दररोज गाडीला बाहेरून स्वच्छ केले, पुसून चकचकीत केले म्हणजे झाले, असे नसते. खरे तर गाडी जितकी बाहेरून चकचकीत आणि नेटकी दिसणे गरजेचे असते, तितकेच तिला आतूनही स्वच्छ आणि सुगंधी ठेवायला हवे. जर एखादी व्यक्ती किंवा तुम्ही स्वतः गाडीमध्ये बसलात आणि तुम्हाला कुबट किंवा कुठल्या तरी पदार्थांचा घाणेरडा वास येत असेल, तर कसं वाटेल? अर्थात, कुणालाही असा अनुभव आवडत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चार चाकी गाडीमध्ये व्यक्ती अगदी आरामात बसून त्याला हवे ते पदार्थ खाऊ शकते. आपण तसे करतोदेखील. परंतु, त्या खाद्यपदार्थांच्या पिशव्या, डबे इत्यादी गोष्टी वेळच्या वेळी बाहेर, कचऱ्याच्या डब्यात टाकून दिल्या नाहीत, तर त्यामधून दुर्गंध येण्यास सुरुवात होते. काही पदार्थांचे लहान लहान कण गाडीत पडून राहतात. अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे गाडीमध्ये घाणेरडा वास वा दर्प पसरू शकतो. मात्र, असे न होऊ नये यासाठी आणि वाहन सतत सुगंधी ठेवण्यासाठी काही सोपे आणि स्वस्तातले पर्याय आहेत ते पाहा.

हेही वाचा : Car tips : बाईक, कारवर गंज लागू नये यासाठी कोणती काळजी घ्यावी? पहा या चार सोप्या टिप्स…

गाडी सुगंधी ठेवण्याच्या पाच टिप्स

१. एअर व्हेंट्स साफ करणे

गाडीमध्ये असणारे एसी एअर व्हेंट्स जर धुळीने माखले असतील, तर त्यामुळे गाडीत धुळकट हवा आणि दर्प येत राहतो. त्यांमध्ये अनेक जीवजंतूसुद्धा असतात; जे केवळ गाडीसाठीच नव्हे, तर तुम्हालादेखील त्रासदायक ठरू शकतात. हे एअर व्हेंट्स स्वच्छ ठेवण्यासाठी एखाद्या स्पंजचा किंवा कान साफ करणाऱ्या इयरबड्सचा वापर करू शकता. त्यासह जेव्हा एसी वापरात नसेल तेव्हा त्याची फ्लॅप बंद करून ठेवा.

२. कॉफीच्या बियांचा वापर

कॉफे पिऊन जशी तरतरी येते, अगदी त्याचप्रमाणे केवळ कॉफीच्या बियांचा गंधदेखील वातावरण सुगंधी करण्यास फायदेशीर असतो. गाड्यांमध्ये लावले जाणारे फ्रेशनर महाग वाटत असल्यास कॉफीच्या बिया हा अत्यंत सोपा आणि स्वस्त पर्याय आहे. इतकेच नव्हे, तर दुर्गंध किंवा दर्प या बिया शोषून घेऊ शकतात. त्यासाठी एखाद्या कापडामध्ये किंवा पेपरमध्ये या बिया गुंडाळून गाडीमध्ये ठेवा आणि दर आठवड्याला त्या बदलत राहा.

३. इसेन्शियल ऑइलचा वापर

अनेकदा आपण इसेन्शियल ऑइलबद्दल ऐकले आहे. त्याचा वापर शक्यतो सौंदर्यप्रसाधनांमध्ये किंवा त्वचेची काळजी घेण्यासाठी केला जातो. मात्र, हे तेल गाडीमधील दुर्गंध घालवण्यासाठीही उपयोगी असते. या तेलाचे केवळ दोन ते तीन थेंब वाहनाला बऱ्याच काळासाठी सुगंधी आणि प्रसन्न ठेवतात. तुम्ही हे तेल डिफ्युजरमध्ये घालून ठेवू शकता.

हेही वाचा : पेट्रोल पंपावर तुमची फसवणूक तर होत नाही ना? वाहनात पेट्रोल भरताना ‘या’ पाच टिप्स लक्षात ठेवा

४. सेंटेड कँडल्स

सेंटेड कँडल्सना सध्या बाजारात भरपूर मागणी आहे. या सुगंधी मेणबत्त्या मन शांत करण्यासाठी, ध्यान लावून बसण्यासाठी थोडक्यात ‘रिलॅक्स’ करण्यासाठी वापरल्या जातात. मात्र, या मेणबत्त्या तुम्ही तुमच्या गाडीतील डॅशबोर्डवर ठेवल्यात तरीही तुमची गाडी सुगंधी होऊ शकते. डॅशबोर्डवर जेव्हा ऊन पडेल तेव्हा आपोआप त्या उष्णतेने मेण वितळण्यास सुरुवात होईल आणि त्याचा हलकासा गंध गाडीत दरवळत राहील.

५. काचा खाली करणे

सगळ्यात सोपा आणि उपयुक्त उपाय. बराच वेळ गाडीच्या काचा बंद राहिल्यामुळे गाडीत हवा खेळती राहत नाही आणि ताजी हवा आत येत नाही. त्यामुळेही कधीतरी गाडीमध्ये वास भरून राहू शकतो. असे न होण्यासाठी अधूनमधून गाडीच्या सर्व काचा थोड्या वेळासाठी खाली करून ठेवा.

तसेच वेळोवेळी गाडीमधील कचरा, अनावश्यक वस्तू टाकून द्यायला विसरू नका.

वरील टिप्स हिंदुस्थान टाइम्सच्या एका लेखातून मिळाल्या आहेत.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car tips to make your car cabin smell fresh and refreshing how to get rid of odor check out affordable tips dha
First published on: 22-01-2024 at 16:03 IST