित ठरणार नाही. ही हत्या सुपारी देऊन करण्यात आली का, यादृष्टीनेही आम्ही तपास करत आहोत. तपासासाठी तीन-चार वेगवेगळी पथकं काम करत असल्याचे ते म्हणाले.