छत्रपती शिवराय केवळ स्वराज्याचेच संस्थापक होते असे नाही, तर जाती, धर्मात व वतनदारीत अडकलेल्या भारताच्या राष्ट्रनिर्मितीचे संस्थापकही आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांनी केले. शिवरायांनी शेतकरी व स्त्रिया या दोन्ही घटकांचा प्रचंड सन्मान केला. आजच्या राज्यकर्त्यांनी हा वारसा जतन करण्याचेही कार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजीमहाराज जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात हबीब यांचे ‘शेतकऱ्यांचे राजे-छत्रपती शिवाजी’ या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. हबीब म्हणाले की, शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी शेकडो वर्षांपासून भारतात राजेरजवाडय़ांची जुलमी राजवट होती. मोगलकर्त्यांनी जनतेवर अत्याचार, लूट केली. या प्रस्थापित राज्य व्यवस्थेविरोधात संघर्ष करण्याचे सामथ्र्यही तत्कालीन प्रजेत नव्हते. जुलमी राजवटीविरोधात लढण्याऐवजी निपचित पडलेल्या प्रजेच्या मनात स्वराज्याचा अंगार शिवरायांनी चेतविला. यापूर्वी कोणत्याही जुलमी राजाविरोधात साधा दगड भिरकावण्याची हिंमतही कोणी दाखवली नाही. अशा पीडित जनतेला शिवरायांनी जागृत केले. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होणार नाही याची काळजी शिवरायांनी घेतली. शत्रूकडील स्त्रीचाही सन्मान केला. जाती-पातीत वाटल्या गेलेल्या लोकांमधून केवळ गुणवत्तेच्या आधारावर मावळे, सेवेत अधिकारी नेमले. महात्मा फुले यांनी शिवरायांची समाधी शोधून पोवाडा लिहिला. कारण ते कुळवाडीभूषण होते. आजच्या राज्यकर्त्यांनी किमान शेतकरी आणि स्त्रियांचा सन्मान, गौरव करण्याचे देखील काम केले तर खऱ्या अर्थाने हे राज्य आपले आहे, असे जनतेला वाटेल. शेतकऱ्यांच्या आत्महत्येची चर्चा शेती व्यवस्थेकडे घेऊन जाणारी ठरावी, असेही अमर हबीब म्हणाले.
शेतकरी आत्महत्येला फॅशन म्हणणारे खासदारच का मरत नाही, असा जळजळीत सवालही हबीब यांनी या वेळी केला. राज्यकर्त्यांनी नेहमीच शेतकरी आत्महत्येची टिंगलटवाळी केली. संबंधित खासदाराने शेतकरी आत्महत्या फॅशन असेल तर ती एकदा करून बघावी, असा टोलाही त्यांनी लगावला.
बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे, कुलसचिव डॉ. मुरलीधर लोखंडे, डॉ. किशन धाबे, नलिनी चोपडे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुहास मोराळे, अध्यासनाचे संचालक डॉ. पुरुषोत्तम देशमुख, किसानपुत्र आंदोलनाचे नेते अच्युत गंगणे यांची उपस्थिती होती.
‘मीही एक मावळा’
शिवरायांच्या प्रेरणादायी इतिहासातून धडा घेतलेला मीही एक मावळा आहे, असे कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले. छत्रपती शहाजी भोसले स्मारक समितीचे कार्य विद्यापीठामार्फत करण्यात येईल. या संदर्भात समितीचा प्रस्ताव विद्यापीठास प्राप्त झाल्याचेही डॉ. चोपडे म्हणाले. कुलसचिव डॉ. मुरलीधर लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. छत्रपती शिवाजीमहाराज प्रतिमेची विद्यापीठ गेट ते नाटय़गृह या दरम्यान सकाळी मिरवणूक काढण्यात आली. कुलगुरू डॉ. चोपडे यांच्या उपस्थितीत मिरवणूक सुरू करण्यात आली. लेझीम-ढोलताशाच्या गजरात मिरवणूक निघाली. जयंतीच्या पूर्वसंध्येला शाहीर अप्पा उगले व रामानंद उगले यांच्या पोवाडय़ाचा कार्यक्रम झाला. छत्रपती शिवाजी, राजमाता जिजाऊ, संभाजी राजे यांच्या जीवनकार्यावर पोवाडे सादर करण्यात आले.