महावितरण कंपनीच्या येथील कार्यालयात मोठय़ा संख्येने असलेली रोहित्रे दुरुस्तीच्या नावाखाली गेल्या दोन दिवसांत अन्यत्र हलविण्यात आली. मात्र, अशा प्रकारे एकदम मोठय़ा संख्येने रोहित्रे हलविण्यामागे दुरुस्ती की अन्य कोणते कारण आहे, याची चर्चा सध्या होत आहे.
महावितरणच्या आवारात रोहित्रांचा मोठा साठा होता. रोहित्राची वॉरंटी ५ वर्षांची असते. दोन वर्षांपासून या कार्यालयात शेकडो रोहित्रे होती. त्याची वॉरंटी संपली होती, की ते दुरुस्तीस ठेवले होते? दोन दिवसांत शेकडो रोहित्रे दुरुस्तीच्या नावाखाली इतरत्र हलविली गेली. यामागे वेगळे काही अर्थकारण आहे की खरोखर दुरुस्तीसाठी ती पाठविली? त्याची प्रत्यक्ष चाचणी झाली होती का? कोणत्या कंत्राटदाराला किती रोहित्रे दुरुस्तीस दिली, हा चच्रेचा विषय आहे. ग्रामीण भागातील शेतकरी रोहित्रासाठी महावितरण कार्यालयात फेऱ्या घालतात. मात्र, ‘अर्थपूर्ण’ व्यवहाराअंती शेतकऱ्याला रोहित्रे उपलब्ध करून दिल्याच्या तक्रारी आहेत.
कार्यालयात ठेवलेली रोहित्रे नादुरुस्त असल्यामुळे की साठा म्हणून ठेवली होती? ती नादुरुस्त होती, तर दोन वर्षे कार्यालयात धूळखात का पडली? केवळ साठा म्हणून ठेवली असती तर दोन दिवसांत मालमोटारीने इतरत्र कशासाठी हलविली? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. वास्तविक, रोहित्र नादुरुस्त झाले अथवा जळाले तर याची तपासणी यंत्रणेमार्फत करून ते सरळ दुरुस्तीस पाठविणे आवश्यक ठरते. साहजिकच दोन दिवसांतच मोठय़ा संख्येने रोहित्रे कार्यालयातून इतरत्र हलविण्याच्या लगीनघाईमागे नेमके काय दडले आहे? दुरुस्तीसाठी ती पाठवली असतील तर कोणत्या कंत्राटदाराला किती संच दिले, संच दुरुस्तीला देताना त्याचे समान वाटप होते, की ते अधिकाऱ्यांच्या मर्जीप्रमाणे दुरुस्तीसाठी दिली जातात, याचीही उत्सुकता व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील पाचही तालुक्यांत रोहित्र जळाल्यानंतर त्याची चाचणी करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी उपविभागीय कार्यालयात विशेष व्यवस्था करण्यात आली. या केंद्रांत ज्या भागातील रोहित्र जळाले अथवा नादुरुस्त झाले त्याची तपासणी करणे गरजेचे आहे. जेणेकरून तपासणीनंतर रोहित्रातील नेमक्या दुरुस्तीबाबत अंदाज बांधता येतो व दुरुस्तीसाठी ते केंद्रामार्फत कंत्राटदाराकडे पाठविणे सोयीचे होते. रोहित्रात नेमका काय बिघाड होता आणि त्याची योग्य दुरुस्ती झाली किंवा नाही, हे त्यामुळे कळू शकते व त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची बचतही होते. मात्र, असे न केल्यास कंत्राटदाराला दुरुस्तीवर अवाच्या सवा बिल अदा करावे लागते. त्यामुळे महावितरणला नाहक आíथक भरुदड सोसावा लागतो.
या पाश्र्वभूमीवर येथील कार्यालयातून गेल्या दोन दिवसांत शेकडो रोहित्रे विविध वाहनांतून दुरुस्तीच्या नावाखाली पाठविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. मात्र, त्यामुळेच या रोहित्रांचे किती नुकसान झाले होते? त्याची वॉरंटी संपली होती काय? दुरुस्तीसाठी या रोहित्रांची तपासणी कोणी केली व नेमका दुरुस्तीचा प्रकार काय? याच्या नोंदी घेतल्या काय? रोहित्राची वॉरंटी पाच वर्षांची असताना इतक्या मोठय़ा संख्येने रोहित्रे या कार्यालयात कशासाठी जमा होती? दुरुस्तीसाठी पाठविली असतील तर कोणत्या कंत्राटदाराला किती संच देण्यात आले? याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.
मागणी वाढल्यामुळेच..
पावसाळय़ामुळे शेतकऱ्यांकडून रोहित्रांची मागणी कमी झाली. रोहित्र जळण्याचे प्रमाणही कमी आहे. महिनाभरानंतर शेतकऱ्यांकडून रोहित्रांची मागणी वाढते, म्हणून नादुरुस्त रोहित्र दुरुस्तीसाठी कंत्राटदार एजन्सीकडे पाठवले जात असल्याचे महावितरणचे कार्यकारी अभियंता शांतिलाल चौधरी यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Transformer transfer for repair
First published on: 08-10-2015 at 01:30 IST